UP Election 2027 : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी आता काहीच महिने शिल्लक राहिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षाने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पारंपरिक मतांच्या समीकरणांपलीकडे जात, पक्षाचा जनाधार अधिक व्यापक करण्यासाठी आणि नव्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष रणनीति आखली आहे.
समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पक्षाचे नेतृत्व डिंपल यादव यांना प्रचाराच्या पहिल्या फळीत सक्रीयपणे पुढे आणत आहे. डिंपल यादव या भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक प्रचाराला अचूक उत्तर देत आहेत. तसेच, त्या जुन्या जातीय समीकरणांच्या भिंती ओलांडून नव्या मतदारांना पक्षाशी प्रभावीपणे जोडत आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाची पारंपरिक प्रतिमा वेगाने बदलत आहे. म्हणूनच २०२७च्या निवडणुकीत समाजवादी पक्षासाठी ‘डिंपल मॅथ’ महत्त्वाचं ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
डिंपल यादव यांच्यावरच समाजवादी पक्षाचा भर का?
समाजवादी पक्षाकडून डिंपल यादव यांना पुढे आणण्यामागे काही महत्वाची कारणं आहेत
महिला मतदार वर्गावर भर :
समाजवादी पक्षाला आतापर्यंत महिला मतदारांचा मोठा आणि स्थिर पाठिंबा मिळवण्यात अपेक्षित यश आलेलं नाही. त्यामुळे भाजपाच्या महिला-केंद्रित योजनांना आणि प्रचाराला उत्तर देण्यासाठी डिंपल यादव यांचा महिला चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार आहेत.
समाजवादी पक्ष सत्तेत आल्यास पात्र महिलांना दरवर्षी ४० हजार रुपये देण्याचं आश्वासन असलेल्या ‘स्त्री सन्मान समृद्धी योजने’चा डिंपल यादव प्रचार करत आहेत. त्याचबरोबर महिला सुरक्षा आणि लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यावरून त्या योगी आदित्यनाथ सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या माध्यमातून समाजवादी पक्षाला महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि संवेदनशील पर्याय म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जेन झी आणि तरुणांसाठी सौम्य आणि आधुनिक चेहरा :
समाजवादी पक्षाची ओळख आतापर्यंत प्रामुख्याने पारंपरिक राजकीय आणि जातीय समीकरणांशी जोडली गेली आहे. मात्र, डिंपल यादव यांची आधुनिक आणि शहरी प्रतिमा पक्षाला तरुण मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. सोशल मीडियावर त्यांची सक्रीय उपस्थिती, विशेषतः इन्स्टाग्राम आणि फेसबूकवरील रील्स, यामुळे त्या तरुणांपर्यंत सहज पोहोचत आहेत. स्पर्धा परीक्षा आणि पेपरफुटीसारख्या गंभीर प्रश्नांवर त्या भूमिका मांडत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाताही त्या सहभाग घेत असल्याने पक्ष जेन झी तरुणांवर प्रभाव पाडत असल्याचे चित्र दिसून येते
राष्ट्रीय पातळीवर पोहोच आणि संसदेतला प्रभाव :
डिंपल यादव या विद्यमान लोकसभा खासदार असल्याने त्यांना संसदेत आणि संसद भवनाबाहेरही आपली भूमिका मांडण्याची संधी मिळते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील स्थानिक प्रश्न राष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी समाजवादी पक्षाला एक प्रभावी व्यासपीठ मिळतं. राजकीय निरीक्षकांच्या मते, यामुळे अखिलेश यादव यांच्या राज्यातील मुद्द्यांना राष्ट्रीय पातळीवरही अधिक प्रसिद्धी आणि राजकीय वजन मिळू शकतं
‘पीडीए’चं समीकरण आणखी विस्तारण्याचा प्रयत्न :
अखिलेश यादव पीडीए (पिछडा, दलित, अल्पसंख्याक) म्हणजेच मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक मतदारांना पक्षाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी डिंपल यादव यांच्या माध्यमातून या पारंपरिक मतदारवर्गाच्या पलीकडे जाऊन शहरी, मध्यमवर्गीय आणि समाजवादी पक्षाला सहसा पाठिंबा न देणाऱ्या मतदारांनाही जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. राजकीय निरीक्षकांच्या मते, जातीय समीकरणं आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन या मतदारांना जोडण्यासाठी डिंपल यादव महत्त्वाचा दुवा ठरू शकतात.
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत उत्सुकता कायम :
डिंपल यादव यांना भविष्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणलं जाईल की नाही, याबाबतच्या चर्चांवर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांनी याबाबत विचारलं असता अखिलेश यादव यांनीही यावर भाष्य करणं टाळलं आहे. निरीक्षकांच्या मते, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत जाणीवपूर्वक अनिश्चितता कायम ठेवली जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता टिकून राहते आणि भाजपालाही समाजवादी पक्षाच्या पुढील भूमिकेचा अंदाज लावणं कठीण होतं. त्यामुळे डिंपल यादव यांच्याबाबत स्पष्ट संकेत न देण्याचा अखिलेश यादव यांचा निर्णय ही देखील एक विचारपूर्वक राजकीय रणनीति मानली जात आहे.
