रामचरितमानसच्या वादावर आता भाजपाच्या खासदार संघमित्रा मौर्या म्हणतात, वाद नको पण....|Amid Ramcharitmanas row, BJP MP’s advice to party Bada dil karna padega | Loksatta

रामचरितमानसच्या वादावर आता भाजपाच्या खासदार संघमित्रा मौर्या म्हणतात, वाद नको पण….

संघमित्रा मौर्य यांनी आता आपल्या पक्षालाच रामचरितमानसवरून एक सल्ला दिला आहे

What Sangmitra Maurya Said?
भाजपा खासदार संंघमित्रा मौर्य यांनी काय म्हटलं आहे?

उत्तरप्रदेशात रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादामध्ये आता स्वामीप्रसाद मौर्य यांची भाजपा खासदार संघमित्रा मौर्याही उतरल्या आहेत. स्वामीप्रसाद मौर्य यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यावर वाद होण्यापेक्षा चर्चा झाली पाहिजे असं संघमित्रा मौर्य यांनी म्हटलं आहे. काही लोक अकारण हा वाद उकरून काढत आहेत असंही संघमित्रा यांनी म्हटलं आहे. रामचरितमानसवरून उत्तर प्रदेशात वाद निर्माण झाला आहे. आता भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी या प्रकरणात वक्तव्य केलं आहे. आपल्याला मन मोठं करावं लागेल असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच जो वाद घातला जातो आहे त्यापेक्षा इतरही महत्त्वाचे विषय आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

स्वामीप्रसाद मौर्य यांनी काही ओळींवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

सपा नेते आणि आमदार स्वामीप्रसाद मौर्य यांनी रामचरित मानसच्या काही ओळींवर आक्षेप घेतला होता. त्यांनी रामचरितमानस बकवास आहे असंही म्हटलं होतं. तुलसीदासांनी ते आपल्या आनंदासाठी लिहिलं आहे असाही दावा त्यांनी केला होता. एवढंच नाही तर रामचरितमानस मध्ये ज्या काही आक्षेपार्ह ओळी आहेत त्या ओळी सरकारने हटवल्या पाहिजेत. तसं करणं शक्य नसेल तर थेट रामचरितमानसवर बंदी घालावी अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यावरून वाद झाला होता. आता त्यांची मुलगी आणि भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी या विषयावर वाद होण्यापेक्षा सविस्तर चर्चा झाली पाहिजे असं म्हटलं आहे.

संघमित्रा मौर्य यांनी काय म्हटलं आहे?

स्वामीप्रसाद मौर्य यांच्या वक्तव्यावर समाजवादी पक्षाने मौन बाळगलं आहे. मात्र स्वामीप्रसाद मौर्य यांची मुलगी आणि भाजपा खासदार संघमित्रा म्हणाल्या आहेत की या ओळींवर चर्चा झाली पाहिजे तसंच या ओळी का लिहिल्या गेल्या असतील याचं सखोल विश्लेषण झालं पाहिजे. काही लोक अनावश्यक मुद्दे उपस्थित करत आहेत. यापेक्षा महत्त्वाचे प्रश्न राज्यात आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

नेमका आक्षेप काय आहे?

स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे की धर्म कुठलाही असो आम्ही त्या धर्माचा सन्मानच करतो. मात्र धर्माच्या नावावर विशिष्ट जात आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना अपमानित करण्यात आलं आहे. आमचा आक्षेप हा याच गोष्टीवर आहे. रामचरितमानसमध्ये एक चौपाई लिहिली आहे, त्यामध्ये तुलसीदास म्हणतात की शूद्र हे अधम जातीचे आहेत. यापुढे तुलसीदास म्हणतात की ब्राह्मण दुराचारी, निरक्षर असला तरीही तो ब्राह्मण आहे आणि त्यामुळे तो पूजनीय आहे. मात्र शूद्र हा किती ज्ञानी, विद्वान असला तरीही त्याचा सन्मान करू नका. जर असं त्यांचं म्हणणं असेल तर मी अशा धर्माला नमस्कार करतो आणि ही आशा बाळगतो की या धर्माचा सत्यानाश होईल कारण हा धर्म आमचा सत्यानाश करू पाहतो आहे. असंही मौर्य यांनी म्हटलं होतं.

समाजवादी पक्षाचं सूचक मौन

समाजवादी पक्षाने रामप्रसाद मौर्य यांच्या या वक्तव्यावर सोयीस्कर मौन बाळगलं आहे. कारण पक्षाला असं वाटतं आहे की या वक्तव्याच्या दोन बाजू आहेत. त्यातली एक बाजू ही धार्मिक आहे तर दुसरी बाजू ही सामाजिक आहे. समाजवादी पक्षातंर्गत दोन्ही बाजूंचा विचार होतो आहे. पक्षाला एकीकडे असं वाटतं आहे की अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पक्षाचं नुकसान होऊ शकतं. तर दुसरीकडे असं वाटतं आहे की जे काही लिहिलं गेलं आहे त्यावर वाद आणि चर्चा होत असेल तर होऊ द्यावी या निमित्ताने दलित वर्ग चर्चा करण्यासाठी पुढे येत असेल त्यात गैर काहीही नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 19:39 IST
Next Story
काँग्रेसच्या ताब्यातील गुजरातमधलं डेअरीविश्व भाजपाने आपल्या अधिपत्याखाली कसं आणलं?