अकोला : अकोला महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत खदखद निर्माण झाली. अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आळवला. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटातील वाद उघड झाले असून अनेकांनी राजीनामास्त्र उगारले, तर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. महानगर विकास समितीवर भाजप ‘मेहरबान’ झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची कुजबूज आहे. ‘स्वीकृत’वरून राजकीय पक्षांतील वाद चांगलाच वाढल्याचे चित्र आहे.
अकोला महापालिकेत भाजपप्रणित शहर सुधार आघाडीचे चार, तर काँग्रेसचे दोन, शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीचा प्रत्येकी एक स्वीकृत सदस्याची निवड झाली. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा होती. ‘स्वीकृत’ म्हणून महापालिकेचे सभागृह गाठण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चढाओढ लागून होती. अनेकांनी विविध माध्यमातून मोर्चेबांधणी केली. वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेमुळे मात्र अनेकांना मोठा धक्का बसला. स्वीकृत सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच अंतर्गत नाराजी उफाळून आली.
काँग्रेसने आकाश कवडे, इलीयास खान अलीयार खान यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करताच काँग्रेसमधील अनेकांनी राजीनामे दिले. पक्षातील ज्येष्ठ व वरिष्ठ नेत्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केल्या आहेत. इलीयास खान अलीयार खान हे आमदार साजिद खान पठाण यांचे बंधू, तर आकाश कवडे यांच्या पत्नीने शिवसेना ठाकरे गटाच्या तिकीटावर महापालिका निवडणूक लढवली. आता त्यांना पक्षाने संधी दिल्याने काँग्रेस अंतर्गत तीव्र असंतोषाची भावना व्यक्त होत आहे.
शिवसेना ठाकरे गटातही नाराजी नाट्य दिसून आले आहे. पक्षाने पराभूत झालेल्या उमेदवाराला स्वीकृत म्हणून संधी दिली. आमदार नितीन देशमुख यांनी आश्वासन देऊनही शेवटच्या क्षणी शब्द फिरवल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटातील ‘स्वीकृत’चा वाद थेट ‘मातोश्री’पर्यंत पोहोचला असल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीने ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या गोंडस नावावर माहेश्वरी समाजाचे कोट्यधीश ‘बिल्डर’ सुनील इन्नानी यांना स्वीकृत सदस्य पदावर संधी दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ‘वंचित’च्या भूमिकेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली. शहरातील इमारती, लेआऊट प्रकरणांमध्ये चर्चेत असलेले हे नाव एकदम ‘स्वीकृत’साठी समोर आले कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वंचित, शोषित घटकांना न्यायाची अपेक्षा असतांना या निर्णयामुळे पक्षातील अनेकांनी नापसंती दर्शवली. भाजपने पक्षातील तिघांना संधी देण्यासोबतच चौथी जागा महानगर विकास समितीचे सुनील मेश्राम यांना दिली. महापालिकेच्या निवडणुकीमध्येही भाजपने समितीसाठी चार जागा सोडल्या होत्या. त्यापैकी एकच जागा निवडून आली. त्यानंतर आता स्वीकृत सदस्य पद देखील भाजपने मेश्राम यांना दिले. त्यामुळे भाजप महानगर विकास समितीवर एवढी ‘मेहरबान’ का? असा प्रश्न भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते खासगीत विचारात आहेत. स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून अकोला शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आता अंतर्गत नाराजी मिटवण्याची कसरत नेतृत्वाला करावी लागणार आहे.
सभागृहात ‘खोक्या’च्या घोषणा
महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा केंद्रस्थानी आहेत. अकोला महापालिकेच्या सभागृहात देखील वंचितचे स्वीकृत सदस्य सुनील इन्नानी यांची निवड होताच ‘खोके एकदम ओके’च्या घोषणा काही सदस्यांकडून दिल्या गेल्या. त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
