छत्रपती संभाजीनगर – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या तोंडावर घेरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातील स्थानिक विरोधकांनी मोट बांधून सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष समिती’ हा एक मंच स्थापन केला आहे. या मंचच्या माध्यमातून पीकविम्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परळीत येत्या २३ सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर, बैलगाडीसह ‘शेतकरी हक्क मोर्चा’ काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ‘सर्वपक्षीय’ मंचमध्ये भाजपचे राज्य कार्यकारिणीतील व स्थानिक पातळीवरीलही काही पदाधिकाऱ्यांचा सहभाग असून, त्यांनी मोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीसही त्यांनी हजेरी लावली होती.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सुदामती गुट्टे, ॲड. माधव जाधव, कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष काॅ. अजय बुरांडे, भाजपचे राज्य चिटणीस राजेश देशमुख, भाजपचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, भाजपच्या किसान आघाडीचे उत्तम मानेही या पत्रकार बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पीकविम्याची रक्कम हडप केल्यासह विविध आरोप करत लक्ष्य केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणारा ८०० ते ९०० कोटी रुपयांचा पीकविमा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या ‘खात्या’त जमा झाले आहेत. २०१८ सालच्या पीकविम्याचे ६३ कोटी रुपये परत गेले. २०२० चा पीकविमा बीडच्या शेजारच्या जिल्ह्यांना वाटप झाला. मात्र, बीडमधील शेतकऱ्यांना पीकविमा वाटपच करण्यात आला नाही. पीकविम्याचे गौडबंगाल कृषिमंत्र्यांनी केले, असा आराेप त्यांनी केला.

हेही वाचा – Row Over Marathwada Package : मराठवाडा पॅकेजमधील योजनांच्या अंमलबजावणीवरुन सत्ताधाऱ्यांची कोंडी

ओला दुष्काळ आज आला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कशाचा पक्ष आणि वेळ पाहायला पाहिजे. येथे माझी जात शेतकरी आहे. पक्षाचे जोडे बाहेर ठेवून आम्ही हा मंच स्थापन केला आहे. परळी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकूणच शेतकऱ्यांना जी मंजूर मदत मिळणे अपेक्षित आहे, ती मिळावी, यासाठी या आंदोलनात सहभाग घेतला. – राजेश देशमुख, राज्य सचिव, भाजप.

हेही वाचा – मुक्तीसंग्राम कार्यक्रमाला लातूरमध्ये पालकमंत्र्यांपासून खासदार-आमदारांची दांडी

विरोधकांचे शेतकरी प्रेम पुतणा मावशीचे

पालकमंत्री धनंजय मुंडे हे नियमांच्या पलिकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करत आले आहेत. मदतीत इतर जिल्ह्यांपेक्षा झुकते माप दिले आहे. विमा कंपनीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेणारेही धनंजय मुंडेच आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधक एकवटले असून त्यांचे ‘पुतणा मावशी’चे प्रेम शेतकरी आणि स्थानिक जनतेला समजले आहे. – गोविंदराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट).