स्वच्छ सदरा, पायघोळ धोतर आणि तिरकी टोपी. जनसंघाच्या ‘दिवा’ जपत सहकार क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारा. कामात कमालीचा बारकावा. सहकारी दूध संघ, बँका या माध्यमातून कार्यकर्ता टिकवून धरावा लागतो हे गणित कळालेले भाजपचे नेते, अशी हरिभाऊ बागडे यांची ओळख. राजस्थानच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाल्याने भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना आनंद झाला. हरिभाऊ बागडे हे भिंतीवर निवडणूक चिन्ह रंगविण्यापासून काम करणारे. सायकलवर प्रवास करत पक्ष वाढविणारे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे दोन वर्षांपूर्वीच जाहीर केले होते. फुलंब्री मतदारसंघातून विजयी होणाऱ्या हरिभाऊ यांनी बांधणी करताना अनेक वर्षे कार्यकर्तेपण जपले. संस्था उभ्या करताना हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या कष्टाबाबतचा एक किस्सा संघ परिवारात कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत असतो. तो असा - तो काळ सहकारी बँकांवरून विश्वास कमी होण्याचा होता. माधवपुरा बँकेतून पैसे काढण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. देवगिरी बँकेतून गुंतवणूक काढावी, अशी अनेकांची मानसिकता होती. हेडगेवार रुग्णालयाची काही रक्कम अनामत म्हणून देवगिरी बँकेत ठेवली होती. ती काढून घ्यावी, असा विचार सुरू झाला तेव्हा ‘नाना’ आले. हवा तर माझा सात-बारा देतो, पण रक्कम काढू नका. संस्थेवर आपणच विश्वास वाढवायचा असतो, असे सांगून गेले. हेही वाचा - चंद्राबाबू नायडूंची एक साद आणि १६० आमदारांनी दिली साथ; नक्की काय घडलं? १९७२ च्या दुष्काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुष्काळ विमोचन समिती नेमली होती. त्याचे प्रांत कार्यवाह म्हणून हरिभाऊ बागडे कामाला लागले. आणीबाणीतही ते सक्रिय होते. नंतर सहकाराच्या वेगवेगळ्या प्रकल्पांत रमले. पण कामातील बारकावा अधिक. अभाविपचे एक अधिवेशन संभाजीनगरला होणार होते. या अधिवेशानासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना जेवणात गोड पदार्थ द्यावा आणि त्यासाठी हरिभाऊ बागडे चालवत असणाऱ्या देवगिरी साखर कारखान्यातून साखर मिळावी अशी विनंती करण्यासाठी काही कार्यकर्ते आले. किती कार्यकर्ते आहेत आणि किती साखर लागेल, असा प्रश्न हरिभाऊंनी विचारला. तेव्हा एक कार्यकर्ता म्हणाला, ३०० कार्यकर्ते आहेत, द्या एक पोतभर साखर. त्यावर हरिभाऊ म्हणाले, त्यांना साखरेचा पाक खाऊ घालणार आहात का ? एवढ्या कार्यकर्त्यांना किती सामान लागते हे आम्हाला माहीत आहे. तेव्हा जेवणाचे आम्ही बघू, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था करू असे सांगितले. त्यांच्या कामाकाजातील बारकावे अनेक जण सांगतात. विधिमंडळात धोतर नेसणाऱ्या आमदारांमध्ये हरिभाऊ तसे अलिकडे एकमेवच राहिले होते. हेही वाचा - कारण राजकारण : पवारांच्या बळाविना भुजबळ शक्तिहीन? विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले हरिभाऊ बागडे हे सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहेत. शाळेत असताना पेपर विक्री, आमदार, मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष असा बागडेंचा आजवरचा प्रवास राहिला आहे. सध्या ते फुलंब्री मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणाऱ्या बागडे यांनी १९८५ साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभेवर ते निवडून आले होते. जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर निवडून आलेल्या बागडे यांनी २०१४ मध्ये विधानसभेचे अध्यक्षपदही भूषविले. १९९५ ते ९७ दरम्यान ते मंत्री होते आणि १९९७ ते ९९ दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदही सांभाळले होते. त्यांना आता राज्यपाल पद देण्यात आले आहे.