पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढल्यानंतर आता पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांची युती होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ची आघाडी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांच्या विरोधात अजित पवार असा संघर्ष होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात युतीसाठी बोलणी झाली, मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने युती होऊ शकली नाही. मात्र, आता जिल्हा परिषद आाणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये युती करण्याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची चर्चेची पहिली फेरी झाली आहे. पुणे जिल्ह्यात या दोन्ही पक्षांची ताकद कमकूवत आहे. दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात पुणे जिल्हा परिषदेचा कारभार अनेक वर्षांपासून आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळविल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर कब्जा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेवरून पायउतार करण्याची योजना भाजपकडून आखण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना शिवसेना (शिंदे) पक्षाची गरज भासणार आहे.
जिल्ह्यात भाजपने बस्तान बांधण्यात सुरुवात केली आहे. त्यासाठी पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना भाजपने पक्षात घेतले. मात्र, नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये या दोघांना फारसा प्रभाव टाकण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जगताप यांच्यामुळे सासवड नगर परिषद या एकाच ठिकाणी भाजपला यश आले. अन्य बहुतांश ठिकाणी अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने सत्ता कायम ठेवली. जिल्ह्यात पुरंदर, जुन्नर, खेड-आळंदी, चाकण, राजगुरुनगर या परिसरात शिवसेनेची ताकद आहे. त्याचा फायदा करून घेण्यासाठी भाजपने शिवसेना (शिंदे) पक्षाबरोबर युतीची बोलणी सुरू केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये अपयश आल्यानंतर दोन्ही ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या शनिवारी बारामती येथे भेट घेतली. त्यामध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र लढण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येऊन निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले. मात्र, अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली. स्थानिक पदाधिकाऱ्यांना याबाबतचा अधिकार देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, रविवारी त्यांनी पुण्यात ‘राष्ट्रवादी’तील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या. त्या वेळी आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) या मित्रपक्षांबराेबर दोन हात करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
