Ankita Bhandari murder case तीन वर्षांनंतर अंकिता भंडारी हत्या प्रकरणामुळे उत्तराखंडचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. एका महिलेने केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी भाजपा अडचणीत सापडली आहे. उर्मिला सनावर नावाच्या या महिलेने आपण माजी भाजपा आमदार सुरेश राठोड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा केला आहे. गेल्या दोन वर्षांत सनावर यांच्यावर १० गुन्हे दाखल झाले असून, त्यांनी ऑनलाइन अनेक व्हिडीओ अपलोड केले आहेत. या व्हिडीओंमध्ये त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते दुष्यंत गौतम यांचा या हत्येशी संबंध असल्याचे म्हटले आहे. या आरोपामुळे उत्तराखंडचे राजकारण चांगलेच तापले आहे. नेमकं प्रकरण काय? कोण आहेत सुरेश राठोड अन् उर्मिला सनावर? त्यांच्या व्हायरल क्लिपमध्ये काय? जाणून घ्या…

प्रकरण काय?

गेल्या महिन्यात त्यांनी राठोड यांच्याशी झालेल्या कथित संभाषणाची एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली. यात राठोड यांनी कथितपणे गौतम यांची ओळख ‘व्हीआयपी’ व्यक्ती म्हणून केली आणि ही व्यक्ती ऋषिकेशमधील वनतारा रिसॉर्टमध्ये अंकिता भंडारीच्या हत्येच्या दिवशी (२०२२ मध्ये) उपस्थित होती, असा दावा करण्यात आला. १९ वर्षीय अंकिता तिथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. बेपत्ता झाल्याच्या सहा दिवसांनंतर तिचा मृतदेह सापडला होता आणि गेल्या वर्षी माजी भाजपा नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य याला या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय सचिव दुष्यंत गौतम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी सनावर, माजी ज्वालापूर आमदार राठोड आणि विरोधी पक्षांवर आपली बदनामी केल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाने बुधवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला गौतम यांच्याशी हत्येचा संबंध जोडणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट २४ तासांच्या आत हटवण्याचे निर्देश दिले. व्हिडीओ पोस्ट झाल्यापासून हरिद्वार आणि डेहराडूनमध्ये अनेक एफआयआर दाखल झाले आहेत.

कोण आहेत उर्मिला सनावर?

सनावर या उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील अभिनेत्री असून त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांची आणि राठोड यांची पहिली भेट २०२२ मध्ये झाली. त्यावेळी राठोड हरिद्वारमधील रविदास विश्वपीठाचे आचार्य होते आणि दलित राजकारणात सक्रिय होते. आपल्या व्हिडीओंमध्ये सनावर यांनी सांगितले की, त्यावेळी त्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. त्या राठोड यांच्या शिष्या झाल्या आणि त्यांना ‘गुरुजी’ संबोधून त्यांच्याबरोबरचे व्हिडीओ पोस्ट करू लागल्या. सनावर यांच्या म्हणण्यानुसार, त्या दोघांनी मिळून एक टीव्ही मालिका तयार करण्याबाबतही चर्चा केली होती.

एका मुलाखतीत सनावर यांनी असा आरोप केला की, राठोड यांनी त्यांना डेहराडूनमध्ये जेवणासाठी बोलावले होते, जिथे त्यांना अमली पदार्थ देऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यांनी पुढे असा दावा केला की, राठोड यांनी त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. परिणामी त्यांच्याकडे २०२३ मध्ये लग्न करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. मात्र, राठोड यांनी हे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. सनावर यांनी व्हिडीओ पोस्ट करणे सुरूच ठेवल्यावर, राठोड यांनी सांगितले की त्या फक्त त्यांच्या एका चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत.

मात्र, सनावर यांनी आपण विवाहित असून तीन वर्षांपासून एकत्र असल्याचा दावा केला. जून २०२५ मध्ये दोघांनी एक पत्रकार परिषद घेतली, ज्यात राठोड यांनी पहिल्यांदाच मान्य केले की त्यांचे लग्न झाले आहे. यानंतर समान नागरी कायद्याचे (यूसीसी) उल्लंघन केल्याच्या कारणावरून राठोड यांची भाजपामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. मात्र, त्यानंतर त्यांनी हे पुन्हा नाकारले आणि सांगितले की ते फोटो त्यांच्या एका चित्रपटातील होते.

नोव्हेंबरमध्ये राठोड यांनी आपली पहिली पत्नी रवींद्र कौर यांच्याबरोबरचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला. त्यांनी सनावर यांच्यावर दोन वर्षांपासून आपल्याला धमकावत असल्याचा आरोप केला. यानंतर सनावर यांनी राठोड यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणारा व्हिडीओ पोस्ट केला आणि काही दिवसांतच त्यांनी अंकिता भंडारी प्रकरणातील व्हिडीओ अपलोड केला, ज्याने उत्तराखंडमध्ये खळबळ उडवून दिली.

तेव्हापासून त्यांच्यावर आयटी कायद्याच्या कलमांखाली चार एफआयआर दाखल झाले आहेत. यापूर्वीच्या किमान सहा प्रकरणांमध्ये त्यांच्यावर अश्लील साहित्य प्रसारित करणे, धार्मिक भावना दुखावणे आणि खंडणी मागणे असे आरोप आहेत. मे २०२५ मधील एका तक्रारीत त्यांच्यावर भगवान वाल्मिकींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. त्याआधी दोन महिने राठोड यांच्या मुलीने सनावर आणि एका व्यक्तीविरोधात आक्षेपार्ह फोटो प्रसारित करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती.

सुरेश राठोड कोण आहेत?

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी, विद्यमान आमदार असताना राठोड यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला होता. पोलिसांनी तक्रारदाराच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला नसल्याने, संबंधित महिलेने स्थानिक न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. राठोड यांनी दावा केला की, त्या महिलेला आधीच खंडणी प्रकरणात अटक झाली होती आणि ती आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत होती. नंतर त्या महिलेने पोलिस संरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. राठोड यांनी हे प्रकरण रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता आणि त्यानंतर पुराव्याअभावी पोलिसांनी हे प्रकरण बंद केले.

भाजपामध्ये सुमारे ४० वर्षांचा कार्यकाळ असलेल्या राठोड यांनी २०१२ मध्ये भगवानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांना यश आले नाही. २०१७ मध्ये त्यांनी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या ज्वालापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. रविदास पीठाचे आचार्य म्हणून त्यांनी समुदायाला एकत्र केले, ज्यामुळे ते आमदार म्हणून निवडून आले. राठोड हे एक व्यावसायिकदेखील आहेत. त्यांचे गॅस स्टेशन आहे आणि त्यांनी तामिळनाडूतील विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए. केले आहे. ते श्री गुरु रविदास आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील आहेत.

राठोड यांच्यावर असाही आरोप आहे की, त्यांनी रविदासिया समुदायातून दुष्यंत गौतम यांना बाजूला करण्यासाठी आणि स्वतःची पकड मजबूत करण्यासाठी ही बदनामीची योजना आखली. राठोड-सनावर यांच्या खोट्या आणि निराधार आरोपांमुळे संपूर्ण रविदास समाजात संताप निर्माण झाला असून शत्रुत्वाचे वातावरण तयार झाले आहे, असे सांगितले जात आहे.

२६ डिसेंबर रोजी झबरेरा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या एका एफआयआरमध्ये या दोघांवर खोटे व्हिडीओ तयार करून प्रसारित केल्याचा आणि रविदासिया समुदायात गौतम यांच्या प्रतिष्ठेला मोठी हानी पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी आमदारांनी अटकेपासून संरक्षणाची मागणी करत मंगळवारी उत्तराखंड उच्च न्यायालयात अंतरिम दिलासा अर्ज दाखल केला. न्यायालयाने आदेश दिला की, राठोड यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली जाऊ नये.