अमरावती: सप्टेंबरच्या सुरूवातीलाच एका महाविद्यालयीन तरूणीचा पाठलाग करून तिची शहरातील रवी नगर चौकात चाकूने भोसकून हत्या करण्यात येते. गेल्या गुरूवारी नांदगाव खंडेश्वर येथे एका अभ्यासिकेत जात असलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकूने वार केले जातात. तर मंगळवारी बडनेरा येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनीवर वर्गमित्र चाकू हल्ला करतो. तरूणांमधील वाढत्या गुन्हेगारीची ही प्रातिनिधिक उदाहरणे. अशा घटनांमुळे पालकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता दूर करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्या पूर्ण होताना दिसत नाहीत.

नऊ महिन्यांत ३७ हत्या

१ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत शहरात ३६ घटनांमध्ये ३७ जणांची हत्या झाली आहे. यात दोन तरूणींचाही समावेश आहे. ३ सप्टेंबरला रवी नगर चौकात एका महाविद्यालयीन अल्पवयीन तरूणीची भरदिवसा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेने प्रचंड जनक्षोभ उसळला होता. काही महिन्यांपुर्वी शहरात एका तरूणाची भरचौकात हाताच पंजा छाटून हत्या करण्यात आली. विशेषत: या घटनांमधील अल्पवयीन मारेकऱ्यांचा सहभाग आणि सर्रास उपलब्ध होणारी घातक शस्त्रे यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहरातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली असल्याचे दिसते. गुन्हेगारी कारवायांमुळे शहरातील वातावरण गढूळ बनले आहे. जिकडे तिकडे मोकाट टोळक्यांचा धुमाकूळ सुरू आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी विश्वाविषयी वाटणारे आकर्षण चिंताजनक आहे. त्यातूनच गल्लोगल्ली स्वयंघोषित भाई तयार झाले आहेत.

गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात अपयश

शहरात महिला अत्याचार, युवतींच्या छेडछाडीचे प्रकार वाढलेले आहेत. किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हाणामाऱ्यांना सुमार राहिला नाही. गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर वचक निर्माण करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात ‘अँटी गुंडा स्कॉड’ची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या नेतृत्वाखाली या नव्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने अनेक तडीपारांसह शस्त्रे घेऊन दहशत पसरविणाऱ्या गुंडांची धरपकड देखील केली आहे. पण, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी यंत्रणेला ठोस प्रयत्न करावे लागणार आहेत.

अंमली पदार्थांची अर्थव्यवस्था

नैसर्गिक आणि कृत्रिम अंमली पदार्थाचे उत्पादन, पुरवठा आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या टोळ्यांना मुळासकट उखडून टाका, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभाग आणि पोलिसांना दिले आहेत. शहरात गेल्या नऊ महिन्यांत तब्बल ३ किलो मेफेड्रॉन (एमडी) आणि १६५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालाची किंमत सुमारे साडेपाच कोटींच्या जवळपास आहे. यावरून अंमली पदार्थांच्या व्यवसायाच्या जाळ्याची व्याप्ती लक्षात येते. पोलिसांनी एकूण ७७ गुन्ह्यांची नोंद करत ११७ आरोपींना गजाआड केले. ही कामगिरी उल्लेखनीय ठरली. पण, पोलिसांना अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्यांना शोधून पुढील काळात कारवाई करावी लागणार आहे.

खासदार डॉ. अनिल बोंडेंची चिंता

एका महाविद्यालयात तरुणीवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या गंभीर घटनेची दखल घेत भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी तात्काळ  पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा करत घटनेची संपूर्ण माहिती घेतली. या घटनेतील दोषींवर कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिल्या. अशा गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करणे आणि तरुण-तरुणींचे योग्य समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. बोंडे यांचे म्हणणे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि शैक्षणिक संस्थांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयांना एकत्रितपणे उपाययोजना कराव्या लागणार आहेत.