अमरावती: जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमधील संघर्ष नवा नसला, तरी या संघर्षांची दाहकता आता जाणवू लागली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाल्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी लगेच श्रीक्षेत्र बहिरम येथील यात्रेत चिथावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप कडू समर्थकांनी केला आणि तेथून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोपांचे सत्र संपलेले नाही. बच्चू कडू यांच्या विरोधातील ताजी पोलीस तक्रार गंभीर स्वरूपाची आहे. हा संघर्ष आता कोणत्या वळणावर पोहचेल, याची चर्चा रंगली आहे.
बच्चू कडू यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याची कट रचल्याची तक्रार आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. कडू यांनी या आरोपांचे खंडन केले आणि हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे संकेत दिले. अचलपूर नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येत असताना दोन्ही नेत्यांमधील युद्ध आता कोर्ट-कचेरीपर्यंत पोहचल्याने कार्यकर्त्यांमध्येही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरोप प्रत्यारोपांची राळ
नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर लगेच बहिरमची यात्रा पार पडली. या जत्रेत राजकीय धुरळा उडाला. प्रवीण तायडे यांचे स्वागत फलक अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रवीण तायडे यांनी जीभ घसरली. त्यांनी बच्चू कडू यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत त्यांना शिवीगाळ केली आणि माझ्या वाटेला जाऊन नका, तुमचे कितीही कार्यकर्ते घेऊन या, मी कुठेही येण्यास तयार आहे, अशा शब्दात आव्हानही दिले. त्यांच्या या भाषणाची ध्वनिचित्रफीत प्रसारीत झाल्यानंतर प्रहारचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले होते. तेव्हापासून दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पेटला आहे.
बच्चू कडूंच्या आंदोलनाची धग
बच्चू कडू यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केले. हे आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनाची धग भाजप-महायुती सरकारपर्यत पोहचली. या आंदोलनावरून लक्ष हटविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून बरेच प्रयत्न झाले, पण बच्चू कडू मात्र हटले नाहीत. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पांठिंबा मिळाला. आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न करूनही हे आंदोलन यशस्वी झाले. आता सरकारला त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे. चालू कर्ज माफ करावे, ही नवीन मागणी घेऊन बच्चू कडू राज्यभर फिरताहेत. सरकारची कोंडी झालेली आहे. त्यातच बच्चू कडू यांच्यावर पुन्हा आरोपांचे सत्र सुरू झाले आहे.
‘हवा महल’चा आरोप
कर्जमाफीचे आंदोलन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार प्रवीण तायडे यांनी पत्रव्यवहार करीत बच्चू कडू यांनी बांधलेल्या ‘हवा महल’ची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. गरिबांच्या जमिनी लाटून बच्चू कडू यांनी कुरळपूर्णा येथे ७२ एकर जागेवर स्वत:चे निवासस्थान, अलिशान फार्म हाऊस, विविध सुख सुविधा असलेल्या वास्तू उभारल्या, असा आरोप तायडे यांनी केला होता. कडूंनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. कोणत्याही चौकशीसाठी सज्ज आहोत, असे आव्हान दिले. आता बच्चू कडू यांच्यावर जीवे मारण्याचा कट रचल्याचा गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा संघर्ष अटळ असल्याचे चित्र आहे.
