महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला हिंगोलीत मोठा धक्का बसला असून माजी आमदारासह जिल्हा प्रमुखांनी पक्ष सोडला… एकनाथ शिंदे यांच्या पक्षात तीन शिंदे तयार झाल्याचे म्हणत लवकरच या गटात मोठी फूट पडणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून भाजपावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले… शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला… कोल्हापुरात सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला असून ‘गोकुळ’ दूध संघावर राज्य सरकारने पाच संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरे गटाचे दोन शिलेदार फुटले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला हिंगोली जिल्ह्यात मोठा धक्का बसला. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत हिंगोली जिल्हाप्रमुख गोपी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल आणि अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांनीही शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदेसेनेच्या संघटनात्मक ताकदीत भर पडली आहे. माजी आमदार टारफे यांनी २०२४ मध्ये संतोष बांगर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

शिंदेंच्या पक्षातही मोठी फूट पडणार?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून एक खळबळजनक दावा केला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आता तीन वेगवेगळे शिंदे तयार झाले असून, त्यांना वेगवेगळ्या नेत्यांकडून राजकीय बळ दिले जात असल्याचे राऊत म्हणाले. त्यातील एका नेत्याला अमित शाह, तर दुसऱ्या नेत्याला फडणवीस ताकद देत असल्याचा दावाही राऊत यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट ज्या पद्धतीने कोसळण्याच्या दिशेने जात आहे, त्याच मार्गाने शिंदे गटाचीही वाटचाल सुरू असल्याची टीका त्यांनी केली. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काही जणांना आपल्या निर्णयांचा पश्चात्ताप होत असावा, असा टोलाही राऊत लगावला. दुःख व्यक्त करण्यासाठी माणसाला कोणाच्या तरी आधाराची गरज भासते, असे सूचक विधान करत त्यांनी शिंदे गटातील मोठी नाराजी असल्याचे सांगितले. दरम्यान राऊत यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

राज ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून भाजपावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमचे मोर्चे कशासाठी आहेत हे जर राज ठाकरेंनी समजून घेतले तर कदाचित ते अशा पद्धतीने बोलणार नाहीत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपाच्या नेतृत्त्वाखाली महायुतीच्या वतीने सोमवारी मुंबईत लोकशाही बचाव, अराजकता हटाव ही पदयात्रा काढली होती. त्यावरून राज ठाकरे यांनी भाजपाला चांगलेच खडेबोल सुनावले होते. तुम्ही सत्तेत आहात, मग मोर्चे कसले काढताय, असा संतप्त सवाल त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून उपस्थित केला होता. तसेच फक्त सत्ता येऊन चालत नाही. सत्ता अंगात असावी लागते, असा टोलाही राज यांनी लगावला होता. त्यांच्या या टीकेवर आमचे मोर्चे हे अराजकतेच्या विरोधातील असून संविधान वाचवण्यासाठी आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडी व्यवस्था परिवर्तन (रेजीम चेंज) करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याविरोधात हे मोर्चे आहेत. कारण रेजीम चेंजचा अर्थ संविधान बदलणे हाच असतो, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले आहे.

शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला. २१ जून २०२२ रोजी आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून भूमिका कायम होती. त्यावेळी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी काढलेला व्हीप वैधच होता, असा दावा मेहता यांनी केला. तसेच या फुटीनंतर विधानसभा मुदत संपल्यामुळे आता आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी निष्फळ ठरते, असेही ते म्हणाले. यावेळी मेहता यांनी राजेंद्रसिंह राणा आणि सुभाष देसाई प्रकरणातील न्यायालयीन निकालाचा दाखलाही दिला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा चिन्ह निर्णयाशी संलग्न आहे. तो विधानसभा अध्यक्षांचा घटनात्मक अधिकार आहे. सुभाष देसाई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तसे स्पष्ट केले आहे, असे मेहता म्हणाले. दरम्यान, आजची सुनावणी संपली असून आता या प्रकरणावर दिवाळीनंतर सुनावणी होणार असल्याचे सांगितले जाते.

कोल्हापुरात सतेज पाटील यांना मोठा धक्का

काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला असून कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर राज्य सरकारने पाच संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यातील चार संचालकांना थेट मतदानाचाही अधिकार देण्यात आला असून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला आपण उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले आहे. गोकुळ दूध संघाची पंचवार्षित निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला १३ तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. सर्व ताकद पणाला लावूनही झालेला पराभव महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला असून कोणत्याही परिस्थितीत गोकुळवर कब्जा करण्यासाठी सरकारने धावपळ सुरू केली आहे. त्यानुसार दूध संघावर राज्य सरकारने पाच संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.