चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपले लक्ष उत्तर प्रदेशाकडे वळवले आहे. २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून एकमेकांना कोंडीत पकडण्याची रणनीती आखली जात आहे. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने एक मोठी घोषणा केली आहे. भाजपाला पुन्हा सत्ता मिळाल्यास उत्तर प्रदेशात समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे आश्वासन त्यांनी भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीतून दिले आहे.
देशातील काही भाजपाशासित राज्यांमध्ये यापूर्वीच हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशातही पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन झाल्यास समान नागरी कायदा लागू केला जाणार असल्याचे शाह यांन म्हटले आहे. याआधी बैठकीला संबोधित करताना उत्तर प्रदेशातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी आगामी निवडणूक ‘विनाश विरुद्ध विकास’ आणि ‘जातीयवाद विरुद्ध राष्ट्रवाद’ अशी निर्णायक लढत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना विरोधकांच्या आरोपांवर जशाच तसे उत्तर देण्याचे आवाहन केले. विरोधकांना प्रत्युत्तर देताना भावनिक मुद्द्यांऐवजी वस्तुस्थिती आणि पुराव्यांच्या आधारे उत्तर द्यावे, असा सल्लाही चौधरी यांनी दिला.
अमित शाह यांची इंडिया आघाडीवर टीका
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी लखनौ येथे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्य सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ, भाजपाचे राज्यस्तरीय पदाधिकारी तसेच पक्षाच्या विभागीय आणि जिल्हास्तरीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित असल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या बैठकीला हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीकेचा भडीमार केला. विरोधी पक्ष संसदेची कार्यवाही चालू देत नसल्याचा आरोप शाह यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची नवी इमारत बांधल्याचा उल्लेख करीत चर्चा आणि वादविवाद हा संसदेतच व्हायला हवा, असे ठामपणे सांगितले.
अखिलेश यादव यांच्यावरही घेतले तोंडसुख
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अमित शाह यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही फैलावर घेतले. १९९० मध्ये याच दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या आदेशावरून कारसेवकांवर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्यावेळी रामभक्तांच्या रक्ताने शरयू नदीचे पाणीही लाल झाले होते. आता अखिलेश यादव आणि त्यांच्या साथीदारांना वाटते की जनता त्यांना माफ करेल; पण उत्तर प्रदेशमधील लोक तुमच्या तिसऱ्या पिढीलाही माफ करणार नाही, अशी घणाघाती टीका शाह यांनी केली. तसेच कार्यकर्त्यांनी कुठल्याही संभ्रमात राहण्याची आवश्यकता नाही. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे संघटन ‘अंगदच्या पायासारखे’ भक्कम आहे. त्याला कोणीही हलवू शकत नाही, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.
पंकज चौधरी यांनी कार्यकर्त्यांना काय सल्ला दिला?
दरम्यान उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी आगामी विधानसभेची निवडणूक ‘विनाश विरुद्ध विकास’ आणि ‘जातीयवाद विरुद्ध राष्ट्रवाद’ अशी निर्णायक लढत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी पक्षाच्या सहकाऱ्यांना विरोधकांच्या आरोपांवर बचावात्मक भूमिका न घेण्याचे आवाहन केले. विरोधकांना प्रत्युत्तर देताना भावनिक मुद्द्यांऐवजी वस्तुस्थिती आणि पुराव्यांच्या आधारे उत्तर द्यावे, असा सल्ला चौधरी यांनी दिला. विरोधकांकडे ना नीती आहे, ना हेतू आणि ना नेतृत्व, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपाच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी उपस्थितांना या भाषणाच्या प्रती देण्यात आल्या होत्या. वस्तुस्थिती, धोरणे आणि जनहिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच बिनबुडाचे आरोप करून असंसदीय शब्दांचा सर्रास वापर करत आहेत, अशी खरमरीत टीकाही चौधरी यांनी केली.
देशविरोधी शक्तींकडून कट रचले जात असल्याचा आरोप
अलीकडेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वडिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. यावरून त्यांचा स्वभाव दिसून येतो. समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे राजकारण हे नकारात्मक आरोपांवर अवलंबून आहे, असे चौधरी म्हणाले. देश अस्थिर करण्यासाठी काही देशविरोधी शक्तींकडून कट रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. परदेशातून मिळणाऱ्या निधीच्या मदतीने तरुणांची दिशाभूल करून देशात द्वेष पसरवण्याचा कट आखला जात आहे. समाजमाध्यमांवर नकारात्मक भाषा वापरून कटकारस्थाने रचणे, एवढेच काम विरोधकांकडे उरले असल्याचे ते म्हणाले.
भाजपाच्या कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकज चौधरी यांनी पक्षातील सहकाऱ्यांना चार मुद्द्यांवर आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे. “आपण प्रत्येक मतदान केंद्रावर सक्रिय आहोत का? मतदान केंद्रस्तरीय समित्या नियमितपणे काम करत आहेत का? पक्षाचे पदाधिकारी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत का? तसेच, मंडळ, विभागीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी जनतेच्या संपर्कात आहेत का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे, असे आवाहनही करण्यात आले. तसेच, पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांशी नियमित संवाद साधावा आणि स्वतः बोलण्यापेक्षा त्यांचे म्हणणे अधिक ऐकून घ्यावे, असा सल्लाही चौधरी यांनी आपल्या भाषणातून दिला आहे.
