अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीपुढे मित्रपक्षांमधील बंडखोरीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एकेकाळी शिक्षक संघटनांचे वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघावर अलीकडच्या काळात राजकीय प्रभाव दिसू लागला. यावेळी शह-काटशहाचे राजकारण देखील रंगले आहे.
विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी २०२४ मध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यावेळी त्यांना या पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. पण, भाजपमधील बंडखोर उमेदवारांनी त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे, भाजपचे बंडखोर चंद्रशेखर भोयर, सुमित पवार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. ही बंडखोरी मोडून काढण्याचे आव्हान शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे.
‘पैठणी पॅटर्न’ चर्चेत
किरण सरनाईक हे वाशिम जिल्ह्यातले. ते आधी काँग्रेसमध्ये होते. २०२० च्या निवडणुकीत मतदारांना पैठणी आणि रोख रक्कम वाटप केल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर ‘पैठणी पॅटर्न’ हा शब्द राजकीय चर्चेत आला होता. किरण सरनाईक यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. किरण सरनाईक यांना १५ हजार ६०६ तर देशपांडे यांना ९ हजार १९१ मते प्राप्त झाली होती. यावेळी प्रा. देशपांडे देखील शड्डू ठोकून रिंगणात उतरले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवारी मागितली होती, पण त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. किरण सरनाईक यांना भाजपमधील बंडखोरांसह पक्षांतर्गत बंड शमवण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागत आहेत.
शह-काटशहाचे राजकारण
किरण सरनाईक हे महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार करीत असले, तरी भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते त्यांच्या सोबत आलेले नाहीत. त्यात महायुतीचा घटक असलेल्या आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानेही रिंगणात उडी घेतल्याने वेगळाच संघर्ष पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार प्रा. दिलीप कडू यांच्या प्रचार सभेला उपस्थित राहून ‘सस्पेन्स’ वाढवला. आधीच महायुतीतील नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळला जाणार का, याविषयी साशंकता आहे. महायुतीतील दुसऱ्या पक्षाचा प्रभाव वाढावा, अशी ‘कर्ण’वृत्ती कुणी दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे.
महाविकास आघाडीत मैत्रिपूर्ण लढत?
महायुतीत पेच असताना महाविकास आघाडीतही आलबेल नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आधीच बुलढाणा जिल्ह्यातील दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी बहाल केली होती. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. दुसरीकडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या अदिती पोहरे यांचा काही दिवसांपुर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला, लगेच त्यांना उमेदवारीही जाहीर केली. पण, त्यामुळे महाविकास आघाडीतील विसंवाद समोर आला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या जाळ्याचा फायदा अदिती पोहरे यांना होईल, असा काँग्रेसच्या नेत्यांचा कयास आहे, पण २०१४ च्या निवडणुकीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अरूण शेळके यांना पराभव पत्करावा लागला होता. या दोन पक्षांमध्ये मैत्रिपूर्ण लढत ही अटळ मानली जात आहे.
शिक्षक संघटनांचीही झुंज
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रा. दिलीप कडू यांच्यासह विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. प्रशांत विघे, ‘शिक्षक भारती’चे प्रा. सुरेश देवकर, ‘मेस्टा’चे किरण चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे गाजी मोहम्मद जाहेरोश यांच्यासह ३१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी किती जण माघार घेतात हे शुक्रवारी समजेल. राजकीय कारकीर्द घडवून आणण्यासाठी या मतदार संघाचा वापर होणार का, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
