बिहारमधील बाहुबली नेते अनंत सिंह यांना न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बिहारमधील मोकामा या भागावर अनंत सिंह आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर वर्चस्व होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारमधील या बाहुबली नेत्याला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा बिहारचे भावी मुख्यमंत्री नितीश कुमार हे बरह आणि नालंदा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते तेव्हा अनंत सिंह यांची नितीश कुमार यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी नितीशकुमार यांना निवडून येण्यासाठी जमीनदारांची मते महत्वाची होती. त्यामुळे यावेळी अनंत सिंह यांनी नितीश कुमार यांना दिलेला पाठिंबा महत्त्वपूर्ण होता.

अनंत सिंह यांचा मोठा भाऊ दिलीप सिंह यांना बिहारमध्ये ‘बडे सरकार’ म्हणून ओळखले जाते. ते राबडी देवी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांनी त्यावेळी ‘छोटे सरकार’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आपल्या धाकट्या भावाला राजकारणात प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत बरह मतदार संघातून नितीश कुमार निवडणूक हरले मात्र नालंदा येथून त्यांना विजय मिळवण्यात यश मिळाले. या निवडणुकीनंतर नितीश कुमार आणि जनता दल युनायटेडने अनंत सिंह यांचे महत्व ओळखुन त्यांना पक्षात आणले.

गेल्या चार दशकांतील बिहारमधील सर्वात वादग्रस्त राजकारण्यांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या आणि तब्बल पाच टर्म मोकामाचे बाहुबली आमदार असणाऱ्या अनंत सिंह यांना मंगळवारी पाटण्याच्या न्यायालयाने शस्त्रास्त्र कायद्याखाली १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता तीन दशकांहून अधिक काळ ज्या भागावर त्यांनी वर्चस्व राखलं त्याच भागावर आता आपली पकड कायम रहावी यासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे.

अनंत आणि दिलीप सिंग यांनी १९८० मध्ये मोकामा येथे काँग्रेसचे ताकदवान नेते श्याम सुंदरसिंह यांच्यासोबत राजकीय कामाला सुरुवात केली. पाच वर्षांनंतर दिलीप सिंह यांनी आपल्याच गुरुंविरोधातच निवडणूक लढवली पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. १९९० मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. यावेळी मात्र सिंह यांनी विजय मिळवला, या विजयानंतरच दिलीप सिंह आणि त्यांच्या भावाचे वर्चस्व प्रस्तापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून, २००० ते २००५ या पाच वर्षांचा अपवाद वगळता सिंह बंधूंनी मोकामावर आपले वर्चस्व राखले आहे.

मोकामा हा सखल असून हा भाग कित्येक महिने पाण्याखालीच असतो. या भागातील जमीन सुपीक असून कडधान्ये, प्रामुख्याने हरभरा आणि मसूर यांच्या लागवडीसाठी ओळखला जाते. अनंत सिंग जेडी(यू) मध्ये आल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी आणि ऑक्टोबर २००५ मध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि दोन्ही वेळा त्यांचा विजय झाला. पुढच्या वर्षी दिलीप सिंह यांचे निधन झाले. त्यानंतर २०१० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अनंत सिंग यांनी आपला मतदारसंघ राखला होता. या भागावर सिंह यांचे प्रचंड नियंत्रण आहे. मोकामा मतदारसंघावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनंत सिंह यांना राजकीय पक्षाच्या समर्थनाची कधीच गरज भासली नाही.