संतोष प्रधान

नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक या शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळावे ही महत्त्वाकांक्षा होती. पण यापैकी कोणत्याच नेत्याची इच्छा अद्याप फळाला आलेली नाही. मात्र शिवसेनेत बंडाचे निशाण रोवताच एकनाथ शिंदे यांना तत्काळ मुख्यमंत्रीपद मिळाले व राज्याचे नेतृत्व करण्याचे त्यांचे स्वप्नही पूर्ण झाले.

शिवसेनेत बंड केले त्या सर्वच नेत्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा होती. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली. राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा त्यांनी वारंवार बोलूनही दाखविली. राज्याच्या विकासाचा कार्यक्रम (ब्ल्यू प्रिंट) त्यांनी जाहीर केला. राज्याच्या विकासासाठी आपल्याकडे नेतृत्व द्यावे, असे त्यांनी जनतेला आवाहनही केले. मनसे हा राज्यातील महत्त्वाचा आणि प्रभावी घटक असेल, असे अनेकदा सांगितले. पहिल्या फटक्यात राज ठाकरे यांच्या पक्षाचे १३ आमदार निवडून आले. एवढे आमदार निवडून येणे हे सोपे नसते. मात्र राज ठाकरे यांना ते सातत्य पुढे राखता आले नाही. धरसोड भूमिकेमुळे मनसेला जनाधार मिळू शकला नाही. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते पण ती मतांमध्ये परिवर्तीत करण्यात ते यशस्वी झाले नाहीत.

नारायण राणे यांनी बंड पुकारल्यावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा आपल्याला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आले होते, असे राणे यांनी उघडपणे सांगितले होते. राज्यात नेतृत्व बदल होणार आणि आपणच मुख्यमंत्री होणार, असा दावा राणे करीत असत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांनी उघडपणे संघर्ष केला. राणे हे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत असताना काँग्रेसने अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण या दोघांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पण राणे हे फक्त दावाच करीत राहिले. शेवटी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. भाजपने तर त्यांना थेट दिल्लीतच पाठविले.

शिवसेनेत पहिले बंड करणारे छगन भुजबळ यांचीही मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने जेव्हा केव्हा पक्षाला संधी मिळेल तेव्हा मुख्यमंत्रीपद मिळावे ही भुजबळ यांची मनोमन इच्छा होती. पण नेतेपदावरूनच भुजबळ यांना पक्षांतर्गत विरोध झाला. राष्ट्रवादीला अद्याप मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही आणि पक्षाने विजयसिंह मोहिते-पाटील, अजित पवार, आर. आर. पाटील या नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी दिली.

राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना नवी मुंबईतील शक्तिमान नेते गणेश नाईक यांचीही महत्त्वाकांक्षा जागृत झाली होती. कारण तेव्हा नाईक हे ‘मातोश्री’त्या गळ्यातील ताईत होते. गणेश नाईक हे शिवसेनेला आर्थिक ताकद देत होते. शिवसेनेसाठी १०० रुग्णवाहिका नाईकांनी दिल्या होत्या. त्यामुळे नाईकांबद्दल पक्षातही चांगली भावना होती. मनोहर जोशी तेव्हा मुख्यमंत्री होते. एक बड्या उद्योगपतीचा गणेश नाईकांवर वरदहस्त होता. यामुळे गणेश नाईक हे मुख्यमंत्री होणार अशी कुजबूज त्यांच्या समर्थकांकडून सुरू झाली. काही जणांनी तर तारखांचा वायदा केला. पुढे मातोश्रीशी बिनसले आणि गणेश नाईक हे शिवसेनेतून बाहेर पडले.

शिंदे यांची इच्छापूर्ती

२०१४ मध्ये शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपेदी निवड झाल्यापासून एकनाथ शिंदे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढू लागली. भाजपबरोबर युती झाली आणि औट घटकेचे विरोधी पक्षनेतेपद सोडून शिंदे हे फडण‌वीस सरकारमध्ये मंत्री झाले. कधीना कधी शिंदे हे राज्याचे नेतृत्व करणार हे त्यांचे समर्थक खासगीत सांगायचे. शिंदे हे उद्धव ठाकरे यांना कधीना कधी आव्हान देणार हेही बोलले जाऊ लागले. भाजपच्या नेत्यांनीही तशी हवा शिंदे यांना भरली. २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळणार या आशेवर शिंदे होते. पण उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी गळ शरद पवार यांनी घातली. तेव्हा हातातोंडाशी आलेला घास गेल्याचे दु :ख शिंदे यांना होते. संधी मिळताच त्यांनी शिवसेनेत बंड केले. आता भाजपच्या मदतीने ते मुख्यमंत्री झाले. शेवटी शिंदे यांचे राज्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांपैकी शिंदे यांनाच राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे; अर्थात भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे हे सारे घडले.