मागील काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. येथे मुख्यमंत्री नितीशकमुार यांनी भाजपाची साथ सोडत जेडीयू, काँग्रेस आणि इतर पक्षांना सोबत घेऊन नव्या सरकारची स्थापना केली. आज (१६ ऑगस्ट) नितीशकुमार यांच्या नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. या सर्व धामधुमीत बिहारमधील सामान्य जनता मात्र बेरोजगारी, महागाई अशा प्रश्नांनी त्रस्त आहे. येथील युवकांना सत्ताबदलापेक्षा नोकरी, वाढती महागाई हे प्रश्न महत्त्वाचे वाटत असून राज्य आणि केंद्र सरकारकडून त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

बिहारमध्ये चहा-पानाच्या दुकानवर, चावडी तसेच चौकांचौकात महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर चर्चा होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पिठावरदेखील जीएसटी लावत आहेत, असे बिहारमध्ये उपहासाने म्हटले जात आहे. हाजीपूरमधील रोजंदारीवर काम करणारे महेश दास यांनी त्यांची व्यथा मांडली आहे. “महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाद्यतेलाचा भाव २०० रुपये प्रतिलिटर झाला आहे. मी दिवसाचे फक्त ३००-४०० रुपये कमवतो. पीठदेखील ३५ रुपये झाले आहे. अशा परिस्थिती मी जिवंत कसा राहू शकेन,” अशी खंत दास यांनी मांडली आहे.

हेही वाचा >>> “बायको जेवढी फुगत नसेल..,” शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या नाराजीवरून सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी

दास यांचा २४ वर्षीय मुलगा जितेंद्र यानेदेखील नोकरीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. तो पदवीधर असून सध्या एका बँकेत ग्राहक सुविधा केंद्रावर काम करतो. “मी जेव्हा जेव्हा सरकारी नोकरीसाठी परीक्षा देतो, तेव्हा प्रत्येक वेळी पेपर फुटतो. परीक्षादेखील उशिरा घेतली जाते. प्रत्येक परीक्षेत गैरव्यवहार केला जातो. पात्रता नसलेल्या लोकांना नोकरी मिळालेली मी माझ्या डोळ्यांसमोर पाहिलं आहे,” असं जितेंद्र यांने म्हटलं आहे.

हेही वाचा >>>Bihar Cabinet Expansion : बिहार राज्य मंत्रीमंडळाचा आज विस्तार, नितीशकुमार यांच्याकडे गृह तर ‘राजद’कडे अर्थमंत्रीपद?

हाजीपूरमधील तेरासिया तोळा या गावातील प्रभू शर्मा नावाच्या व्यक्तीनेदेखील अशीच व्यथा मांडली आहे. “मी शेती विकून माझ्या मुलाला शिकवले आहे. मात्र त्याला नोकरी मिळत नाहीये. तो शेतीदेखील करू शकत नाहीये. याच कारणामुळे आता मी त्याला जगवतोय,” असे शर्मा यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नालंदा जिल्ह्यातील मूळ गावापासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्याशा गावातील शिवम पांडे या २० वर्षीय तरुणाने राजद पक्षाने दिलेल्या १० लाख नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. “राजद पक्षाने १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. सद्या अडीच वर्ष गेली आहेत. हातात अडीच वर्षे आहेत. या अडीच वर्षात त्यांनी दहा लाख सोडा पण ७.५ लाख तरुणांना तरी नोकऱ्या द्यायला पाहिजेत,” असे मत पांडे या तरुणाने व्यक्त केले.

हेही वाचा >>> गुजरात: आप आणि कॉंग्रेस यांच्यात आश्वासने देण्याची चढाओढ

दरम्यान, महागाई आणि बेरोजगारी हे प्रश्न आगामी निवडणुकीत प्रभावी ठरणार आहेत, हे भाजपा आणि जदयूच्या काही नेत्यांनी मान्य केले आहे. “”बिहारमध्ये उद्योग उभारणीसाठी योग्य जागा नाही. आम्ही बंद पडलेल्या साखर कारखान्यांचा वापर करू त्यामध्ये छोटे युनिट्स सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो. या माध्यमातून तरुणांना नोकरी मिळाली असती. मात्र आता आमचे सरकार गेले आहे,” असे एका भाजपा नेत्याने बोलून दाखवले. तसेच भाववाढ हा प्रश्न येथील जनतेला भेडसावत आहे, हे खरे आहे. मात्र मोदी सरकारकडून योग्य त्या उपायोजना केल्या जात आहेत. आगामी काळात याचे चांगले परिणाम दिसतील, असा विश्वासही या नेत्याने व्यक्त केला.

हेही वाचा >>> सावरकर आणि नेहरू; कर्नाटकात रंगला इतिहासावरून राजकीय वाद

तर दुसरीकडे “भाजपा महागाईची मुद्दा टाळू शकत नाही. महागाईवर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. याआधी ते आमच्यासोबत होते. मात्र आता महागठबंधनचे सरकार आले असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न कशा प्रकारे सोडवता येईल, यासाठी चर्चा केली जात आहे,” असे जदयूच्या नेत्याने सांगितले.