सत्ताधारी ‘एनडीए’च्या घटक पक्षांमधील मतभेद मिटवण्यात भाजपचे सर्वेसर्वा अमित शहांनी केलेली यशस्वी मध्यस्थी हे बिहारमधील अभूतपूर्व विजयातील प्रमुख कारण मानले जात आहे. त्या उलट, विरोधकांच्या ‘महागठबंधन’मध्ये जागावाटपांसाठी अखेरपर्यंत सुरू राहिलेली रस्सीखेच काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्यासारख्या दिग्गजांनाही थांबवता आली नाही. ही दोन्ही आघाड्यांमधील विसंगतीच बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसून येते.
भाजपने ‘एनडीए’च्या जागावाटपामध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांना धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला होता. मोदींचे ‘हनुमान’ चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती (रामविलास पासवान) पक्षाला जास्त जागा वाटल्यामुळे नितीश नाराज झाले होते. त्यातच नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात मोदी-शहांनी कुचराई केली होती. परिणामी, नितीश कुमार यांनी आपल्या जनता दल (सं) पक्षाच्या बैठकीमध्ये भाजपविरोधात संताप व्यक्त केला होता.
शिवाय, आपल्याच पक्षातील काही नेते भाजपच्या नेत्यांच्या कच्छपी लागल्याची शंका आल्याने निवडणुकीचा सगळा कारभार नितीश कुमार यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. नितीश कुमार बधणार नाहीत हे लक्षात आल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाटण्यात आले, त्यांनी नितीश कुमार यांच्याशी ४०-५० मिनिटे चर्चा केली.
‘एनडीए’तील मतभेद इतके विकोपाला केले होते की तर चिराग पासवान आणि नितीश कुमार यांच्या पक्षांनी एकमेकांविरोधात पाडापाडीचे राजकारण केले असते. ही पाडापाडी थांबवण्यासाठी अमित शहा गुजरातला न जाता पाटण्याला गेले होते. गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल केले जात होते. इथेही अमित शहांना भूपेंद्र पटेल यांनाच बदलायचे होते पण, ते शक्य झाले नाही असे सांगितले जाते. गुजरातऐवजी बिहारला प्राधान्य देऊन अमित शहांनी नितीशकुमार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ‘एनडीए’तील वातावरण बदलले.
बिहारमधील अमित शहांच्या दौऱ्यानंतर भाजपचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान तसेच, भाजपचे प्रदेश नेते सम्राट चौधरी आदींनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले. ही भाजपने नितीश कुमार यांच्याशी केलेली मोठी तडजोड होती. चिराग पासवान यांना भाजपने पाठीशी घातले असले तरी, नितीश कुमार यांच्या पक्षाला धोका पोहोचणार नाही याची दक्षता भाजपने घेतली असे निकालावरून तरी दिसते.
छठपूजेच्या निमित्ताने नितीश कुमार यांनीही चिराग पासवान यांच्या घरी जाऊन हातमिळवणी केली. गेल्या वेळी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांना भाजपने वेगळे लढवले होते व नितीश कुमार यांच्या पक्षाचे उमेदवार चिराग यांनीच पाडले. त्यातून भाजपने आपले महत्त्व कमी केले असे नितीश कुमार यांचे म्हणणे होते.
पण, यावेळी चिराग व नितीश दोघांनी एकमेकांशी जुळवून घेतले. चिराग पासवान यांच्या जनलोकशक्ती पक्षाने २९ पैकी वीसहून अधिक जागा जिंकल्या हे ‘एनडीए’तील मतभेद दूर झाल्यामुळेच शक्य झाल्याचे स्पष्ट झाले. अमित शहांनी ‘एनडीए’ला किमान १६० जागा मिळतील असे भाकित केले होते, ते खरे ठरले आहे!
काँग्रेसचे दिग्गज मात्र फोल
विरोधकांच्या ‘महागठबंधन’मधील मतभेद मात्र अखेरपर्यंत मिटले नाहीत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’त तेजस्वी यादव, मुकेश सहनी, डाव्या पक्षांचे नेते असे सगळेच सहभागी झाले होते. त्यातून निर्माण झालेले एकजुटीचे चित्र फारकाळ टिकले नाही. राहुल गांधींची यात्रा संपल्यानंतर तेजस्वी यांनी स्वतंत्र यात्रा काढली. त्यानंतर तेजस्वी-राहुल एकत्र आल्याचे दिसले नाही.
महागठबंधनमध्ये जागावाटपावरून पहिल्या फेरीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली तरी तिढा सुटला नाही. हा वाद इतका विकोपाला गेला की राहुल गांधींनी फोनाफोनी करूनही सुटला नाही. अखेर राहुल गांधींनी मुत्सद्दी अशोक गेहलोत यांना पाटण्याला लालूप्रसाद यादव यांच्याकडे पाठवले. त्यांनी तेजस्वी-लालू यांची मनधरणी केली.
जे झाले ते झाले, आता भांडणे नकोत, असे म्हणत दोन्ही बाजूंकडून एकपाऊल मागे घेतले गेले. तरीही १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्याच. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे दोन प्रमुख पक्ष भांडत असल्याचे बघून ‘माकप-माले’ या डाव्या पक्षानेही अधिक जागांची मागणी केली. ‘व्हीआयपी’चे मुकेश सहनीही अडून बसले. मग, या सगळ्यावर तोडगा म्हणून तेजस्वीला मुख्यमंत्री आणि मुकेश सहनींना उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले. पण, तोपर्यंत ‘महागठबंधन’मध्ये आलबेल नसल्याचा संदेश गेले होता.
‘व्होटर अधिकार यात्रा’ ते मतदानाची पहिली फेरी यामधील सुमारे महिनाभराचे कळीचे दिवस काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलाने वाया घालवले. त्यामुळे पुन्हा एकदा महागठबंधनने बिहारमधील सत्ता गमावली असे मानले जात आहे.
