अमरावती: अयोध्या मंदिरांचा गड मानला जातो. त्यातील एक प्रसिद्ध हनुमानाचे मंदिर. ज्याला हनुमान गढी म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे दर्शन घेतल्‍याशिवाय रामललांचे दर्शन पूर्ण होत नाही, अशी श्रद्धा आहे. पण, अमरावतीनजीक देखील एक नवीन हनुमान गढी उभारली जात आहे. या ठिकाणी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकारातून हनुमानाची १११ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. धार्मिक पर्यटनासाठी महायुती सरकारने ‘हनुमान गढी’ला १२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.

सुरूवात कशी झाली?

एप्रिल २०२२ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. संघर्ष निर्माण झाला होता, पण अनेक मशिदींनी स्वत:हूनच भोंग्यांचा आवाज कमी केला. विषय मशिदीवरील भोंग्यांचा असला तरी याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सर्वच धर्मांच्या प्रार्थनास्थळांना लागू होत असल्याने मंदिरांवरील भोंग्यांचा आवाजही क्षीण झाला. मुस्लिमांनी संघर्षाचा पवित्रा न घेता अजान देताना आवाज कमी ‘डेसिबल’मध्ये राहील याची काळजी घेतल्याने चिंता मिटली. राज्यात कुठेही अनवस्था प्रसंग ओढवला नाही.

राणा दाम्पत्याची तयारी

हाच धागा पकडून राणा दाम्पत्याने त्यावेळी अमरावतीतील मंदिरांमध्ये हनुमान चालिसा लावण्यासाठी मोफत भोंग्यांचे वाटप केले. राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून उठलेले वादळ शांत झालेले नव्हते, तोच राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा हट्ट धरला. त्यानंतर शिवसैनिकांची जोरदार निदर्शने, राणा दाम्पत्यावर दाखल झालेला गुन्हा, अटक, १४ दिवसांचा तुरूंगवास हा घटनाक्रम घडला. राणा दाम्पत्याने यातून राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते.

हिंदुत्वाची ‘कार्यक्रम पत्रिका’

राणा दाम्पत्याने एप्रिल २०२३ मध्ये लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून हिंदुत्वाची ‘कार्यक्रम पत्रिका’ तयार केली. हनुमान जयंतीच्या निमित्ताने सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेतला. मालखेड मार्गावर छत्री तलावानजीक १११ फूट उंचीची श्री हनुमानाची मूर्ती उभारण्याची घोषणा केली. त्याआधी ‘हिंदू शेरणी’ असा उल्लेख असलेले मोठमोठाले फलक अमरावती, मुंबईत लागले होते. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना पराभव पत्करावा लागला, पण श्री हनुमानाची मूर्ती उभारणीचे काम थांबले नाही. ही मूर्ती आता तयार झाली आहे.

धार्मिक पर्यटनासाठी १२१ कोटी

महायुती सरकारने ‘हनुमान गढी’ येथे धार्मिक पर्यटनासाठी १२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापुर्वी इतका निधी कोणत्याही एका स्थळाला मंजूर झाल्याचा इतिहास नाही. सर्वप्रथम माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर आक्षेप घेतला. या प्रकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांची भागिदारी तर नाही ना, अशी शंका उपस्थित करीत यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील इतर देवस्थानांसाठी निधी का दिला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. अलीकडेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केले. रुग्णालयांसाठी साधा ९ कोटींचा निधी मिळत नाही आणि राणांच्या हनुमान गढीला सहजपणे १२१ कोटी मिळतात. हनुमान गढीच्या दर्शनासाठी १ लाख लोक येतात, असा खोटा अहवाल एका पोलीस अधिकाऱ्याने दिला होता, असा आरोप अंधारे यांनी केला.

राणा दाम्पत्याचे प्रत्युत्तर

हनुमान चालिसाचे पठण केले म्हणून नवनीत राणांना उद्धव ठाकरेंनी १४ दिवस तुरूंगात पाठवले आणि हनुमान गढीवर टीका करण्यासाठी त्यांनी सुषमा अंधारेंना अमरावतीत पाठवले अशी टीका रवी राणांनी केली. उद्धव ठाकरे नास्तिक झाले आहेत, असा टोला राणांनी लगावला. तर दुसरीकडे, १२१ कोटींचा निधी अनेकांच्या डोळ्यात खुपत असल्याचे सांगून धार्मिक स्थळांना देण्यासाठी सरकारजवळ लाखो, कोट्वधी रुपये आहेत, आमच्या आस्थेवर, धर्मावर, देवी-देवतांवर कुणी टीका करू नये, असा इशारा नवनीत राणांनी दिला. यातून राणा दाम्पत्याने ‘हिंदुत्वा’चा झेंडा हाती घेऊन पुढील राजकीय वाटचाल सुरू ठेवण्याचेच संकेत दिले आहेत.