scorecardresearch

हिंदुत्वाच्या राजकीय श्रेयाची हंडी फोडण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ

आतापर्यंत सांस्कृतिक उपक्रम राहिलेल्या दहीहंडीला यंदा हिंदुत्वाची वेगळी किनार लाभली असून हिंदुत्वाच्या राजकीय श्रेयाची हंडी फोडण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ दिसत आहे.

हिंदुत्वाच्या राजकीय श्रेयाची हंडी फोडण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ
राजकीय दहीहंडी

प्रसाद रावकर

माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात भाजपने, तर दादरमधील सात प्रभागांमध्ये बंडखोर आमदारांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेला धक्का दिला. या धक्क्यातून सावरत शिवसेनेने वरळी परिसरातील श्रीराम मिल परिसरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तर युवा सेनेने दादर येथे शिवसेना भवनाबाहेर निष्ठा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून बंडखोरांना प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत सांस्कृतिक उपक्रम राहिलेल्या दहीहंडीला यंदा हिंदुत्वाची वेगळी किनार लाभली असून हिंदुत्वाच्या राजकीय श्रेयाची हंडी फोडण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ दिसत आहे. 

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत असत. मुंबईमधील ही मानाची दहीहंडी होती. मात्र दहीहंडीची उंची, थरातील लहान मुलांचा सहभाग याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी जांबोरी मैदानातील दहीहंडी उत्सव बंद केला. दरम्यानच्या काळात सचिन अहिर शिवसेनेत दाखल झाले. यंदा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जांबोरी मैदान आरक्षित करून तेथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेला शह दिला. मुंबईतील अनेक दहीहंडी पथकांनी शुक्रवारी तेथे दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. तर जांबोरी मैदानात भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.

शिवसेनेचे श्रीराम मिलजवळ शक्तीप्रदर्शन

जांबोरी मैदान हातचे गेल्यामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे आमदार सुनिल शिंदे यांनी वरळीतील श्रीराम मिलजवळ दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या उत्सवास आदित्य ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र जांबोरी मैदानातील उत्सव आणि शपथपत्रांवरून नाराजीचा सूर उमटू लागल्याने आदित्य ठाकरे येथे येतील की नाही याबाबत साशंकताच होती. परंतु आदित्य ठाकरे दुपारी उत्सवस्थळी पोहोचले आणि पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेतील अनेक पदाधिकारी या उत्सवात सहभागी झाले होते.

दादरमध्ये बंडखोरांची बाजी

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून दादर परिसर ओळखला जातो. मुंबई महानगरपालिकेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेने शिवसेनेचा हा बालेकिल्ला काबीज केला होता. हा पराभव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता. आता दादर भागातील आमदार सदा सरवणकर बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सरवणकर यांनी दादरमधील मुंबई महानगरपालिकेच्या सात प्रभागांमध्ये दहीहंडी उत्सवांचे आयोजन केले होते. तर बंडखोरांकडून शिवसेना भवनासमोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येऊ नये यासाठी युवा सेनेने काळजी घेतली होती. युवा सेनेने येथे उत्सवाचे आयोजन करण्यासाठी आधीच सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या. युवा सेनेने शिवसेना भवनासमोर निष्ठा दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. 

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All political parties are trying to take political advantage of festivals print political news pkd