अमरावती: लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुरू झालेल्या भाजपमधील अंतर्गत संघर्षाची मालिका संपण्याचे नाव घेत नाहीये. विधान परिषदेच्या निवडणुकीतही उत्कंठा वाढविणारे नवीन पात्र या मालिकेत सहभागी झाले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपत कुठेलेही मतभेद नसल्याचा दावा केला असला, तरी ही निवडणूक भाजपसाठी गेल्या निवडणुकीइतकी सोपी राहिलेली नाही, असे चित्र आहे.

बाजोरियांच्या प्रवेशाने चूरस

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख, अपक्ष विप्लव बाजोरिया, वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्वकर्मा आणि अपक्ष प्रशांत महल्ले हे पाच उमेदवार आहेत. विप्लव बाजोरिया हे शिवसेना शिंदे गटाचे माजी विधान परिषद सदस्य आहेत. यावेळी त्यांच्या परभणी-हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अमरावतीकडे मोर्चा वळवला. पण हे एकाएकी घडलेले नाही. विप्लव बाजोरिया आणि त्यांचे वडील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी त्यासाठी पूर्वतयारी करून ठेवली होती. ही महायुतीतील बंडखोरी मानली जात असली, तरी पडद्यामागील सूत्रधार वेगळेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राणा दाम्पत्याची नाराजी

प्रवीण पोटे यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा महायुतीचे शक्तिप्रदर्शन होईल, हा पोटे समर्थकांचा अंदाज खोटा ठरला. महायुतीचे घटक असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि भाजपच्या नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांच्या अनुपस्थितीने त्यांच्या नाराजीच्या चर्चेला तोंड फुटले. ही नाराजी एका दिवसाची नाही, तर लोकसभा निवडणुकीपुर्वीची आहे. राणा आणि पोटे यांच्यातील संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समोर आल्याचे बोलले जात आहे. आता त्यातून मार्ग काढण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना समेट घडवून आणावा लागेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट येईल. पण, सर्वकाही ‘आलबेल’ नाही, हा संदेश राणा दाम्पत्याच्या अनुपस्थितीने दिला आहे. २०२८ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळीही राणा-पोटे यांच्यातील द्वंद्व दिसून आले होते, पण त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर राणांनी तलवार म्यान केली होती.

पोटेंचा दावा सूचक

अमरावतीची उमेदवारी प्रवीण पोटे यांना तिसऱ्यांदा मिळाली आहे. त्यांना या निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे. जिंकण्यासाठी पूर्ण व्यूहरचना केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भाजपमध्ये फूट पडणार नाहीच शिवाय इतर पक्षांतील सदस्यांचीही मते मिळतील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीतील घोडेबाजाराची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे. दुसरीकडे, विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारीने या लढतीत वेगळाच रंग भरला आहे. गेल्या निवडणुकीत प्रवीण पोटे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ४४१ मतांनी पराभव केला होता. काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगढीया यांना केवळ १७ मते प्राप्त झाली होती. काँग्रेसचे त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १२८ सदस्य होते, त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये भलेमोठे खिंडार पडल्याचे दिसून आले होते. आता या निवडणुकीत मात्र भाजपसमोर मतविभागणीचा धोका आहे. ही निवडणूक राजकीय सूडनाट्याचा नवा अंक ठरणार का, ही उत्सुकता आहे.