अकोला : महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या त्रिशंकू कौलानंतर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. त्यावर मात करीत भाजपप्रणित शहर सुधार आघाडीने सत्तास्थापन केली. भाजपविरोधी नगरसेवकांचे एकत्रित मोट बांधण्याचे नेत्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. राजकीय डावपेचात भाजप पुन्हा एकदा वरचढ ठरली. संख्याबळ पाठीशी नसतांना महापालिकेत सत्तास्थापनेचा फाजिल आत्मविश्वासामुळे विरोधक तोंडघशी पडले आहेत. भाजपला सुद्धा ठरवलेले ‘साठी’चे लक्ष्य तर गाठता आले नाहीच, पण बहुमतासाठी देखील इतरांवर अवलंबून रहावे लागले. एकूणच भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांवर मतदारांनी आत्मचिंतनाची वेळ आणली आहे.

अकोला महापालिकेची निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक चुरशीची झाली. ८० जागांसाठीच्या निवडणुकीत मतदारांनी कुठल्याही एका पक्षाला कौल दिला नाही. भाजपने शहर सुधार आघाडी स्थापन करून इतरांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महापालिका निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात युतीमध्ये निवडणूक लढून भाजप ३८, राष्ट्रवादी अजित पवार गट व महानगर विकास समिती प्रत्येकी एक प्रमाणे ४० जागा मिळवल्या. बहुमतासाठी केवळ एका जागेची गरज होती. ती गरज देखील शिवसेना शिंदे गट पूर्ण करणार, हे अगोदरच स्पष्ट होते. त्यामुळे सत्तेच्या दृष्टीने विरोधकांच्या हातात काही नव्हतेच. तरी देखील काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी महापालिकेतील सत्तेचे दिवास्वप्न पाहिले.

भाजप विरोधकांनी सत्ता येणे हे जवळपास अशक्य असल्याचे लक्षात येताच पठाण यांनी कुठलेही पद न घेता काँग्रेस पाठिंबा देईल, अशी भूमिका घेतली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात भाजपविरोधी सर्व नगरसेवकांची मोट बांधण्याचे प्रयत्न झाले. विरोधी आघाडीतील नेत्यांनी अतिआत्मविश्वासात सत्तास्थापनेचा दावा सुद्धा केला. मात्र, विरोधकांच्या बैठकींना हजेरी लावणारे राष्ट्रवादी शरद पवार गट, महानगर विकास समितीचे नगरसेवक भाजपप्रणित आघाडीत सहभागी झाले. विरोधकांसाठी तो धक्का होता. तरीही ४१ चे पाठबळ असल्याच्या वल्गना केल्या. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित आघाडीकडे ४५, तर विरोधकांना केवळ ३२ मते पडली. ‘एआयएमआयएम’च्या तीन नगरसेवकांनी पण विरोधकांची साथ सोडत तटस्थ भूमिका घेतली. अगोदरपासूनच संख्याबळ नाही, हे लक्षात आल्यावरही हा सर्व खटाटोप नेमका कशासाठी? असा प्रश्न निर्माण होतो. मतदारांनी दिलेला कौल मान्य करून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याचे नियोजन करणे अपेक्षित होते. ते सोडून सत्तेसाठी धडपड करणाऱ्या नेत्यांचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले आहेत.

दुसरीकडे भाजपचा सुद्धा संख्याबळामध्ये मोठा अपेक्षाभंग झाला. २०१७ च्या निवडणुकीतील ४८ संख्याबळ आता ३८ वर आले आहे. निवडणूक रिंगणात ६२ उमेदवार उतरवले असतांना साठीपारचे लक्ष्य भाजपने ठेवले होते. मात्र, बहुमताचा आकडा देखील भाजपला गाठता आलेला नाही. सदस्य संख्या दहाने कमी झाली. शिवसेनेसोबतच्या युती अभावी झालेले मतविभाजन, बंडखोरी, उमेदवारी वाटपावरून अंतर्गत नाराजी, पक्षविरोधी कृत्य आदी कारणांचा भाजपला फटका बसला. सत्तास्थापन करण्यासाठी सुद्धा त्यांना इतर नगरसेवकांच्या पाठबळाची गरज लागली. महापालिकेत सत्तास्थापन झाली तरी ‘अकोला पश्चिम’सह सर्वच भागात घसरलेला जनाधार भाजपसाठी चिंतनाचा विषय ठरणार आहे.

खेळीने विरोधकांची दांडी गुल

सत्तास्थापनेच्या हालचालीमध्ये भाजपविरोधी आघाडीने सर्वांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या बैठकीला हजेरी लावणारे नगरसेवक दुसऱ्या दिवशी भाजपप्रणित आघाडीत सहभागी झाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाने थेट भाजपला साथ दिली. ‘एआयएमआयएम’ व अपक्ष नगरसेवकाने भूमिका बदलली. सत्तेसाठीच्या या खेळीने विरोधकांची दांडी गुल झाली.