दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार होते, परंतु, त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे आता दोन्ही पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार होते. दोन्ही पक्षाच्या एकत्री‍करणासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी तयार केली जात होती. त्यासाठी दोन्ही पक्षांतील महत्वाच्या नेत्यांमध्ये बैठक होत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा

बुधवारी ( २८ जानेवारी, २०२६) मुंबईहून बारामतीला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. अजित पवार यांच्यासह इतर चार जणांचा अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होणार होता. सध्या शरद पवार हे महाविकास आघाडीतील घटक आहेत. शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस यांच्याबरोबर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या महाविकास आघाडीत आहे.

अजित पवारांचा पुढाकार

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रीत यावे, यासाठी अजित पवार स्वत: पुढाकार घेत होते, अशी माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत संवाद सुरू होण्यात अजित पवारांनी महत्वाची भूमिका बजावली होती. शरद पवार यांच्या पक्षाशी सुरू असलेल्या वाटाघाटीत अजित पवार स्वत: सहभागी होते.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला याबाबत माहिती दिली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार होते, याला दोन्ही नेत्यांनी दुजोरा दिला आहे. तसेच एकत्रीकरणाची चर्चा खूप पुढे गेली होती, असे दोन्ही नेते म्हणाले. दरम्यान, एकत्रीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून त्याआधी मंत्रिमंडळात फेरबदल होणार होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सतत बैठका होत होत्या – जयंत पाटील

अजित पवार यांच्या निधनामुळे आमच्या सगळ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील म्हणाले, “अलिकडच्या काळात आमच्या (दोन्ही पक्षांच्या) सतत बैठका होत होत्या. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत १६ जानेवारीला माझ्या घरी चर्चा झाली होती. त्यानंतर आम्ही शरद पवार यांच्या निवासस्थानी १७ जानेवारी रोजी बैठक घेतली होती.”

“महानगरपालिका निवडणुकांनंतर आपण एकत्र येऊ शकतो” – अजित पवार

दोन्ही पक्षांमध्ये एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, या बातमीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही दुजोरा दिला. ते म्हणाले, “आता खरं बोलणं आवश्यक आहे. महानगरपालिका निवडणुकांनंतर आपण एकत्र येऊ शकतो, असं अजित पवार म्हणाले होते. या विषयावर बैठका पण घेण्यात आल्या. शरद पवार यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून अजितदादा तसं म्हणाले होते. आम्ही त्या दृष्टीने आता पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

नुकत्याच पार पडलेल्या पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसेच दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे टाळले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

८ फेब्रुवारीला होणार होती घोषणा

दरम्यान, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढवणार होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याआधी हा प्रयोग केला जाणार होता. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या आधीच्या रणनीतीचा हा भाग होता. ग्राऊंडला काय परिस्थिती आहे, त्याचा अंदाज घेण्यासाठी तसे केले जाणार होते. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची घोषणा केली जाणार होती.”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या एका नेत्याने दिली आहे. ८ फेब्रुवारी रोजी याबाबत घोषणा केली जाणार होती, असे त्या नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी (२८ जानेवारी, २०२६) मुंबई ते बारामती हा ३५ मिनिटांचा प्रवास अखेरचा ठरला. या ३५ मिनिटांच्या हवाई प्रवासाचा शेवट एका भीषण अपघातात झाला. त्यात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्वच पाच जणांचा मृत्यू झाला. विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी बारामतीकडे उड्डाण केले होते. बारामती विमानतळाची ‘धावपट्टी ११’ जिथून सुरू होते त्या ठिकाणी ८ वाजून ४४ मिनिटाला विमानाचा अपघात झाला. त्यानंतर आगीचा लोट दिसून आला. विमानतळावरील आपात्कालीन यंत्रणांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व इतर चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला.