Amit Shah West Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील आठवड्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपा नेते सुवेंदु अधिकारी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये १५ दिवस राहणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली होती. दरम्यान, अमित शाह यांनी यापूर्वी सलग इतके दिवस कोणत्याही राज्यात निवडणुकीसाठी वास्तव्य केलेले नाही.

भाजपाचे मिशन १७५ काय आहे?

पश्चिम बंगालमध्ये भाजपासाठी विजय मिळवणे महत्वाचे असल्याचे सांगत अमित शाह म्हणाले, “आम्ही एका पाठोपाठ एक जागा जिंकत जाऊ आणि आकडा १७५ पर्यंत घेऊन जाऊ. (एकूण जागा २९४) त्यानंतरच (राज्यात) बदल घडेल. निवडणुकीच्या काळात मी पश्चिम बंगालमध्ये १५ दिवस राहणार आहे”, अशी घोषणा अमित शाह यांनी केली होती.

ममता बॅनर्जी यावेळी पराभवाचा वचपा काढणार का?

अमित शाह यांनी भबानीपूर या मतदारसंघात असताना पश्चिम बंगाल मध्ये १५ दिवस राहण्याची घोषणा केली आहे. भबानीपूर हा मतदारसंघ भाजपासाठी अत्यंत महत्वाचा आहे. भबानीपूरमधून भाजपा नेते सुवेंदु अधिकारी हे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात लढत आहेत. दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत सुवेंदु अधिकारी यांनी नंदिग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जींना पराभवाची धूळ चाखली होती.

रात्री आखणार रणनीती?

पश्चिम बंगालमध्ये अमित शाह १५ दिवस राहणार असून रात्रीच्या वेळी ते उत्तर बंगाल मधील भाजपा नेत्यांशी चर्चा करणार आहेत. उत्तर बंगालमधून २०१९ पासून भाजपाला मोठे राजकीय समर्थन मिळत आले आहे. या भागात अमित शाह भाजपा नेत्यांशी संवाद साधून त्यांना रणनीती आखून देणार आहेत. तसेच स्थानिक नेत्यांकडून परिस्थिती जाणून घेणार आहेत. अमित शाह भाजपा नेत्यांमधील वाद सोडवणार आहेत, तिकिट न मिळाल्याने नाराज झालेल्यांची समजूत देखील काढणार आहेत.

अमित शाहांचा मास्टरप्लान

उत्तर बंगालमधील बालुरघाट, सिलिगुडी; दक्षिण बंगालमधील हुगळी; नैऋत्य बंगालमधील खडगपूर आणि दुर्गापूर या शहरांमध्ये अमित शाह प्रचारासाठी वेळ देणार आहेत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा ज्या मतदारसंघांमध्ये खूप कमी मतांनी पराभव झाला होता, त्या मतदारसंघांवर भाजपाने यावेळी लक्ष केंद्रीत केले आहे. अमित शाह ज्या शहरांमध्ये रात्री मुक्काम करणार आहेत, त्याच शहरांमध्ये प्रचार सभा तसेच रोड शो देखील करणार आहेत.

२०२३ मध्ये मध्य प्रदेश, २०२४ मध्ये महाराष्ट्र, २०२५ मध्ये बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील अमित शाह यांनी रात्री उशीरा भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तसेच रणनीती आखली होती. अमित शाह यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांची तसेच बुथ वर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. पक्षाच्या कमकुवत बाजू तसेच भक्कम बाजू कोणत्या हे शाह यांनी जाणून घेतले होते.

बिहारची बंगालमध्ये पुनरावृत्ती होणार?

बिहारमध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमित शाह यांनी रणनीती आखून दिली होती. बिहारमध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या. शाह यांच्या रणनीतीनुसार बिहारला ४५ भागांमध्ये (ऑर्गनायझेशनल क्लस्टर) विभागण्यात आले होते. तिथे असलेल्या परिस्थितीची माहिती अमित शाह थेट घेत होते व त्यानुसार प्रचाराचे नियोजन करत होते. फक्त भाजपासाठीच नव्हे, तर एनडीएतील इतर पक्षांसाठी देखील शाहांनी नियोजन केले होते.

अमित शाह नेमकं काय करणार?

“पश्चिम बंगालमध्ये अमित शाह एका रात्रीतून २० ते २५ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतील. ते नेत्यांबरोबर जेवण करतील. तसेच महत्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेतील. त्यांच्याशी चर्चा करतील. ९ एप्रिलनंतर ते या कामाला सुरूवात करतील”, असे भाजपातील एका सूत्राने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. अमित शाह यांचे चर्चासत्र रात्री दोन पर्यंत चालू शकतात असा अंदाज त्याने व्यक्त केला.

२०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास ४० जागांवर तृणमूल काँग्रेसचा फक्त पाच टक्के जास्त मते घेतल्याने विजय झाला होता. त्यात राजगंज, जलपाईगुडी, सिताई, माल, मेकलिगंज या मतदारसंघांचा समावेश होता. त्यामुळे भाजपाने ज्या मतदारसंघात कमी मार्जिनने पराभव झाला त्या मतदारसंघांकडे या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले आहे.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत काय झाले होते?

पश्चिम बंगालमध्ये २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फक्त तीन जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७७ जागांपर्यंत मजल मारली. भाजपाच्या मतांचा टक्का १० टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या. २०१९ मध्ये भाजपाच्या बंगालमध्ये १८ जागा होत्या. त्या कमी होऊन १२ झाल्या.

फक्त बंगालकडेच लक्ष?

तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये देखील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. परंतु, अमित शाह यांनी त्यांचे सगळे लक्ष पश्चिम बंगालवर केंद्रीत केले आहे. अमित शाह बंगालमध्ये १५ दिवस राहण्याआधीच त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र हुड्डा यांची पश्चिम बंगालचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात केली होती. भूपेंद्र हुड्डा यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या नेतृत्वात तिन्ही राज्यांमध्ये भाजपाने यश मिळवले होते.

अमित शाहांचे पश्चिम बंगाल दौरे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मागील वर्षी डिसेंबर महिन्यात तीन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी भाजपाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला होता. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमित शाह यांनी पुन्हा पश्चिम बंगालचा दौरा केला. ते म्हणाले होते, भाजपा प्रणित एनडीएचे सरकार देशातील २१ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी इतकेच पुरेसे नाही. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार येईल, तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसेल, असे शाह म्हणाले होते. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात २३ एप्रिल व २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे.