Dindori Vidhan Sabha Elections 2024 : अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला उपस्थिती आणि नंतर विमानाने थेट हरियाणाला पोहोचलेले व गुरुग्राममधील हॉटेलमध्ये पहाऱ्यात अडकलेले एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे जे चार आमदार होते, त्यातील एक म्हणजे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ. आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाआधीच दिंडोरीतून झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवार गटाने केली आहे. मात्र, त्यांचे पुत्रच त्यांच्याविरोधात शरद पवार गटातून निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास करणारे नरहरी झिरवळ २००४ मध्ये पहिल्यांदा दिंडोरीतून निवडून आले होते. त्यापुढील म्हणजे २००९ मध्ये त्यांचा शिवसेनेचे धनराज महाले यांनी अवघ्या १४८ मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीत झिरवळ यांनी महालेंना पराभूत करुन वचपा काढला. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयाची परंपरा त्यांनी कायम ठेवली. आता विधानसभेच्या आगामी निवडणुकीतही ते रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा पायजमा-सदरा आणि पायात चप्पल अशा पेहरावात वावरणारे झिरवळ हे साधे नाहीत, हे बहुधा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याही लक्षात आले असावे. दिंडोरी लोकसभेच्या निकालामुळे ऐेनवेळी ते कोणता पवित्रा घेतील, याचा नेम नसल्याने या गटाने त्यांच्या उमेदवारीसाठी कुठलीही उसंत घेतली नाही. मित्रपक्षांशी चर्चाही केली नाही. महायुतीत जागावाटपासाठी समन्वय समिती स्थापन होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नाशिकमध्ये म्हटले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिंडोरीतील मेळाव्यात झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यावरून झिरवळ यांचे अजित पवार गटाला वाटत असलेले महत्त्व आणि धास्ती दोन्ही अधोरेखित झाले आहे. हेही वाचा >>> चावडी : रावसाहेब दानवे का चिडले? लोकसभेचा प्रचार सुरू असताना झिरवळ एकदा थेट महाविकास आघाडीच्या प्रचार बैठकीत सहभागी झाले होते. आता त्यांचा मुलगा गोकुळ याने याच मतदारसंघातून शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली आहे. नरहरी झिरवळ यांनी गोकुळ आज्ञाधारक असून तो आपले ऐकून थांबेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, राजकारणात काय घडेल हे सांगता येत नाही. झिरवळ मुलास पुढे करून वेगळे डावपेच खेळत असल्याचा शरद पवार गटाला संशय आहे. पवार गटाकडून अद्याप थेट उमेदवारीबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. शरद पवार गटाच्या आशा पल्लवित लोकसभेत या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक ८२ हजार ३०८ मतांची आघाडी मिळाली होती. त्यांचे उमेदवार भास्कर भगरेंना मिळालेली एक लाख ३८ हजार मते झिरवळांची चिंता वाढविणारी ठरली. या मताधिक्याने शरद पवार गटात इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष माजी आमदार रामदास चारोस्कर, त्यांची पत्नी सुनीता चारोस्कर, संतोष रेरे, अशोक बागूल, गोकुळ झिरवळ आदींचा समावेश आहे. अजित पवार गटाने झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी, त्यांचे पुत्र गोकुळ हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. महालेंचे काय? महायुतीत परस्पर उमेदवारी जाहीर करण्यावरून कलहाची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार धनराज महालेंना रिंगणात उतरविण्याचे त्यांच्या पक्ष प्रवेशावेळीच सूचित केले होते. अजित पवार गटाने परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाले थांबतील, की बंडखोरी करतील, हा प्रश्नच आहे.