राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दिल्लीही हळहळली. बुधवारी सकाळी (२८ जानेवारी, २०२६) अजित पवार यांच्या अपघाताची बातमी समोर येताच दिल्लीतील पक्ष कार्यालयात नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा ओघ वाढला. दिल्लीतील ७९, नॉर्थ अव्हेन्यू येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. ‘अजितदादा’ सोडून गेले यावर विश्वासच बसत नाही, अशी भावना कार्यकर्त्यांची होती. कार्यालयात जमा झालेल्या सगळ्यांनाच धक्का बसला होता.
पक्ष विस्तारासाठी नियोजन
राष्ट्रवादीच्या कार्यालयात जमा झालेल्या नेते व कार्यकर्त्यांनी पाच महिन्यांपूर्वीच अजितदादा पक्ष कार्यालयात येऊन गेले होते, त्यावेळच्या आठवणी सांगितल्या. “दिल्लीत पक्षाचा विस्तार करण्यासाठी अजितदादांनी काही नियोजन केले होते. त्यांच्या नियोजनावर आम्ही चर्चा केली होती. दिल्लीत पक्ष कसा वाढवता येईल, तसेच दिल्लीत होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा झाली होती. देशाच्या राजधानीत पक्षाचा विस्तार करण्यासाठी अजितदादांनी मोठे नियोजन केले होते.”, असे राष्ट्रवादीचे सरचिटणीस व प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव म्हणाले.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्यालयात मागील वर्षी २२ जुलै रोजी मोठे बॅनर लावण्यात आले होते. त्या बॅनरसमोर अजित पवार यांचा एक फ्रेम केलेला फोटो ठेवण्यात आला. त्या फोटोला दिल्लीतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पुष्प वाहून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
“बंधू पाया पडत नाहीत, तर मिठी मारतात”
“आम्ही आमचे मार्गदर्शक गमावले आहेत. मला आठवतं एकदा मी त्यांच्या पाया पडण्यासाठी वाकलो, त्यावेळी त्यांनी मला वर उचलून मिठी मारली. ते म्हणाले मी तुमच्या भावासारखा आहे. बंधू पाया पडत नाहीत, तर मिठी मारतात”, अशी आठवण दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख विरेंद्र सिंह यांनी सांगितली. “राष्ट्रीय पातळीवर पक्षाला कसं वाढवता येईल याचा ते नेहमी विचार करायचे. आपण कुठेही काम करत असलो तरी लोकांची नेहमी सेवा केली पाहिजे, असे ते सांगायचे”, असे सिंह म्हणाले.
“पक्षासाठी इतकी तळमळ की मध्यरात्रीही करायचे फोन”
“ते खूपच मेहनती होती. पक्षासाठी काम करणं त्यांनी थांबवलं असं कधीच झालं नाही. कधीकधी ते मध्यरात्रीनंतर मला फोन करायचे. पक्षाचे कार्यक्रम तसेच बैठक घेण्याबाबत सूचना करायचे. त्यांच्यासारखी समर्पण वृत्ती खूपच दुर्मिळ होती”, अशी एक आठवण विरेंद्र सिंह यांनी सांगितली. दिल्लीतील पक्ष कार्यालयात जमा झालेले नेते व कार्यकर्ते अजित पवार यांच्या आठवणी एकमेकांना सांगत होते. तसेच त्यांच्या दुर्मिळ स्वभावावर चर्चा करत होते.
दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीचे सदस्य कुलदीप के. बुजू म्हणाले, “अजित पवार हे संवेदनशील होते. ते स्पष्टवक्ते होते. त्यांच्याबरोबर काम केलेले लोक त्यांच्या या स्वभावाला कधीही विसरून शकणार नाहीत. मी त्यांना पुन्हा कधीच बघू शकणार नाही, यावर मला विश्वास बसत नाहीये.”
राष्ट्रवादीचे सरचिटणीस व प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव म्हणाले , सध्याच्या परिस्थितीत राजकारणाविषयी व पक्षाचे काय होईल हा विचार करणे खूप घाईचे ठरेल. आम्ही अजितदादांच्या अंत्यविधीसाठी बारामतीला जात आहोत. पुण्यापर्यंत विमानाने गेल्यानंतर तिथून बारामती जाणार आहोत. पक्षाचं काय होईल याबद्दल बोलण्याची सध्या ही वेळ नाही. सध्या अजित दादांसाठी प्रार्थना करण्याची ही वेळ आहे.
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी (२८ जानेवारी, २०२६) मुंबई ते बारामती हा ३५ मिनिटांचा प्रवास अखेरचा ठरला. या ३५ मिनिटांच्या हवाई प्रवासाचा शेवट एका भीषण अपघातात झाला. त्यात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्वच पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार लिअरजेट -४५ या चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते. या विमानाचा नोंदणी क्रमांक VT-SSK होता. दिल्लीतील खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या VSR व्हेन्चर्स या कंपनीच्या मालकीचे ते विमान होते. विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी बारामतीकडे उड्डाण केले होते. बारामती विमानतळाची ‘धावपट्टी ११’ जिथून सुरू होते त्या ठिकाणी ८ वाजून ४४ मिनिटाला विमानाचा अपघात झाला. त्यानंतर आगीचा लोट दिसून आला. विमानतळावरील आपात्कालीन यंत्रणांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व इतर चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला.
घड्याळामुळे पटली मृतदेहाची ओळख
अजित पवार यांची ओळख त्यांच्या मनगटी घड्याळावरून पटली, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अपघातानंतर आगीने पूर्णपणे वेढलेल्या लिअरजेट विमानाचे अवशेष सर्वत्र विखुरलेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मदतीसाठी घटनास्थळी धाव घेणार्या ग्रामस्थांच्या मते, मनगटी घड्याळामुळेच अजित पवार यांची ओळख पटली. समाजमाध्यमावर एक चित्रफीत समोर आली असून, त्यात एक व्यक्ती भाजलेल्या मृतदेहाच्या मनगटावरील घड्याळ दाखवत, संबंधित मृतदेह अजित पवार यांचा असल्याचा दावा करताना दिसतो. या दुर्घटनेत इतर मृतांमध्ये वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव आणि विमानसेविका पिंकी माली यांचा समावेश आहे.

