मालेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने मालेगावात उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता त्यांनी शरद पवार गटाला दोनच दिवसांपूर्वी सोडचिठ्ठी दिलेले माजी आमदार असिफ शेख यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. या भेटीमुळे पवार यांनी मालेगावातील अल्पसंख्यांकांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
आसिफ शेख यांचे घराणे मूळचे काँग्रेसी. शेख हे पाच वर्षे आणि त्यांचे वडील दिवंगत रशीद शेख हे १० वर्षे काँग्रेसचे आमदार होते. शेख कुटुंबियांमुळे महापालिकेवर झेंडा फडकविणे काँग्रेसला शक्य झाले होते. संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत झाल्याचे चित्र असताना शेख कुटुंबियांनी मालेगावात काँग्रेसला एकप्रकारे वैभव प्राप्त करून दिले होते. परंतु, काँग्रेसमध्ये उपेक्षा होत असल्याची ओरड करत दोन वर्षांपूर्वी शेख पिता-पुत्रांनी तब्बल ३० नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शेख कुटुंबियांच्या अजित पवार यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळेच घाऊक पद्धतीचे हे पक्षांतर होऊ शकले होते.
हेही वाचा…पालघर पट्ट्यात ठाकरे गटाची नव्याने बांधणी
राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध असले तरी भाजपबरोबर त्यांनी केलेला घरोबा शेख पिता-पुत्रास रुचला नव्हता. अजित पवार यांच्याबरोबर गेल्यास अल्पसंख्यांकबहुल मालेगावातील मतदारांची नाराजी ओढवून घेण्याचा धोका असल्याने शेख पिता-पुत्राने शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असतानाच असिफ शेख यांनी अचानक शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. मालेगाव मध्य मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवण्याचा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या जागावाटप सूत्रानुसार मालेगाव मध्यची जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याने आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे स्पष्टीकरण शेख यांच्याकडून पक्ष सोडताना दिले गेले. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शेख यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
हेही वाचा…लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्वाळा
आसिफ यांचे वडील शेख रशीद यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले. त्यावेळी कार्यबाहुल्यामुळे आपल्याला सांत्वनासाठी येता आले नव्हते. आता जनसन्मान यात्रेनिमित्त मालेगावात आल्यावर शेख कुटुंबियांच्या भेटीसाठी आपण आल्याचे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. या भेटीप्रसंगी आसिफ शेख, माजी महापौर ताहेरा शेख यांच्याशी पवार यांनी चर्चा केली. यावेळी वीज, यंत्रमाग, अल्पसंख्यांक समाजाच्या अडचणी आदी समस्यांचा पाढा उपस्थितांनी वाचला. काही संघटनांनी वफ्क बोर्ड सुधारणा विधेयकाबद्दल नाराजी व्यक्त करत अजित पवारांना याप्रश्नी लक्ष घालावे, असा आग्रह धरला. त्यावर या विधेयकामुळे अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होत असेल तर त्या संदर्भातील विरोध योग्य त्या व्यासपीठावर नोंदवला जाईल आणि कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली. ही भेट पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपबरोबर युती केल्याने नाराज झालेल्या अल्पसंख्यांक समाजाला आपलेसे करण्याबरोबरच आसिफ शेख यांच्याबरोबरचे संबंध पुन:स्थापित करण्याचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.
© The Indian Express (P) Ltd