अकोला : महापालिका निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये तिरंगी व चौरंगी लढतीची चुरस दिसून येते. शहरातील हिंदुत्ववादी व मुस्लीम बहुल भागांमध्येही मतविभाजन अटळ असून भाजप व काँग्रेससाठी ही मोठी अडचण ठरू शकते. मतांच्या ध्रुवीकरणात विजयाचे गणित जुळवण्याची नेत्यांची धडपड सुरू आहे. बहुमताचे समीकरण साधण्यासाठी राजकीय डावपेच आखले जात असून ते कितपत यशस्वी होतात, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
अकोला महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये मतांसाठी लढाई सुरू झाली. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला महापालिकेत वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. २०१७ च्या निवडणुकीत ८० पैकी ४८ जागा जिंकून भाजपने एकतर्फी झेंडा फडकावला होता. आता भाजपने ‘साठी’चे लक्ष्य ठेवले. गेल्या नऊ वर्षांत पुला खालून बरेच पाणी वाहून गेले.
विधानसभा निवडणुकीत ‘अकोला पश्चिम’मध्ये मतविभाजनामुळेच भाजपचा २९ वर्षांचा बालेकिल्ला ढासळला. महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम होऊ शकतात. मतविभाजन हा कळीचा मुद्दा असून प्रदेश निवडणूक प्रभारी तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील त्यावर भाष्य करावे लागले. या निवडणुकीत महायुती होऊ शकली नाही. भाजप व राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढत असली तरी शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर दंड थोपाटत मित्र पक्षाला आव्हान दिले. शिवसेना ठाकरे गटही स्वतंत्रपणे मैदानात आहे. वंचित आघाडीचा देखील काही प्रभागात प्रभाव दिसून येतो. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांची फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते मतविभाजन टाळण्याचे पुरेपूर प्रयत्न भाजप नेतृत्वाकडून केले जात आहेत.
दुसरीकडे ‘अकोला पश्चिम’मधील मुस्लीम बहुल प्रभागांमध्ये काँग्रेसपुढे अडचणींचा डोंगर आहे. उमेदवारीवरून काँग्रेस पक्षांतर्गत प्रचंड नाराजी पसरली. उमेदवारीसाठी डावल्याने अनेकांनी वेगळ्या पक्षांची वाट निवडली. मुस्लीम बहुल प्रभागात काँग्रेसपुढे ‘एआयएमआयएम’, राष्ट्रवादी अजित पवार गट व वंचितचे मोठे आव्हान उभे केले. मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार असून त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो. विधानसभा निवडणुकीत काठावर मिळालेल्या यशानंतर काँग्रेस पक्षासह नेते हुरळून गेले.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसने मुस्लीम बहुल प्रभागांवरच अधिक लक्ष केंद्रित करतांना शहरातील उर्वरित प्रभागांकडे दुर्लक्ष केले. त्या प्रभागांमध्ये सुद्धा काँग्रेसला अस्तित्वाची लढाई लढावी लागेल. ‘एआयएमआयएम’ पक्षाने ३२ उमेदवार रिंगणात देऊन काँग्रेसच्या नाकी नऊ आणले. खा. ओवैसी यांनी शहरात दोन सभा घेऊन काँग्रेससह त्यांच्या आमदारांवर निशाणा साधला. शिवाय विधानसभेत उमेदवार न देऊन मोठी चूक केल्याचे सुद्धा म्हटले. ‘एआयएमआयएम’ पक्षालाच तोंड देतांना काँग्रेसची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीसोबतच्या युतीचा कितपत फायदा?
महायुतीच्या बोलणीमध्ये भाजप व शिवसेनेचे जागा वाटपावरून एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाने हातमिळवणी केली. गेल्या वेळेस एकत्रित राष्ट्रवादीच्या पाच जागा असतांना युतीमध्ये भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाला १४ जागा दिल्या. बहुतांश जागा मुस्लीम बहुल भागातील असून त्याच भागात राष्ट्रवादी आपला प्रभाव दाखवू शकेल. नवीन शहरात राष्ट्रवादीचे अपवाद वगळता अस्तित्व सुद्धा नाही. मुस्लीम बहुल भागात मित्र पक्ष लढत आहे, एवढाच काय तो भाजपला दिलासा मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
