आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे इशारा दिला… राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना परभणीत भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला… विकासकामांसाठी निधी आणि महामंडळातील खातेवाटप रडखल्याने शिंदे गटातील अेक आमदार नाराज असल्याची चर्चा रंगली… अमित शाह यांनी मला हिंदुत्व शिकविण्याचा भानगडीत पडू नये, अन्यथा अनेक गोष्टी बाहेर येतील, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला… बिबट्यांना पाळीव प्राण्याचा देण्यात यावा, अशी अजब मागणी आमदार रवी राणा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली… या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…

अण्णा हजारेंचा फडणवीसांना इशारा

लोकायुक्त कायद्याला दोन वर्षे झाली तरीदेखील त्याची अंमलबजावणी होत नाही. हा कायदा लागू करण्याची राज्य सरकारची इच्छा दिसत नाही, अशी नाराजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्याची तातडीने अंमलबजावणी न झाल्यात ३० जानेवारी २०२६ पासून राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसणार, असा इशाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिला. नागपूरला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच हजारे यांनी ही भूमिका घेतल्याने अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा, यासाठी अण्णा हजारे यांनी अनेक उपोषणे केली. त्यांच्या या उपोषणानंतर केंद्रात लोकपाल कायदा लागू झाला होता. मात्र, राज्यात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने अण्णांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उगारले आहे. 

परभणीत भाजपात तीव्र मतभेद

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना परभणी जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  पाथरी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पक्षातल्याच काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. तर भुमरे यांचे जेवढे वय आहे तेवढा आपला भारतीय जनता पक्षातला अनुभव आहे, असे प्रत्युत्तर भाजपाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी दिले आहे. पाथरी नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडणुकीला उभे नव्हते. या ठिकाणी पक्षाने उमेदवार उभे करावेत अशी भूमिका त्यावेळी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी वाकोडकर हे पाथरी येथे निरीक्षक म्हणून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांना पक्षाच्यावतीने अधिकृतरित्या पाठवण्यात आले नव्हते. असे भुमरे यांचे म्हणणे आहे, तर आपण संघटन मंत्र्यांच्या सांगण्यावरून पाथरी येथे गेल्याचे वाकोडकर यांनी सांगितले आहे. आता मतदानाला काही दिवस लोटल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे.

आणखी वाचा : BMC Election : काँग्रेसने मुंबई महापालिकेवरील सत्ता कशी गमावली? निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

एकनाथ शिंदेंचे आमदार नाराज? 

विकासकामांसाठी निधी आणि महामंडळातील खातेवाटप रडखल्याने शिंदेंचे आमदार नाराज असल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपात मतभेद निर्माण झाले होते. या वादामुळेच शिंदेसेनेच्या काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा होती. अमित शाह यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवल्याचे सांगितले जाते. यादरम्यान विकास निधी आणि अनेक महामंडळाचे वाटप रडखडल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचे सूत्रांनी टीव्ही ९ मराठीला सांगितले आहे. ग्रामीण भागातील विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याने त्याचा पक्षाच्या मताधिक्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी नाराजी या आमदारांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोलून दाखवल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर या विषयावर तोडगा काढावा अशी विनंतीदेखील त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

उद्धव ठाकरेंचा अमित शाहांना इशारा

अमित शाह यांनी मला हिंदुत्व शिकविण्याचा भानगडीत पडू नये, अन्यथा अनेक गोष्टी बाहेर येतील, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिला. वंदे मातरम गीतावर सुरू झालेली वादाची चर्चा हा देशाचा राष्ट्रगीताचा अपमान आहे. मुळात ही चर्चा संघाचे कपडे उतरवण्यासाठी झाली आहे का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. श्यामाप्रसाद मुखर्जी हे भाजपच्या नेत्यांसाठी गुरुस्थानी आहेत. अनेक लोक त्यांना आदर्श मानतात. मात्र वंदे मातरमच्या चर्चेदरम्यान यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अनेक गोष्टींना उघडे पाडण्याचा प्रताप केलेला आहे. मुखर्जी यांनी या गीताला विरोध केला होता. ते स्वतः मुस्लिम लीग सोबत गेले होते. अनेक ठिकाणी त्यांनी मुस्लिम लीगसोबत युती केली होती. तसेच देशातील ‘ चले जाव’ आंदोलनाला त्यांचा विरोध होता असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे या चर्चेतून भाजपने श्यामाप्रसाद मुखर्जींचे पितळ उघडे पाडले, अशी टीका ठाकरे यांनी केली. दिल्लीमध्ये नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला जागा मिळावी म्हणून प्राचीन हिंदू मंदिर पाडण्यात आले. अमित शाह मला काय हिंदुत्व शिकवणार असेही ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा : तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी; भाजपा-शिंदेसेनेत टोकाचे वाद, फडणवीसांनी आमदारांना सुनावलं; वाचा ५ घडामोडी

आमदार रवी राणा यांची अजब मागणी

बिबट्यांना पाळीव प्राण्याचा देण्यात यावा, अशी अजब मागणी आमदार रवी राणा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी उच्छाद मांडला आहे. अनेक बिबटे शेतात, मानवी वस्तीत अगदी शहरी भागातील वसाहतींमधून मुक्त संचार करू लागले आहेत. यादरम्यान बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांचा प्रश्न सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही गाजत आहे. आज सभागृहातील चर्चेदरम्यान भाजपाचे समर्थक आमदार रवी राणा यांनी बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, अशी मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. बिबट्यांचे लहानपणापासून पालन केले, तर त्यांच्यापासून कोणालाही धोका निर्माण होणार नाही. शिवाय त्यांची नसबंदी करण्याची वेळही येणार नाही, असे राणा यांनी माध्यमांना सांगितले.