पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या पार्श्वभूमीवर दु:खाची छाया असलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ने सर्वाधिक जागा मिळवत पुणे जिल्ह्यात आपणच ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले. आतापर्यंत अजित पवार यांच्या नेतृत्त्वामुळे तेच पुण्याचे ‘दादा’ असल्याचे अनेक निवडणुकांमध्ये दिसून आले. मात्र, आता अजित पवार नसले, तरी पुणे जिल्ह्यात केलेल्या कामाची आठवण ठेवून मतदारांनी अजित पवार यांच्या पक्षाला साथ देत आदरांजली वाहिली.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ बहुतांश ठिकाणी एकत्र होते. त्याचा या पक्षांना फायदा झाला. तसेच अजित पवार यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट या पक्षांकडे होती. भाजप हा दुसऱ्या स्थानावर रहिला. शिवसेना (ठाकरे) गटाने शिवसेना (शिंदे) गटापेक्षा जास्त जागा मिळवित तिसरे स्थान पटकावले. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर यश मिळाले नाही.
जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि पंचायत समितीचे १४६ गण आहेत. या निवडणुकीत ६८.३५ टक्के मतदान झाले. अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाल्याने या निवडणुकीत दु:खाचे वातावरण होते. कोणत्याही पक्षाने जाहीर सभा घेवून प्रचार केला नाही. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेवून प्रचार करण्यात आला. त्यामुळे मतदानाचे प्रमाण कमी झाले. त्यामध्ये अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने सर्वाधिक जागा घेत पुणे जिल्ह्यावर सत्ता कायम राखली.
बारामतीत शत प्रतिशत अजित पवार
अजित पवार यांच्या निधनामुळे मतदारांमध्ये निरुत्साह होता. बारामतीत सर्वांत कमी ५४.९० टक्के मतदान झाले. गेल्या वेळी ६१ टक्के मतदान झाले होते. सर्व पक्षांनी जाहीर प्रचार न करता मतदारांना वैयक्तिक भेटण्यावर भर दिला. बारामतीमध्ये जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे १२ गण आहेत. अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले. भाजपने जिल्हा परिषदेत चार ठिकाणी आणि पंचायत समितीत ११ ठिकाणी उमेदवार उभे केले. दोन्ही ठिकाणी ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार निवडून आल्याने भाजपवर नामुष्कीची वेळ आली.
काँग्रेसवर नामुष्की
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नसल्याने त्यांच्यावर नामष्की ओढवली. या पक्षाचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस तग धरून होती. आता काँग्रेसला नेतृत्त्व राहिले नसल्याने एकाही ठिकाणी यश मिळाले नाही.
काँग्रेसच्या माजी आमदारांमुळे भाजपचा शिरकाव
पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नगर परिषदेच्या निवडणुकीत सासवड वगळता अन्य ठिकाणी भाजपला शिरकाव करता आला नाही. तेव्हा प्रचाराला अजित पवार हे होते. या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या या माजी आमदारांमुळे भाजपने शिरकाव केला आहे. पुरंदर आणि भोरमध्ये भाजपला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
मावळमध्ये भाजपला शून्य जागा
मावळ तालुक्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ आणि भाजप यांच्यात लढत होती. या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांवर अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने विजय साकारला. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली. माजी आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढविली. मात्र, भाजपला एकाही जागा मिळाली नाही.
इंदापूरमध्येही सर्व ‘राष्ट्रवादी’
इंदापूर तालुक्यात राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्र आल्याने भाजपचा निभाव लागला नाही. या ठिकाणी सर्व जागा ‘राष्ट्रवादी’ला मिळाल्या. भाजपचे नेते प्रवीण माने यांच्या साथीला अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असतानाही भाजपला मतदारांनी स्वीकारले नसल्याचे स्पष्ट झालेे.
आमदार कुल यांना फटका
दौंंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा ‘राष्ट्रवादी’ला मिळाल्या. त्यामुळे भाजपचे आमदार राहुल कुल यांना फटका बसला आहे. पंचायत समितीत मात्र कुल यांना काही जागा मिळवता आल्या.
आंबेगावात वळसे-पाटीलच
आंबेगाव तालुक्यात ‘राष्ट्रवादी’च्या विरोधात शिवसेनेचे आव्हान होते. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व स्वीकारात मतदारांनी आंबेगावात ‘राष्ट्रवादीला साथ दिली.
जुन्नरमध्ये शिवसेनेचे अस्तित्त्व टिकून
जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेच्या आठपैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विजय साकारला. शिवसेना (शिंदे) पक्षाला तीन, तर शिवसेना (ठाकरे) गटाला एक जागा मिळाली. त्यामुळे शिवसेनेचे अस्तित्त्व टिकून असल्याचे स्पष्ट झाले.
’खेड’ शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ताब्यात
खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ठाकरे) पक्षाने निवडणूक लढविली. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे पाच आणि पंचायत समितीचे नऊ जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे खेड तालुका हा शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ताब्यात राहिला आहे.
मुळशीत संमिश्र यश
मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या तीनपैकी दोन आणि पंचायत समितीच्या सहापैकी तीन जागांवर यश मिळविले. मुळशीत मान हिंजवडी या गटात भाजपचे शिवाजी बुचडे हे विजयी झाले. आतापर्यंत या तालुक्यात भाजपला शिरकाव करता आला नव्हता.

