लातूर – विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र व लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मिळवून दिलेल्या घवघवीत यशामुळे त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसची पाटी कोरी होती. २०२४च्या निवडणुकीच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला त्यामुळे मराठवाड्याच्या काँग्रेसच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली होती. अमित देशमुख यांनी ही पोकळी भरून काढायचे ठरवले. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. महाविकास आघाडीच्या सर्व जागांवर प्रचारासाठी ते गेले. नांदेड, जालना, लातूर याबरोबरच धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर या मतदारसंघांसाठी ते प्रचाराला गेले व सर्वच जागी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. मराठवाड्यात काँग्रेसच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी कोण भरून काढेल असा प्रश्न पडला असताना अमित देशमुख यांनी पुढे होत आपण नेतृत्व करू शकतो हे सिद्ध करून दाखवले.

हेही वाचा – पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा

हेही वाचा – ‘वंचित’ आघाडीची मतांची टक्केवारी निम्म्यावर

मराठवाड्यात यावेळी महाविकास आघाडीने ७ जागा मिळवल्या तर महायुतीला एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने तीन जागा लढवत शंभर टक्के यश मिळवले. अमित देशमुखांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात विश्वास निर्माण केलाच याशिवाय आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्येही स्वतःबद्दलचा विश्वास निर्माण केला. विलासराव देशमुखांच्या नंतर अमित देशमुख यांनी आपल्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा घेत कार्यकर्त्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध करतील याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनातही विश्वास यानिमित्ताने जागवला गेला आहे.