अमरावती : शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये सध्या दोन स्पष्ट गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वरकरणी सर्वकाही आलबेल असल्याचे भासवले जात असले, तरी महापालिका निवडणुकीच्या काळात उफाळून आलेली धुसफूस वेगळ्याच वळणावर पोहचली आहे. दोन गटांमधील संघर्षामुळे आगामी काळात वरिष्ठ नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला, तरी बडनेराचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष सध्या केंद्रस्थानी आहे. सत्तास्थापनेत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. पण, ज्या पक्षामुळे भाजपचे नुकसान झाले, त्याच पक्षासमोर झुकावे लागणार, याचे शल्य भाजपमधील एका गटाला आहे. भाजपमध्ये सध्या राणा समर्थक आणि राणा विरोधक असे दोन स्पष्ट गट पडले आहेत. पुर्वीही राणा विरोधक सक्रिय होते, पण महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते एकत्र आल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ आणि…

महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रोड शो’ चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी खासदार नवनीत राणा या त्यांच्या सोबत वाहनात होत्या, पण साईनगर प्रभागाजवळ पोहचताच नवनीत राणा या वाहनातून उतरल्या आणि थेट युवा स्वाभिमान पक्षाच्या साईनगर प्रभागातील उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी पोहचल्या. मुख्यमंत्री भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताहेत आणि त्याच पक्षाच्या नेत्या विरोधात आहेत, हे चित्र अमरावतीकरांनी पाहिले. यातून भाजपचेच नुकसान झाले. भाजपच्या काही अधिकृत उमेदवारांच्या विरोधात नवनीत राणा यांनी प्रचार केल्याची तक्रार निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडे पोहचली होती. पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या काही पराभूत उमेदवारांनी नंतर घुमजाव केले. आम्ही राणांच्या सोबत असल्याचे त्यांना चित्रफितींच्या माध्यमातून सांगावे लागले. निष्ठेचे हे प्रदर्शन राणा गटासाठी सोयीचे असले, तरी त्यातून भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला.

सत्तास्थापनेच्या हालचाली

येत्या ६ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीविना युवा स्वाभिमानच्या मदतीने भाजपचा महापौर होईल, असा दावा आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपुर्वी केला होता. २७ जानेवारी रोजी रवी राणा यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा केली होती. यावेळी भाजपचाच महापौर होईल, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे राणा यांच्या गटातर्फे सांगण्यात आले. दुसरीकडे, युवा स्वाभिमान पक्षाच्या गटनेतेपदी नाना आमले यांची निवड करण्यात आली.

महापालिकेवर राणा यांचे वर्चस्व असावे, असे राणा समर्थकांना वाटते, तर राणा यांच्या शैलीमुळे भाजपचे खच्चीकरण होईल, अशी भीती भाजपच्या एका गटाला आहे. भाजपच्या गटनेतेपदी माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड करण्यात आली आहे. ते स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय यांचे निकटचे मानले जातात. तुषार भारतीय हे राणा यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारानेच त्यांना पराभूत केले. आगामी काळात दोन गटांमधील संघर्ष कोणते वळण घेणार, याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे.