पुणे : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’त जागा वाटपाबाबत एकमत झाले नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार की, दोन्ही ‘राष्ट्रवादी’त टक्कर होणार, याबाबतचे चित्र अद्याप धूसर आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बुधवारी (३० सप्टेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

या कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबईत पवार कुटुंबीयांची बैठक झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. त्या बैठकीत काय निर्णय झाला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर उभे राहणार, याबाबतचे चित्र बुधवारी दुपारी तीन वाजता स्पष्ट होणार आहे.

जागा वाटपावरून तिढा?

सोमेश्वर कारखान्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही पॅनेल उभे करण्याची तयारी केली आहे. या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागा असून, त्यासाठी ५१४ उमेदवारी अर्ज आले आहेत. २१ पैकी किमान पाच जागा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा प्रस्ताव आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास दोन्ही ‘राष्ट्रवादी’मध्ये टक्कर होणार असल्याची चर्चा राजकीय वतुळात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची कोंडी?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा जागा वाटपाचा प्रस्ताव मान्य केल्यास महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) या मित्रपक्षांचे मतपरिवर्तन करण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षापुढे असणार आहे. या निवडणुकीत पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने तयारी केली आहे, तर पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे हे देखील पॅनेल उभा करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची कोंडी झाली आहे. याशिवाय शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे यांनीही पॅनल उभा करण्याचा इशारा दिला आहे.

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगर पंचायती, पंचायत समिती या निवडणुकांनंतर बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर उभ्या राहिल्या होत्या. आता सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की दोन्ही ‘राष्ट्रवादी’ आमने-सामने येणार यावर इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.