पुणे : पुणे महापालिकेच्या कारभारावरून महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाने ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्याचे जाहीर करून भाजपला आव्हान दिले असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एक ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियोजित पुणे दौऱ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू झाले आहे. दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्याचा निर्धार काँग्रेसने जाहीर केला आहे, तर काँग्रेसला प्रत्युत्तर म्हणून भाजपने त्याच ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने अमित शहा यांच्या दौऱ्यावरून आता भाजप आणि काँग्रेस आमने-सामने उभे राहिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या १ ऑगस्ट रोजी नियोजित पुणे शहर दौऱ्यावर आहेत. शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

दिल्लीत विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्ह पुण्यात शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज् चौकात आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. काँग्रेसच्या या आंदोलनाला विरोध म्हणून याच चौकात भाजपकडून आंदोलन करण्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी जाहीर केले आहे. जगताप आणि घाटे या दोघांनीही पोलिसांनी याबाबत निवेदन दिले आहे.

दरम्यान, ‘पुणे महापालिकेच्या कारभाराच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे पक्षाकडून गुरुवारी (३० जुलै) रोजी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. महापालिकेतून महत्त्वाच्या फाईल गायब होत आहेत. रस्त्यावरील एलईडी प्रकाशदिवे चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. अनेक वर्षे सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांवर अन्याय केला जात आहे. याविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आता काँग्रेसने अमित शहा यांच्या दौऱ्यात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने भाजप आणि काँग्रेस यांच्यात जुंपली आहे.

काँग्रेसची भूमिका काय ?

जंतरमंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना पोलिसांनी बळाचा वापर केला. हे आंदोलन चिरडून टाकण्याचे काम गृहमंत्री अमित शहा यांनी केले. आंदोलन संपल्यानंतरही सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास, त्यांची धरपकड करण्यास, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना छळण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून हुकूमशाही वृत्तीचा निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे पूर्व भागाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपचे प्रतिआव्हान

काँग्रेसने आंदोलन करण्याचे जाहीर केल्याने भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसला प्रतिआव्हान दिले आहे. काँग्रेसला आंदोलनाची परवानगी दिली गेल्यास भाजपलाही प्रतिआंदोलनाची परवानगी द्यावी, अशी  मागणी घाटे यांनी केली आहे. शहरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास भाजप जशास तसे उत्तर देईल, अशी भूमिका घाटे यांनी स्पष्ट केली आहे.