उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठी येत्या १६ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. त्याकरिता भाजपाने आपल्या आठ उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली आहे. महत्वाची बाब म्हणजे, सत्ताधारी पक्षाने कार्यकाळ संपत असलेल्या एकाही विद्यमान सदस्याला नव्याने उमेदवारी दिली नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि राज्यमंत्री बीएल वर्मा यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या यादीत त्यांची नावे नसल्याने आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळातही फेरबदल होण्याची शक्यता आहे. यादरम्यान राज्यसभा निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का देण्यासाठी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रणनीती आखली आहे, त्याविषयी…
भाजपाचे उत्तर प्रदेशातील समीकरण काय?
भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत तीन ओबीसी, दोन ब्राह्मण, दोन दलित आणि एका ठाकूर समाजातील उमेदवाराचा समावेश आहे. रिक्त होणाऱ्या आठ जागांवर यापूर्वी दोन ओबीसी, दोन ठाकूर, दोन ब्राह्मण, एक दलित आणि एका शीख समाजाच्या सदस्याचे प्रतिनिधित्व होते. त्यामुळे नव्या यादीत ओबीसी आणि दलित समाजाचा वाटा वाढवण्यात आला आहे. ओबीसी समाजातील उमेदवारांमध्ये धर्मपाल सिंह यांचा समावेश आहे. सध्या ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात पशुपालन आणि दुग्धविकास खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना लोध समाजाचे नेते बी. एल. वर्मा यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड आणि रोहिलखंड भागात लोध समाजाचा प्रभाव असून त्यांनी पारंपरिकरित्या भाजपाला पाठिंबा दिला आहे.
राज्यसभेत भाजपाची जातीय गणिते काय?
भाजपाच्या यादीतील अन्य दोन ओबीसी उमेदवारांमध्ये प्रकाश पाल आणि श्रुती गंगवार यांचा समावेश आहे. प्रकाश पाल हे पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असून ते कानपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, तर आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या श्रुती गंगवार या झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांच्या कन्या आहेत. त्याशिवाय दोन ब्राह्मण उमेदवारांमध्ये राधाकांत ओझा आणि गोपी कृष्ण पांडे यांचा समावेश आहे. प्रयागराजचे रहिवासी असलेले राधाकांत ओझा हे व्यवसायाने वकील असून माजी मंत्री शिवकांत ओझा यांचे ते धाकटे बंधू आहेत, तर कानपूरचे गोपी कृष्ण पांडे यांनी भाजपाच्या शेतकरी आणि युवा आघाड्यांमध्ये काम केले आहे. भाजपाने दोन दलित नेत्यांनाही राज्यसभेसाठी संधी दिली आहे. त्यामध्ये बाराबंकीच्या माजी खासदार प्रियंका सिंह रावत आणि जौनपूरचे माजी विधान परिषद सदस्य विद्यासागर सोनकर यांचा समावेश आहे. प्रियंका या भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष असून विद्यासागर सोनकर यांनी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. यादरम्यान भाजपाचे राज्यसभेचे आठवे उमेदवार राम प्रताप सिंह चौहान हे आग्रा येथील माजी आमदार आहेत. सध्या ते पक्षाचे प्रदेश सरचिटणीस असून पश्चिम उत्तर प्रदेशाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. भाजपा अनेक महत्त्वाच्या निवडणूक प्रचार मोहिमांमध्ये त्यांनी भूमिका बजावली आहे.
राज्यसभा निवडणुकीत चुरशीची लढत
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या १० पैकी तब्बल आठ जागांवर भाजपाचे खासदार होते. त्यामध्ये हरदीप सिंह पुरी, अरुण सिंह, गीता शाक्य, नीरज शेखर, बृजलाल, बी. एल. वर्मा, दिनेश शर्मा आणि सीमा द्विवेदी यांचा समावेश आहे. दिनेश शर्मा यांची गेल्या महिन्यात अंदमान-निकोबार बेटांचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेची जागा सोडली. उर्वरित सात खासदारांपैकी एकालाही भाजपाने पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. दुसरीकडे- राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांचे काका आणि ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांचा कार्यकाळही पुढील महिन्यात संपत आहे. याशिवाय सपाने रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारी धनराज नथवाणी यांना आपले दुसरे उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार सपाचे हे दोन्ही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दरम्यान, बहुजन समाज पार्टीचे संसदेतील एकमेव प्रतिनिधी रामजी गौतम यांचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यसभेची आणखी एक जागा रिक्त होणार आहे.
दहाव्या जागेसाठी चुरस; समीकरणे काय?
विधानसभेतील संख्याबळानुसार राज्यसभेत भाजपाचे सात आणि समाजवादी पार्टीचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. मात्र, अखिलेश यादव यांनी आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी केल्याने उर्वरित एका जागेसाठी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. सध्या ४०३ सदस्यांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत ३९६ आमदार आहेत. या गणितानुसार प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची ३७ मते आवश्यक असतील. समाजवादी पार्टीकडे १०१ आमदार असले, तरी त्यांच्या एक आमदार पूजा पाल या भाजपामध्ये दाखल होऊन पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष झाल्या आहेत. विधानसभा नोंदीनुसार पूजा अजूनही सपाच्या सदस्य असल्या, तरी प्रत्यक्षात सपाकडे १०० आमदारांचे संख्याबळ उरते. काँग्रेसच्या दोन आमदारांचा पाठिंबा गृहीत धरल्यास सपाकडे एकूण १०२ मते होतात. त्यामुळे तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सपाला पहिल्या पसंतीच्या आणखी ९ मतांची गरज भासणार आहे.
भाजपाचे संख्याबळाचे गणित काय?
उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपाकडे २५५ आमदार आहेत. त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर मित्रपक्षांच्या ३३ आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे. त्यामध्ये अपना दलाचे १३ आमदार, राष्ट्रीय लोकदलाचे ९ आमदार, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे ६ आणि निषाद पक्षाच्या ५ आमदारांचा समावेश आहे. त्याशिवाय इतर बंडखोर आमदारांचाही भाजपाला पाठिंबा मिळू शकतो. या सर्वांचा विचार केल्यास एनडीएचे प्रभावी संख्याबळ २९४ आमदारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपाच्या आठही उमेदवारांना विजयी करण्यासाठी आवश्यक असलेल्या २९६ पहिल्या पसंतीच्या मतांपेक्षा हे संख्याबळ दोन मतांनी कमी आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी ३७ पहिल्या पसंतीची मते आवश्यक आहेत. दरम्यान, भाजपाने राकेश पांडे, विनोद चतुर्वेदी आणि आशुतोष मौर्य या आमदारांवरही आपली भिस्त ठेवली आहे. या तिघांनीही २०२४ च्या राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात मतदान केले होते. मात्र, अखिलेश यादव यांनी चांगल्या वर्तणुकीच’ दाखला देत त्यांची सपामधून हकालपट्टी केली नाही. त्यामुळे विधानसभा नोंदींमध्ये ते अद्याप सपाचे आमदार म्हणूनच दाखवले जात आहेत. त्यामुळे भाजपाचा राज्यसभेतील आठवा उमेदवार विजयी होणार की अखिलेश यादव राजकीय समीकरणे बदलून टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
