गोवा विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला शह देण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या महिन्यात आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने एकत्र येऊन राज्यात नव्या आघाडीची घोषणा केली होती. मात्र, अवघ्या काही आठवड्यातच या आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी तयार झालेली ही आघाडी आता तुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सगळीकडेच सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या संयुक्त विद्यमाने लावण्यात आलेली बॅनर्स अचानक गायब झाल्याने या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी नवी आघाडी

गोव्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. सध्या या राज्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखली जात आहे. यादरम्यान आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने १३ सप्टेंबर रोजी ‘गोवा फर्स्ट’ या नव्या आघाडीची घोषणा केली होती. त्यावेळी दोन्ही पक्षांनी या आघाडीला त्यांनी ‘भाजपाविरोधी आणि काँग्रेसविरोधी’ व्यासपीठ म्हणून जाहीर केले होते. युतीची घोषणा होण्याच्या काही दिवस आधीच दोन्ही पक्षांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरात बॅनरबाजीही करण्यात आली होती. पक्षांतर आणि दगाफटक्याच्या मुद्द्यावरून या बॅनर्समधून भाजपा आणि काँग्रेसला थेट लक्ष्य करण्यात आले होते. “काँग्रेस आणि भाजपाने तुम्हाला दोनदा फसवले आहे, आता त्यांना तिसऱ्यांदा फसवू देऊ नका,” असा स्पष्ट संदेश या बॅनर्सवरून मतदारांना देण्यात आला होता. मात्र, मंगळवारी या आघाडीबाबत वेगळेच चित्र समोर आले.

गोव्यातील भाजपाविरोधी आघाडी डळमळीत?

मंगळवारी ‘गोवा फर्स्ट’ आघाडीने राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर लावलेले काँग्रेसविरोधी फलक हटवले. त्यातच गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भाजपाचा पराभव करण्यासाठी राज्यात सर्वपक्षीय ‘महाआघाडी’ आवश्यक असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही आघाडी आता काँग्रेसला सोबत घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरदेसाई म्हणाले की, राजकारणात मतदार हा राजा असतो. गोव्यातील मतदारांकडून मला केवळ एकच मागणी ऐकू येत आहे. तो म्हणजे- भाजपाचा पराभव करण्यासाठी महाआघाडी आवश्यक आहे. भाजपाविरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे, अशी त्यांची इच्छा आहे. हा जनआवाज इतका स्पष्ट आणि बुलंद आहे की, एखाद्या बहिऱ्या माणसालाही तो सहज ऐकू येईल.

काँग्रेसला आघाडीत घेण्याचा सरदेसाईंचा आग्रह?

आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना सरदेसाई पुढे म्हणाले की, तुम्ही गोव्यात आंबे घेऊन आलात आणि माणकुराडऐवजी दिल्लीचा हापूस किंवा दशहरी विकायला सुरुवात केली, तर तो विकला जाईल का? मुळीच नाही; कारण गोव्यातील लोकांना त्याची चव आवडत नाही. गोव्यातील जनतेला काय हवे आहे? त्यांना माणकुराडच हवा आहे. मग तो कार्डोझो माणकुराड असो किंवा बार्देश माणकुराड. पण त्यांना अस्सल माणकुराडच हवा आहे. यादरम्यान महाआघाडीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. भाजपाला खऱ्या अर्थाने विरोध करणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ही आघाडी प्रत्यक्षात आणायची असेल, तर मुख्य विरोधी पक्षाला लक्ष्य करून ती उभी करता येणार नाही. गोव्यातील जनतेला असेच वाटते आणि त्यांना जे हवे आहे, तेच आपल्याला करावे लागेल, असेही सरदेसाई म्हणाले.

काँग्रेसला आघाडीत घेण्यास आपचा तीव्र विरोध

विजय सरदेसाई यांनी काँग्रेसबरोबर महाआघाडीचे संकेत दिल्यानंतर आम आदमी पार्टीने त्यांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत सोमवारी पक्षाच्या कोअर कमिटीच्या वतीने समाजमाध्यमांवर एक पत्रक जारी करण्यात आले. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी गेल्या दशकभरात गोव्याचे वाटोळे केले आहे. राज्यातील मतदारांचा त्यांच्याविरोधातील रोष दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आपण काँग्रेसबरोबर आहात की गोव्यातील मतदारांबरोबर हे सरदेसाई यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले. यादरम्यान गोव्यातील आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वाल्मीकी नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. ‘गोवा फर्स्ट’ आघाडीमध्ये काँग्रेसला घेता येणार नसल्याचे सुरुवातीलाच ठरले होते. काँग्रेसच्या उमेदवारांचे संबंध थेट भाजपाशी जोडलेले असून, काँग्रेसकडून पक्षांतराची ‘हॅटट्रिक’ होण्याचीच सर्व चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ‘गोवा फर्स्ट’ ही आघाडी केवळ भाजपामुक्त आणि काँग्रेसमुक्तच राहील, असा पुनरुच्चार नाईक यांनी केला.

गोव्यात २०२२ मध्ये काय घडले होते?

२०२२ मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. ४० आमदारांचे संख्याबळ असलेल्या विधानसभेत भाजपाला २० जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसचे केवळ ११ आमदार निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसशी युती करून निवडणूक लढवलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीला फक्त एका जागेवरच समाधान मानावे लागले होते. फातोर्डा मतदारसंघातून विजय सरदेसाई स्वतः आमदार म्हणून निवडून आले होते. दुसरीकडे आम आदमी पार्टीने दोन जागा जिंकल्या होत्या. मात्र, निकालानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसच्या ११ पैकी तब्बल ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ तीनवर आले होते. यापूर्वी २०१९ मध्येही काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यामुळे गोव्यात काँग्रेसमधून भाजपामध्ये होणाऱ्या पक्षांतराचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यातच विजय सरदेसाई यांनी मांडलेल्या महाआघाडीच्या भूमिकेमुळे ‘गोवा फर्स्ट’ आघाडीसमोर नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसला या आघाडीत सामावून घेण्याची गोवा फॉरवर्ड पार्टीची भूमिका आहे, तर आम आदमी पार्टीने त्याला उघडपणे विरोध केला आहे. त्यामुळे ‘गोवा फर्स्ट’ आघाडीचे भवितव्य काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.