अमरावती : अमरावतीत जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहता या निवडणुकीमधील चुरस चांगलीच वाढली आहे. जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांनी अद्यापही एकवाक्यता न दाखवल्याने भाजप स्वबळावरच ही निवडणूक लढण्याची चिन्हे आहेत. प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये होईल, असे प्राथमिक चित्र आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा थेट परिणाम या स्थानिक निवडणुकीवर होणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये घटक पक्षांचे संख्याबळ बदलल्यामुळे, आतापर्यंतच्या जागावाटपाची पारंपारिक समीकरणे विस्कळीत झाली आहेत. अचलपूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, शेंदुरजनाघाट, चांदूरबाजार, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या १० नगरपालिका आणि नांदगाव खंडेश्वर व धारणी या दोन नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. एकूण २७८ नगरसेवक आणि १२ नगराध्यक्ष निवडले जातील.

सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. एकेका जागेसाठी चार ते पाचजण दंड थोपटून आहेत. त्यामुळे या इच्छुकांची समजूत कशी काढायची? याची डोकेदुखी नेतेमंडळींना लागून राहिली आहे. अचानक निवडणूक जाहीर झाली असल्याने अनेक ठिकाणी उमेदवारांची नावे अद्याप निश्चित केलेली नाहीत. इच्छुकांची फौज तयार असून कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला थांबवायचे, हा प्रश्न नेत्यांना पडला आहे.

स्थानिक समीकरणे वरचढ

सहा प्रमुख पक्ष आहेत. मात्र, काही ठिकाणी स्थानिक समीकरणे वरचढ ठरत आली आहेत. प्रहार जनशक्ती पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष यासारखे पक्ष देखील तयारीला लागले आहेत. यात थेट जनतेतून निवडून जाणारे नगराध्यक्षपदे महत्वाची ठरणार आहेत. आपलाच नगराध्यक्ष व्हावा, यासाठी सर्व राजकीय पक्ष प्रयत्न करणार आहेत.

२०१७ ची स्थिती

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला अंजनगाव सुर्जी, वरूड, दर्यापूर, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे आणि शेंदूरजनाघाट या नगरपालिकांमध्ये सत्ता मिळाली होती. तर चिखलदरा आणि चांदूर रेल्वे येथे काँग्रेसची सत्ता होती. मोर्शीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि अचलपुरात शिवसेनेचे वर्चस्व होते. नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत भाजपची तर धारणीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती.

जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे या निवडणुका भाजपच्या आमदारांसाठी परीक्षाच ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. मात्र, वर्षभरापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, त्यामुळे काँग्रेस पक्षावरही दडपण आहे.

भाजपच्या आमदारांची कसोटी

जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. विशेषतः ज्या आमदारांनी विधानसभेत विजय मिळवला, त्यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड आहे की नाही, याची थेट परीक्षा आहे. आमदार आपल्या प्रभावाखाली किती नगर परिषदा आणू शकतात, यावर त्यांचे राजकीय वजन ठरणार आहे.