अमरावती : अमरावती महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाली. भाजपचा महापौर निवडून आला. सार्वत्रिक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले महायुतीतील घटक पक्ष महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एकत्र आले खरे, पण सत्तेचा गाडा हाकताना भाजपसमोर दोन परस्परविरोधी विचारांच्या पक्षांसोबत जुळवून घेण्याचे आव्हान आहे.
भाजपचे २५, युवा स्वाभिमान पक्षाचे १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ११, शिवसेना शिंदे गटाचे ३ असे ५४ सदस्य मिळून महापालिकेवर महायुतीची सहजपणे सत्ता स्थापन होईल, असे चित्र होते, पण मध्यंतरीच्या काळात युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादीविना भाजपचा महापौर होईल, असा दावा केल्याने संघर्षाची ठिणगी पडली. त्यातच भाजप जर रवी राणांची सत्तेसाठी मदत घेणार असेल, तर राष्ट्रवादी सोबत नसेल, असे आमदार संजय खोडके यांनी आधीच स्पष्ट केल्याने पेच निर्माण झालेला.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चाही झाली. दरम्यान, विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आणि बदललेल्या परिस्थितीत संजय खोडके यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देऊन तलवार म्यान केली.
महापालिकेतील संख्याबळ असे की, महायुतीतील घटक पक्षांना एकत्र घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नव्हती. रवी राणा यांनी महायुतीखेरीज इतर पक्षांतील सदस्यांना हाताशी धरून सत्ता काबीज करण्याची रणनीती आखली होती. पण, सत्तेसाठी अशा प्रकारच्या तडजोडीने चुकीचा संदेश जाण्याची भीती होती, त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आमदार संजय खोडके यांच्याशी संपर्क साधून सत्तेत सन्मानाने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला खोडके यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला.
भाजपची खरी अडचण
युवा स्वाभिमान पक्षाला सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही आणि खोडके, राणा यांच्यातील राजकीय संघर्ष थांबणार नाही, हे ठाऊक असतानाही युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन परस्परविरोधी विचारांच्या पक्षांना सोबत घेण्याचा अपरिहार्य निर्णय भाजपला घ्यावा लागला. आगामी काळात भाजपला सत्तासंतुलन साधताना बरीच कसरत करावी लागणार आहे. भाजपने उपमहापौरपद युवा स्वाभिमान पक्षाला दिले आहे. स्थायी समिती सभापतीपद कुणाला मिळेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला देखील सत्तेतील वाटा द्यावा लागणार आहे. युवा स्वाभिमान, राष्ट्रवादीसोबतच शिवसेना शिंदे गटालाही समाधानी ठेवण्यासाठी भाजपला परिश्रम घ्यावे लागतील.
पहिल्याच सभेत विसंवादाची चुणूक युवा स्वाभिमान पक्षाची आक्रमक राजकारणाची शैली ही भाजपला पेलावणार का, हा प्रश्न चर्चेत आला. एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी आपले मत महायुतीला दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. एमआयएमने तत्काळ मीरा कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांचे सदस्यपद रद्द करावे, असे पत्र दिले. पण, त्यानंतर महायुतीतील विसंवाद उघड झाला. मीरा कांबळे आणि त्यांचे पुत्र संदीप कांबळे हे गेल्या वीस वर्षांपासून युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आहेत, असा दावा युवा स्वाभिमान पक्षाने केला. मात्र, या प्रकरणाशी भाजपचा संबंध नाही, एकवेळ पराभव झालेला चालेल, पण एमआयएमचे मत नको, असे स्पष्टीकरण भाजपला द्यावे लागले. आता अशाच काटेरी वाटेवरून भाजपला आगामी काळात मार्ग काढावा लागणार आहे.

