आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक महायुतीच्या पॅनलमधून लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरला पडद्यामागून बळ दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली… शिवसेनेतून (उबाठा) बंडखोरी करणाऱ्या खासदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोहीम आखल्याची माहिती समोर आली… ठाकरे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार-खासदार बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली… शिंदेसेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना थेट शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

दानवेंच्या भूमिकेमुळे ठाकरेसेनेत खळबळ

शिवसेना ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते तथा विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक थेट महायुतीच्या पॅनलमधून लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटासह विरोधकांच्या महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली असून ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. अंबादास दानवे यांचा हा निर्णय स्थानिक पातळीवरील असला तरी, चार दिवसांपूर्वी पक्षातून बंडखोरी करणाऱ्या खासदारांवर त्यांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र, आता तेच दानवे भाजप व शिंदेसेनेच्या पॅनलमध्ये दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक असून सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण नसते. या निवडणुकीचा आणि महायुती अथवा पक्षीय राजकारणाचा संबंध नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.

ऑपरेशन टायगरला फडणवीसांचे बळ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेले ऑपरेशन टायगर सुरळीत पार पडले. त्या अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी आपला गट शिंदेसेनेत विलीन केला. या राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई मोलाची ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात ठाकरे गटाचे खासदार फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना भाजपाने सुरुवातीला त्यावर मौन बाळगले होते. त्यानंतर मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सूचक विधान करत धक्का दिला होता. ऑपरेशन यशस्वी झाले असून रुग्ण एकदम सुदृढ आहे, त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी पहिल्यांदाच या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, हे खासदार शिंदेंच्या बाजूने वळवण्यात फडणवीस यांची महत्वाची भूमिका असल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील जवळपास सगळ्याच खासदारांनी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण फडणवीसांनी त्यांचे मन वळवले आणि शिंदेसेनेत प्रवेश करण्याचे सांगितल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

बंडखोरांना फटका देण्याची ठाकरेंची तयारी

शिवसेनेतून (उबाठा) बंडखोरी करणाऱ्या खासदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राजकीय मोहीम आखल्याची माहिती समोर आली. पक्षात दुसऱ्यांदा फूट पडल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातूनच होणार आहे. या दौऱ्याकडे ठाकरे गटाच्या राजकीय प्रतिआक्रमणाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. पक्षातून झालेल्या गळतीनंतर संघटना पुन्हा मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि जनाधार कायम असल्याचा संदेश देणे हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात २७ जूनपासून होणार असून पहिली सभा सकाळी १० वाजता यवतमाळ आणि त्यानंतर दुसरी सभा दुपारी दोन वाजता वाशीम येथे होईल. त्यानंतर तिसरी सभा सायंकाळी हिंगोली येथे होणार आहे. २८ ते २९ जूनला ठाकरे गटाकडून धाराशिव, परभणी आणि शिर्डी येथे शक्तीप्रदर्शन केले जाईल. दरम्यान ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे शिवसेनेला संजीवनी मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार-खासदार फुटणार?

शिवसेना ठाकरे गटापाठोपाठ आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या राजकीय घडामोडीवर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आमचा एकही आमदार आणि खासदार कुठेही जाणार नाही, असे त्यांनी टीव्ही नाईन मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आमदार फुटीच्या चर्चांचे खंडन केले. त्याशिवाय आमदार रोहित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणताही आमदार-खासदार फुटणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. संसदेत मतदारसंघ पुर्नरचना विधेयक बहुमताने मंजूर करण्यासाठी ऑपरेशन टायगरच्या नावाखाली ऑपरेशन बाजार मांडला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. ठाकरे गटाच्या सहा फुटीर खासदारांना ८० ते ९० कोटी रुपयांची रोख रक्कम व अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी मिळाल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.

शिंदेसेनेच्या खासदाराची पत्रकारांनी अरेरावी

शिवसेना ठाकरे गटातून बंड करून शिंदेसेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना थेट अरेरावी आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत संजय पाटील यांना राजीनामा देण्याचे खुले आव्हान दिले. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना संजय पाटील यांनी “माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी एकतर रुग्णालयात पाठवेन नाहीतर स्मशानात पाठवेन. आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत,” अशी उघड धमकी दिली होती. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून संजय पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली. या प्रकरणावर आणि त्यांची मुलगी व ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी संजय पाटील यांनी अत्यंत गैरवर्तन केले. या संपूर्ण प्रकरणामुळे समाजमाध्यमांवर संतापाची लाट उसळली असून ठाकरे गटाचे नेतेही आक्रमक झाले आहेत.