राजगोपाल देवरा
आज जयंतीनिमित्त महाराष्ट्र अजित पवार यांचे स्मरण करतोय. सरकारमध्ये मला अजित पवार यांच्याबरोबर जवळून काम करण्याची संधी मिळाली होती. ते मला आज आठवतंय. महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासनिक वर्तुळात तीन दशकांहून अधिक काळ अजितदादांनी महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. अजितदादांवर ज्या विविध जबाबदाऱ्या होत्या त्यामुळे मी प्रभावित झालो नाही, तर त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या शैलीने मला प्रभावित केले होते.
त्यांच्यातील एक गुण तात्काळ आठवतो – तो म्हणजे त्यांना असलेला वेळेबाबतचा आदर. अजितदादांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठका अत्यंत काटेकोरपणे व्हायच्या. जर एखादा अधिकारी किंवा मंत्री बैठकीत आलेला नसेल तर अजितदादा सहजपणे फोन हातात घ्यायचे व त्यांच्याशी संपर्क साधायचे. उगीचच रूबाब झाडण्याचा त्यात कधीच लवलेश नसायचा. शांतपणाने ते संवाद साधायचे. जे बैठकीत उशीरा यायचे, त्यांच्याकडे पाहण्याआधी अजितदादा भींतीवरील घड्याळाकडे पाहायचे व नंतर त्यांच्याकडे पाहायचे. बऱ्याचदा असे करताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असायचे. जास्त काही बोलायची त्यांना गरज पडत नव्हती. सविस्तर माहिती घेण्यावर त्यांचा विशेष भर असायचा हे मी त्यांच्याबरोबर काम करताना अनुभवले.
वडाळा येथे जीएसटी भवनचे नियोजन करताना चर्चा झाली. त्या चर्चेत सामान्य गोष्टींपेक्षा इतर महत्वाच्या गोष्टींवर व्यापक स्वरूपात चर्चा झाली. स्वच्छता गृहाचा आकार किती असावा, अपंग व्यक्तींसाठी कोणत्या सुविधा असाव्यात तसेच तिथे भेट देणाऱ्या नागरिकांना सगळे सोईस्कर कसे असावे यावर चर्चा झाली. राष्ट्रीय स्मारके आणि जनतेसाठी महत्त्वाचे असलेले प्रकल्प यांवरही त्यांचे लक्ष अशाच प्रकारचे असायचे.
महाराष्ट्राच्या सहकार चळवळीबाबतची त्यांची वचनबद्धता अशाच प्रकारची होती. मी महाराष्ट्राचा सहकार आयुक्त असतानाच्या कार्यकाळात आम्हाला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेबाबत कठीण निर्णय घ्यावे लागणार होते. नाबार्डने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निरीक्षण नोंदवले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संमतीने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. साहजिकच, अजितदादा निराश झाले होते. एक राजकीय वादळ येणार असल्याची चर्चाही त्यावेळी होती. पण, त्यानंतर जे काही झाले त्याने मी प्रभावित झालो. पुढील काही वर्षांत बँकेची आर्थिक स्थिती मजबूत होत गेली. घेतलेल्या निर्णयाची त्यांनी (अजितदादांनी) प्रशंसाही केली. काही व्यक्तींना संरक्षण देण्यापेक्षा संस्थेचे रक्षण करणे अधिक महत्त्वाचे होते, हे त्यांनी मान्य केले. एखाद्या कठीण निर्णयाचा पुन्हा विचार करून त्या निर्णयाची प्रशंसा करणे हा एखाद्या नेत्यातील दुर्मिळ गुण आहे.
अजितदादांबद्दल मला सर्वात जास्त काय आठवते असे जर कोणी विचारले तर मी सांगेन की त्यांची एक प्रेमळ कृती. कधीतरी त्यांनी निरीक्षण केले की त्यांच्या सकाळच्या होणाऱ्या बैठकीत मंत्रालयाच्या कॅन्टीनमधला एक विशिष्ट पदार्थ मला आवडतो. जेव्हा जेव्हा मी त्यांच्या सकाळच्या बैठकीत उपस्थित होतो तेव्हा त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याने, मंत्रालयातील स्टाफला तो पदार्थ माझ्या ताटात वाढण्यासाठी खुणावले होते. ही त्यांची एक सांगण्याची पद्धत होती, की “मला लक्षात आहे.” आता ते आठवताना मला लक्षात येतंय की त्यांची ही कृती त्या पदार्थाबाबतची नव्हती. त्यातून त्यांची लोकांचे निरीक्षण करण्याची क्षमता दिसून येते. लोकांच्या बाबतीतली छोटीशी माहितीही लक्षात ठेवणे आणि ते त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत, ही जाणीव त्यांना करून देणे हा गुण अजितदादांमध्ये होता.
अनेक नेते त्यांनी घेतलेल्या निर्णयांसाठी ओळखले जातात. काही नेते त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांसाठी ओळखले जातात. आज महाराष्ट्र अजितदादांचे स्मरण करत असताना, एक शिस्त असलेला प्रशासक, सरकारमधील एक परफेक्शनिस्ट आणि एक नेता ज्याने त्याच्या सार्वजनिक जीवनातील दबावामुळे त्याच्यातील माणुसकी कधीही कमी होऊ दिली नाही, माझ्यासाठी हेच खरे अजितदादा होते.
राजगोपाल देवरा
(लेखक माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरणाचे विद्यमान सदस्य आहेत.)
