कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यात भाजपाला पाठिंबा देणाऱ्या, तसेच अपक्ष आमदारांबरोबरच शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना व्यासपीठावर स्थान देऊन भाजपाने बेरजेच्या राजकारणावर भर दिला. कोल्हापूरमध्ये पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न झाले, पण भाजपाला अद्यापही अपेक्षित विस्तार करणे तरी शक्य झालेले नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर दौऱ्यात आणखी वाढवले. आता भाजपाने एकनाथ शिंदे शिवसेनेसह सर्व ४८ जागा जिंकण्याचे ध्येय ठेवताना महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करण्याचा निर्धार केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपा – शिवसेना युतीने संपूर्ण यश मिळवण्याचा संकल्प करताना भाजपाने शिंदे गटाचे खासदार आणि भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार यांना व्यासपीठावर आणून बेरजेच्या राजकारणावर भर दिला. विकास कामांबाबत शहा यांच्याकडून असलेल्या अपेक्षा फोल ठरल्या.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची तयारी चालवली आहे. गेल्या महिन्यात एका सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढली तर त्यांना भाजपा-शिंदे गटापेक्षा अधिक जागा मिळतील, असा कल दिसून आला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवण्याचा संकल्प असलेल्या भाजपासाठी या सर्वेक्षणाने आव्हानच निर्माण केले.
भाजपाने महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह मोठा विजय मिळवण्याचा निर्धार केला आहे. यापूर्वी भाजपाने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे ध्येय घोषित केले होते. आता उरलेल्या तीन मतदारसंघांसह संपूर्ण ४८ जागा जिंकण्याचा संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापुरातील विजय संकल्प सभेमध्ये पेरण्यात आला. मागील वेळी शिवसेनेसोबत युती केलेल्या भाजपने कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली. तेव्हा ४२ जागांवर विजय मिळवला होता. शहा यांच्या कोल्हापुरातील सभेने जणू प्रचाराचा नारळच फुटला आहे. तो शत – प्रतिशत विजय साध्य करून थांबणार असल्याचा निर्धार करण्यात आला.
ठाकरेंना टोला शिंदेंशी जवळीक
शिवसेना आणि धनुष्यबाण गमावलेले उद्धव ठाकरे हे अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रखर टीकेचे लक्ष्य ठरले. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्याशी आणखी जुळवून घेण्याची भाषा दिसली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक लढवताना राज्यात सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेला कितपत आणि कसे सामावून घेतले जाणार याविषयी उलट सुलट चर्चा होती. शहा यांच्या दौऱ्यामध्ये शिंदे शिवसेना – भाजपाने युती करून निवडणूक लढवण्याचा निर्वाळा देवून शंकेचा पडदा दूर केला. आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात संजय मंडलिक व धैर्यशील माने या शिंदे गटाच्या खासदारांना पुन्हा युतीकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बेरजेच्या राजकारणावर भर
केवळ शिंदे गटाशी युती न करता त्यांना आतापासूनच सामावून घेण्यासाठी भाजपाची पावले पडू लागली आहेत. त्याचा प्रत्यय अमित शहा यांच्या कोल्हापुरातील दौऱ्यावेळी दिसून आला. संजय मंडलिक, धैर्यशील माने हे शिंदे गटाचे दोन्ही खासदार सभेला उपस्थित होते. मंडलिक यांनी तर भाषण करून काही अपेक्षाही व्यक्त केल्या. इतकेच नव्हे तर गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला पाठिंबा देणारे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे, प्रकाश आवाडे या अपक्ष आमदारांनाही पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थित राहण्याची संधी दिली. या निमित्ताने भाजपाने बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यासाठी विरोधी पक्षाच्या प्रभावी नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षामध्ये आणण्याचा संदेश शाह यांनी भाजपा बूथ प्रमुखांच्या खाजगी बैठकीत दिला. आगामी काळामध्ये कोल्हापूर सहपश्चिम महाराष्ट्रामध्ये इन्कमिंग सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.
विकास कामांचे काय ?
सभेमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी महालक्ष्मी मंदिर, इथेनॉल प्रकल्पाला सहकार्य, उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बँक, तर संजय मंडलिक यांनी राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न, पंचगंगा नदी प्रदूषण, रेल्वे प्रश्न उपस्थित करून ते मार्गी लावण्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली. शहा यांच्या संपूर्ण भाषणात खासदारांनी व्यक्त केलेल्या कोणत्याही मागण्यांचा साधा उल्लेखही नव्हता. इतकेच नव्हे तर, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाबाबत, अगदी सहकार क्षेत्राबाबतही त्यांनी कोणतीच घोषणा केली नाही. भाजपाची बांधणी मजबूत करणारे कोल्हापूरचे जावई असलेल्या अमित शहा यांचे विकासाच्या कामावरचे मौन मात्र करवीरकरांचा विरस करणारे ठरले.