पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत चाचपणी करा आणि ठरवा’,…’ झालं गेलं गंगेला मिळालं; माझंही पवारसाहेबांवर प्रेम आहे,’…. या दोन वक्तव्यांनी महायुतीमधील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस या दोन पक्षांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजित पवार हे कोणता निर्णय घेणार, याकडे या दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांशी संवाद आणि आढावा बैठका सुरू केल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका; तसेच जिल्हा परिषद या निवडणुकीच्यादृष्टीनेही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. गेल्या शनिवारी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या सर्व जागांवर निवडणुका लढवण्याच्या दृष्टीने’ मिशन १६५’ जाहीर केले.

मात्र, बुधवारी घेतलेल्या बैठकीमध्ये त्यांनी ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादीं’नी एकत्र लढण्याबाबत चाचपणी करा आणि ठरवा’ असा आदेश दिला. गुरुवारी बारामतीमधील पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी भावनिक आवाहन केले. ‘झालं गेलं गंगेला मिळालं. माझंही पवार साहेबांवर प्रेम आहे. बेरजेचे राजकारण करा’ असे वक्तव्य केले.

अजित पवार यांच्या या दोन वाक्यांनी दोन्ही ‘राष्ट्रवादी’बरोबरच प्रामुख्याने महायुतीतील पुण्यातील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस या पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पुण्यात भाजपची स्वबळावर तयारी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने इच्छुकांशी स्थानिक नेत्यांनी बोलणी केली आहेत. महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वबळावर लढणार, असा भाजपचा कयास आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाबाबत वक्तव्य केल्याने भाजपाला प्रत्येक प्रभागनिहाय रणनीती बदलावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे सध्या संशयाने पहात असल्याची राजकीय चर्चा आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाविकास आघाडीतील काँग्रेसची अडचण होणार आहे. सध्या पुण्यातील काँग्रेस कमकुवत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाची काँग्रेसला साथ आवश्यक झाली आहे. मात्र, या पक्षाने साथ सोडली तर काँग्रेसपुढे प्रश्न निर्माण होणार आहे. पुण्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाची ताकद दुभंगली गेली आहे.

अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास आघाडीतील प्रामुख्याने काँग्रेसवर हतबल होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे संशयाच्या नजरेने पाहू लागली आहे.

महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्ष आणि महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे ) पक्ष या दोन्ही पक्षांना आपापल्या मित्रपक्षांचे पाठबळ अवश्यक झाले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यांनी दोन्ही शिवसेना सध्या बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपापल्या ‘राष्ट्रवादी’च्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत संशयकल्लोळाचे वातावरण निर्माण झाले आहे.