मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी रात्री नवी दिल्लीला जाऊन भेट घेतली व लगेच मुंबईत परतले. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बुधवारी सायंकाळी पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. शहा यांनी भाजपच्या पुण्यात झालेल्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार’ असे संबोधल्याने अजित पवार गटात अस्वस्थता असून विधानसभा निवडणूक जागावाटपासंदर्भातही शहा यांच्याबरोबर झालेल्या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. हेही वाचा >>> कारण राजकारण : कसब्यात भाजपमध्येच तिरंगी लढत राज्य शिखर बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरण बंद करण्याच्या आर्थिक गुन्हे विभागाच्या निर्णयास अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या सुनावणीत जोरदार विरोध केला होता. याप्रकरणी न्यायालयात गुरुवारी सुनावणी अपेक्षित असून या पार्श्वभूमीवरही पवार-शहा भेटीस महत्त्व असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ग्रामविकास गिरीश महाजन यांच्यासह दोन मंत्र्यांनी अधिक निधी मागितला. तेव्हा पवार यांनी त्यास नकार दिला. त्यावरूनही वाद झाल्याची चर्चा आहे. बैठकीनंतर पवार हे दिल्लीला गेले आणि त्यांनी शहा यांच्याशी चर्चा केली. विधानसभा निवडणुकीचे जागावाटप लवकर व्हावे, अशी भूमिकाही पवार यांनी शहा यांच्या भेटीत मांडल्याचे समजते. शरद पवार हे त्यांचे आदराचे स्थान असून त्यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इतकी कठोर टीका करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे शहा-पवार भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.