अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत पक्षीय बलाबल गौण तर घोडेबाजार वरचढ ठरल्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार काय, हा प्रश्न चर्चेत आला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांना भलेमोठे खिंडार पाडून भाजपचे प्रवीण पोटे एकतर्फी निवडून आले होते. यावेळी सत्तारूढ शिवसेना शिंदे गटानेही मतदारसंघावर दावा केल्याने चुरस निर्माण झाली आहे.
अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघात मे २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपचे संख्याबळ १९९ असताना प्रवीण पोटे यांना ४५८ मते, तर काँग्रेसकडे १२८ मतांचे पाठबळ असताना काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ १७ मते पडली होती. पुरेसे संख्याबळ पदरी नसतानाही प्रवीण पोटे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली, तेव्हाच घोडेबाजाराला ऊत येणार हे स्पष्ट झाले होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात तर मतदार फुटू नये, यासाठी ‘लाखमोला’चा नैवैद्य दाखविण्याची खबरदारी घेण्यात आली होती. विजयासाठी २३८ मतांचा ‘कोटा’ ठरलेला असताना पोटे यांना जवळपास दुप्पट ४५८ मते प्राप्त झाली, तेव्हा संख्याबळापेक्षा ‘अर्थपूर्ण’ व्यवस्थापन महत्वाचे असते, यावर शिक्कामोर्तब झाले होते.
प्रवीण पोटे यांच्यापुढे आव्हाने
गेल्या निवडणुकीच्या वेळी प्रवीण पोटे यांच्याकडे मंत्रिपद होते. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून वजन होते. यावेळी त्यांच्याकडे कुठलेली पद नाही. विरोधकांची संख्याही वाढली आहे. प्रवीण पोटे यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे हेही भाजपच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. प्रवीण पोटे यांचे कट्टर विरोधक युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यावेळी काय भूमिका घेतात, याकडेही अनेकांचे लक्ष आहे. रवी राणा यांचे बंधू सुनील राणा यांनी देखील उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने आपली पकड मजबूत केली असली, तरी विजय मिळवण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. यात वैयक्तिक संबंध, आर्थिक व्यवहार देखील महत्वाचे ठरणार आहेत.
बाजोरिया यांचीही तयारी
अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे. अकोल्याचे माजी विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असून याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मला अंतिम व मान्य राहील, असे त्यांनी म्हटले आहे. गोपीकिशन बाजोरिया यांनी मुंबई आणि अमरावतीत काही महत्वाच्या नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत. काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळेल, याची उत्सुकता आहे.
जिल्हा परिषद सदस्यांविना निवडणूक
प्रथमच जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींविना ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य हे या निवडणुकीत मतदार असतात. ते यावेळी नाहीत. या मतदारसंघात एकूण ४५३ मतदार आहेत. त्यात महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत सदस्यांचा समावेश आहे. या मतदारांमध्ये भाजपचे १५०, काँग्रेस १२०, शिवसेना शिंदे गट १८, शिवसेना उद्धव ठाकरे गट २१, राष्ट्रवादी अजित पवार गट ३३, राष्ट्रवादी शरद पवार गट ११, एमआयएम १६, बसप ३, वंचित बहुजन आघाडी ७, समाजवादी पक्ष २, युवा स्वाभिमान पक्ष २६, प्रहार जनशक्ती पक्ष २१ आणि अपक्ष २५ सदस्यांचा समावेश आहे.
