अलिबाग: अलिबागमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर बंडखोरीच्या तयारीत आहेत. पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने, ते उपलब्ध पर्यायांची चाचपणी करून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. येत्या एक ते दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान महायुतीपूढे असणार आहे.
पक्षनेतृत्वाकडून सन्मान राखला जात नाही म्हणून दिलीप भोईर यांनी दोन वर्षापूर्वी शेकाप सोडून भाजप मध्ये प्रवेश केला होता. यावेळी दिलीप भोईर यांना अलिबागमधून विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली जाईल अशी हमी त्यांना भाजपनेतृत्वाने दिली होती. लोकसभा निवडणूकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अलिबाग येथे आले होते. तेव्हा त्यांनी भोईर यांना विधानसभेला संधी देण्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले होते. पक्षाने मतदारसंघ बांधण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. दोन वर्षात संघटनात्मक बांधणीसाठी भोईर यांनी बरेच प्रयत्न घेतले होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत होते. अलिबागच्या भाजपच्या वॉर रूमची जबाबदारी भोईर यांना देण्यात आली होती. त्यामुळे विधानसभेला पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा भोईर यांना होती.
मात्र यंदाची विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यामुळे अलिबागची जागा ही शिवसेनेला (शिंदे) सुटणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनाच संधी दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भोईर यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे भाजपमध्ये निवडणूकीच्या तोंडावर बंडखोरी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
पक्षाकडून निवडणूक लढविण्याची संधी मिळावी अशी विनंती मी प्रदेश कार्यालयाकडे केली आहे. अजूनही मला संधी मिळेल अशी आशा आहे. आज दिवसभर मी वाट पाहीन, अन्यथा मी उपलब्ध पर्यायांचा वापर करून निवडणुक लढविणार असल्याचे भोईर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महायुतीत बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बंडखोरी थोपवण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर असणार आहे.
हेही वाचा : संदीप नाईक यांचे ‘एकला चालो रे’, समर्थकांना हवी तुतारी… नवी मुंबईतील बंडाची दिशा आज ठरणार ?
भोईर हे आदिवासी आणि कोळी समाजात चांगलेच लोकप्रिय आहेत. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. समाजभान असलेला नेता म्हणून त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे निवडणूकीत त्यांना चांगले यश मिळेल अशी आशा भोईर यांना वाटते आहे. म्हणूनच कुठल्याही परिस्थिती निवडणुक लढवण्यावर भोईर ठाम आहेत.