Amit Malviya : दशकभराहून अधिक काळ भाजपाच्या डिजिटल यंत्रणेची कमान सांभाळणाऱ्या अमित मालवीय यांची पक्षाच्या आयटी सेल प्रमुखपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. त्यात भाजपाने आयटी सेलच्या प्रमुखपदी अमित मालवीय यांच्या जागी दीपक म्हस्की यांची नियुक्ती केली आहे. म्हस्की यांच्याकडे पक्षाच्या नव्या सोशल मीडिया संयोजकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने संघटनात्मक फेरबदल केले आहेत. यामध्ये गेल्या ११ वर्षांपासून पक्षाच्या आयटी सेलची धुरा सांभाळणाऱ्या अमित मालवीय यांच्याकडून ही जबाबदारी आता काढून घेण्यात आली आहे. मात्र, मालवीय यांच्या नेतृत्वात भाजपाची डिजिटल यंत्रणा केवळ निवडणूक व्यवस्थेपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती देशातील मोठ्या राजकीय कम्युनिकेशन नेटवर्कपैकी एक बनली.
अमित मालवीय यांनी कॉर्पोरेट क्षेत्र, बँक ऑफ अमेरिका आणि एचएसबीसीमध्ये काम केल्यानंतर २०१५ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना पक्षाच्या संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाली. पक्षाची डिजिटल यंत्रणा मजबूत करणे आणि सोशल मीडियावरील भाजपाची उपस्थिती वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
भाजपाची डिजिटल यंत्रणा बूथ स्तरापर्यंत पोहोचवली
अमित मालवीय यांच्या कार्यकाळात केंद्रीय नेतृत्वाच्या सोशल मीडिया पोस्टपासून ते तळगाळापर्यंत भाजपाच्या डिजिटल यंत्रणेचा विस्तार झाला. २०१९ मध्ये मालवीय यांनी नमूद केले होते की, भाजपाकडे सुमारे १२ लाख सोशल मीडिया स्वयंसेवक आहेत.
२०१३ पासून विविध मिस्ड कॉल मोहिमांद्वारे पक्षाने सुमारे २५ कोटी लोकांचा डेटाबेस तयार केला होता. या माहितीचं बूथ स्तरावर वर्गीकरण करण्यात आलं आणि सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला.
भाजपाची डिजिटल यंत्रणा केवळ पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सपुरती मर्यादित राहिली नाही. उत्तर प्रदेशातील पश्चिम भागांत हजारो सोशल मीडिया पदाधिकारी आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सचं नेटवर्क उभं करण्यात आलं. स्थानिक कार्यकर्त्यांना परिसरातील व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये सहभागी होऊन पक्षाची माहिती आणि कंटेंट पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित केलं जात होतं.
पश्चिम बंगालमध्येही भाजपाने याच डिजिटल रणनीतीचा वापर केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या राज्यातील आयटी यंत्रणेने स्मार्टफोन वापरणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान ५० हजार व्हॉट्सॲप ग्रुप तयार केल्याचं सांगितलं होतं. यासोबतच बंगाली भाषेतील पक्षाचा कंटेंट शेअर चॅटच्या माध्यमातूनही पोहोचवला जात होता. यामुळे दिल्लीतील पक्षाचा संदेश काही तासांतच राज्य, जिल्हा आणि बूथ स्तरापर्यंत पोहोचू लागला.
NaMo App : सोशल मीडियापलीकडे
भाजपाची डिजिटल रणनीती केवळ सोशल मीडिया अकाउंट्सपुरती मर्यादित राहिली नाही. पक्षाने स्वतःचं डिजिटल कम्युनिकेशन नेटवर्क उभारण्यावर भर दिला, त्यात नमो अॅप महत्त्वाचा ठरला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या अॅपवर बातम्या आणि अपडेट्ससोबतच स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी, पक्ष साहित्य खरेदी, छोट्या देणग्या आणि निवडणूक मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे पर्याय उपलब्ध होते.
२०१४ मधील सोशल मीडिया केंद्रित प्रचारापेक्षा २०१९ मध्ये अॅपच्या माध्यमातून समर्थकांशी थेट जुळवून घेण्यासाठी भाजपाने प्रयत्न केले. २०१९ च्या निवडणुकीपर्यंत नमो अॅपचे एक कोटीहून अधिक डाउनलोड्स झाले होते, त्यामुळे फेसबुक आणि ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून न राहता पक्षाला थेट आपल्या समर्थकांपर्यंत पोहोचण्याचं स्वतंत्र माध्यम मिळालं.
‘मै भी चौकीदार’ : टीकेचं कॅम्पेनमध्ये रुपांतर
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राजकीय टीकेचं डिजिटल मोहिमेत रूपांतर केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत वारंवार “चौकीदार चोर है” असा नारा दिला.
भाजपाने याच ‘चौकीदार’ शब्दाला आपल्या प्रचाराचा भाग बनवले आणि ‘मै भी चौकीदार’ ही मोहीम सुरू केली. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याऐवजी त्याच शब्दाला स्वतःच्या राजकीय संदेशात बदलले आणि डिजिटल माध्यमातून जनतेत पोहोचवण्यात आलं.
१६ मार्च २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलचं नाव बदलून चौकीदार नरेंद्र मोदी असे ठेवले होते. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि अन्य मंत्र्यांनी मोदींचे अनुकरण केले आणि आपले ट्विटर प्रिफिक्स बदलले.
ट्विटरवरील मोहिमेला प्रसिद्धी आणि टीका दोन्ही सोबतच मिळाली. भाजपाच्या नेत्यांनी प्रोफाइल फोटो बदलले, समर्थकांनीही ‘चौकीदार’ हीच ओळख स्वीकारली आणि या मोहिमेअंतर्गत शपथ घेणाऱ्या लोकांशी जोडण्यासाठी पक्षाने डिजिटल माध्यमांचा वापर केला.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसने २०१९ च्या निवडणुकीनंतर दिलेल्या एका सर्वेक्षणानुसार, डिजिटल मीडिया क्षेत्रातील ५४ टक्के नेत्यांनी ‘मै भी चौकीदार’ मोहीम प्रभावी असल्याचे म्हटले होते, तर ६५ टक्के जणांनी काँग्रेसची ‘चौकीदार चोर है’ ही मोहीम प्रभावी ठरलीच नाही असं म्हटलं.
स्लोगनपासून ते डेटा आधारित संवादांपर्यंत
मालवीय यांनी एक अशी यंत्रणा तयारी केली, ज्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने ऑनलाईन डेटाचा (माहिती) वापर करण्यात आला. २०१९ च्या निवडणुकीदरम्यान पक्षाने मोठे स्वयंसेवक नेटवर्क आणि बूथस्तरीय डेटाबेसबद्दल (माहितीचा संग्रह) जाहीररित्या भूमिका मांडली. त्यांची डिजिटल स्वयंसेवकांची फळी केवळ ग्राफिक्स आणि ट्विट्स तयार करत नव्हते, तर निवडणूकविषयक माहिती, स्थानिक प्रचार रचना आणि सोशल मीडियाद्वारे प्रसार या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून प्रभावी मोहीम चालवत होते.
२०१७ च्या निवडणुकीत पहिल्यांदा या मोहिमेची झलक दिसली. भाजपाने सांगितले की, डिजिटल माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी १७ हजार पक्ष प्रशिक्षित कार्यकर्त्यांसोबत जवळपास १० हजार सक्रिय सोशल-मीडिया स्वयंसेवक काम करत होते, ज्यामुळे लाखो स्मार्टफोन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणे भाजपाला सहज शक्य झाले.
२०२४ पर्यंत भाजपाच्या या राजकीय संवादाची प्रक्रिया पुन्हा बदलली होती. प्रचारमोहिमांमध्ये अधिकाधिक प्रमाणात इन्स्टाग्राम व्हिडीओ, छोटेखानी मजकूर, व्हॉट्सॲप आणि टार्गेटेड मेसेजचा वापर करण्यात आला. भाजपाने ‘मोदी का परिवार’ या मोहिमेचाही प्रभावीपणे वापर केला. लाखो समर्थकांना हा वाकप्रचार त्यांच्या सोशल-मीडिया प्रोफाइलवर जोडण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
मालवीय यांच्या ११ वर्षांची कारकीर्द
अमित मालवीय यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भाजपाची डिजिटल यंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्तारली. सुरुवातीच्या छोट्या केंद्रीय टीमपासून प्रोफेशनल कॅम्पेनर्स, राज्यस्तरीय टीम्स, स्वयंसेवक, व्हॉट्सॲप ग्रुप्स, अॅप्स आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचं एक मोठं नेटवर्क उभं राहिलं. २०१९ मध्ये मालवीय यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला BJP4India च्या ट्विटर अकाउंटवर सुमारे १७ लाख फॉलोअर्स होते; तो आकडा पुढे १.१६ कोटींवर पोहोचला.
मालवीय यांच्यानंतर दीपक म्हस्की यांच्याकडे डिजिटल आघाडीची जबाबदारी आली आहे. रसायनशास्त्राचे माजी प्राध्यापक असलेले म्हस्की यांना निवडणूक डेटा, शेती, भाजपाचं संघटन आणि सार्वजनिक क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. २००९ पासून ते पक्षाशी जोडलेले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर म्हस्की यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली. खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर देणं आणि गैरसमज दूर करणं ही डिजिटल टीमची प्रमुख भूमिका असेल असे ते म्हणाले.
