अमरावती: अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातील निवेदनात तरूणांनी अलीकडच्या काळात केलेल्या आंदोलनाला ‘अराजकता’ असे संबोधण्यात आल्याने वाद पेटला आहे. सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत त्यांच्याच विचारांना तिलांजली देण्यात येत असल्याची तीव्र प्रतिक्रिया या निमित्ताने उमटली आहे.

मोझरीत नेमके काय घडले?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो गुरूदेवभक्त त्यांना मौन श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी गुरूकूंज मोझरी येथील आश्रमात एकत्र येतात. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आयोजकांकडून लेखी निवेदन वाचून दाखवले जाते. त्यात राष्ट्रसंतांच्या विचारांचा अंतर्भाव अपेक्षित असतो. पण, यंदा या निवेदनात दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलन, पुण्यातील एमपीएससी पेपरफुटीविरोधातील आंदोलनाबद्दल टीका करण्यात आली होती. देशात युवकांना हाताशी धरून आंदोलने केली जात आहेत. युवकांच्या मनात एक वेगळ्या प्रकारचे विष कालवून त्यांच्या माध्यमातून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. देशात भाषावार संघर्ष अशोभनीयरीत्या जोर पकडत असल्याचे निवेदनात म्हटले होते.

निवेदनावरील आक्षेप काय?

राष्ट्रसंतांच्या विचारांना सेवा मंडळात आज अडगळीत टाकण्यात आले आहे. तरूणाईच्या आंदोलनाला अराजकता संबोधणारे निवेदन लिहिणाऱ्यांनी सेवा मंडळाचा बळी देऊन आता कुणासाठी काम करतो, हे दाखवून दिले आहे, असा आरोप श्री गुरूदेव सेवा मंडळाचे माजी उपसर्वाधिकारी रुपराव वाघ यांनी केला आहे. लोकांनी आता कर्मठ हिंदू झाले पाहिजे व विशिष्ट राजकीय पक्षालाच मतदान केले पाहिजे, हाच सुप्त व गुप्त संदेश देण्याचे काम यावेळी केल्या गेले. स्वतःच्या खाजगी संस्थेसाठी, सरकारला किती खुश करू आणि किती नाही, अशी श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांची स्थिती झाली आहे, असा आरोपही रुपराव वाघ यांनी केला आहे.

हिंदुत्ववादी संघटनेच्या दावणीला

राष्ट्रसंतांच्या सर्वधर्मसमभावाच्या विचारांची पायमल्ली करून सेवा मंडळाला जनते पासून परावृत्त करण्याचा डाव रचण्यात आला आहे. सेवा मंडळाला हिंदुत्ववादी संघटनेच्या दावणीला बांधायला सेवा मंडळ निघाले आहे आणि मुळात आज सेवा मंडळ फक्त नावाला आहे, सर्व कारभार बोथे पितापुत्र चालवत आहेत, अशी टीका देखील रुपराव वाघ यांनी केली आहे. गुरूकूंज मोझरी येथे कधीही द्वेष व परधर्माबद्दल अनादर माझ्या तरी पाहण्यात आला नाही. मात्र मागील काही वर्षांपासून जे प्रदूषित विचार यात जाणीवपूर्वक घुसवल्या गेलेत, ते वेदनादायी व तितकेच निषेधार्थ आहेत, असे माजी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांचे म्हणणे आहे.

प्रतीके हटवल्याचाही आक्षेप

पूर्वी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, बौद्ध इत्यादी सर्व धर्माची प्रतीके लावण्यात येत होती, तसेच सर्व धर्माच्या प्रार्थना त्या त्या धर्मातील व्यक्तींकडूनच म्हटल्या जात असत. परंतु अलीकडे व्यासपीठावरील सर्व धर्माची चिन्हे, प्रतीके लावल्याच जात नाहीत, ती आता काढून टाकण्यात आली आहेत, असे रुपराव वाघ यांचे निरीक्षण आहे. कार्यक्रमातील निवेदनाला कार्यकारिणीची मान्यता होती काय, त्यातील मजकूर कोणी तयार करायला सांगितला, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, प्रचार प्रमुख व कार्यकारिणीचे काय म्हणणे आहे, हे बाहेर यायला पाहिजे, अशी अपेक्षा रुपराव वाघ यांनी व्यक्त केली आहे.