पुणे : बारामतीत रुग्णालयाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेऊन ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ हे नाव कायम राहणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधिमंडळात स्पष्ट केले असताना, पुण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचे ठराव विविध संस्थांनी केले आहेत. त्यापैकी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (कात्रज दूध) अजित पवार यांचे नाव देण्याची प्रक्रिया अंंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, अन्य संस्थांना अजित पवार यांचे नाव दिले जाणार का, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बारामतीतील रुग्णालयाचे नामकरण ‘स्व. अजित पवार सर्वोपचार रुग्णालय’ असे करण्यात आले होते. मात्र, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ हे नाव कायम ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्हा हा अजित पवार यांचे प्राबल्य असलेला; तसेच अनेक संस्थांच्या जडणघडणीत अजित पवार यांचा मोलाचा वाटा असल्याने संबंधित संस्थांंनी अजित पवार यांचे नाव देण्याचे ठराव केले आहेत.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने संस्था, ट्रस्ट, फाउंडेशनची नोंदणी करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अजित पवार यांचे पुतळे, स्मारके उभारण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांच्या नावाचा चुकीचा किंवा व्यावसायिक हेतूने वापर होऊ नये, यासाठी कुटुंबीयांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. अजित पवार यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे असल्यामुळे जनमानसात त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्या नावाने संस्था, ट्रस्ट किंवा विविध उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अशा उपक्रमांमधून त्यांच्या नावाचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने कोणतीही नवीन संस्था, ट्रस्ट किंवा फाउंडेशन नोंदणी करताना कुटुंबीयांचे लेखी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा ठराव अंतिम टप्प्यात
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज दूध) या संस्थेचे नामकरण ‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ’ असे होणार आहे. याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. याबाबत संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे म्हणाले, ‘संंस्थेला अजित पवार यांचे नाव देण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. याबाबतचा ठराव करण्यात आला असून, सर्वसाधारण सभेत लवकरच हा ठराव मंजूर केला जाणार आहे. अजित पवार यांचे संस्थेच्या विकासात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांना आदरांजली म्हणून हा ठराव करण्यात आला आहे. संस्थेच्या ‘कात्रज’ हे उत्पादनाचे नाव कायम राहणार आहे’.
नामकरणाबाबतचे अन्य ठराव
- पुणे महापालिकेच्या ‘शहरी गरीब आरोग्य योजने’ला अजित पवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेतील विरोधी पक्ष नेते निलेश निकम यांनी दिला आहे. या योजनेचे नाव ‘अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना’ असे करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. २००९ मध्ये ही योजना सुरू झाली. त्यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेत सत्ता होती.
- ‘पुणे रिंग रोड’ला अजित पवार यांचे नाव द्यावे, असा ठराव आमदार शंकर मांडेकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला आहे.
- पिंपरी- चिंचवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात ‘अजितसृष्टी’ प्रकल्पासह मुख्य इमारतीतील सभागृहाला आणि उद्यानाला अजित पवार यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे.
- पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला अजित पवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने केला आहे.
