पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) युवानेते अमित ठाकरे यांच्यावर पुण्याची जबाबदारी देण्यात आल्यानंतर ते पुण्यात येवून पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेत आहेत. या बैठकांमुळे पक्षाला उर्जितावस्था आली असताना ‘खळ्ळ-खटॅक’च्या आदेशाची सवय लागलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोणताच ‘आदेश’ दिला जात नसल्याने ते गोंधळात पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मनसेने पक्ष मजबूत करणासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा संपर्क अध्यक्ष नेमले आहेत. त्यानुसार पुण्याची जबाबदारी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे साेपविण्यात आली आहे. आगामी तीन वर्षे कोणत्याही निवडणुका नसल्या, तरी पक्षाची मोट बांधण्यासाठी अमित ठाकरे हे पुण्यात जनसंपर्क वाढविणार आहेत. मागील दोन आठवड्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांबरोबर बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यांच्या मदतीला अविनाश अभ्यंकर आणि अमेय खोपकर या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बैठका घेऊन पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे.

मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ‘खळ्ळ-खटॅक’ची सवय असल्याने अमित ठाकरे कोणता आदेश देणार, याकडे त्यांचे लक्ष लागले आहेत. मात्र, अमित ठाकरे हे फक्त बैठकांवर बैठका घेत आहेत. आगामी काळात कोणत्या विषयावर आक्रमक भूमिका घ्यायची किंवा आंदोलनाचा पवित्रा घ्यायचा, याबाबत कोणताही आदेश त्यांच्याकडून देण्यात येत नसल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोंधळात पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुण्यात एकेकाळी मनसेचे २९ नगरसेवक होते, मात्र गेल्या काही वर्षांत पक्षाची ताकद क्षीण होत गेली आहे. ही ताकद पुन्हा मिळवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. पुण्यात ते सातत्याने दौरे करून बैठका घेत आहेत. पुण्यातील प्रलंबित प्रश्न समजून घेतानाच संघटन वाढवण्यावर ते भर देत आहेत.

मनसेची ओळख ही आक्रमक पक्ष अशी राहिली आहे. त्यामुळे ‘खळ्ळ-खटॅक’ आंदोलनाची कार्यकर्त्यांना सवय आहे. अमित ठाकरे यांनी मवाळ भूमिका घेतली असताना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत. पुण्यातील कोणत्या विषयावर आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, याबाबत बैठकांमध्ये चर्चा होत आहे. मात्र, आंदोलन, मोर्चा याबाबत अमित ठाकरे यांच्याकडून कोणताही आदेश देण्यात येत नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

बैठकांमध्ये मौन?

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर घेण्यात येत असलेल्या बैठकांमध्ये अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर आणि अमेय खोपकर हे तिघे उपस्थित रहात असले, तरी अभ्यंकर आणि खोपकर हे विविध विषयांवर चर्चा करत असतात. अमित ठाकरे यांनी आदेश देण्याची पदाधिकाऱ्यांची प्रतीक्षा असली, तरी ते मात्र बैठकांमध्ये फारसे बोलत नसल्याची माहिती काही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.