शिक्षण, आरोग्य आणि भ्रष्टाचाराला विरोध या मुद्द्यांभोवती आम आदमी पक्षाचे राजकारण फिरत होते. परंतु, आता ‘आप’ने नवा मार्ग निवडल्याचे दिसून येते. २०२७ च्या सुरूवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केंजरीवाल यांनी सुवर्ण मंदिर असलेल्या अमृतसरमध्ये लव कुश मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला आहे. २७ जून रोजी केजरीवाल यांनी ‘शिव संध्या’ कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती.
मंदिर बांधण्याचा खर्च कोण उचलणार?
हिंदू मतदारांना साद घालण्यासाठी केजरीवाल यांनी केलेला हा सर्वात मोठा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. लव कुश मंदिर उभारण्यासाठी जवळपास १५० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मुद्दा भाजपाने उचलला होता. आता रामाच्या पुत्रांचे म्हणजेच लव व कुश यांचे मंदिर उभारण्याचे काम केजरीवाल करणार आहेत. राम मंदिरासाठी राजकीय व कायदेशीर लढा द्यावा लागला होता. परंतु, लव कुश मंदिराचा संपूर्ण खर्च पंजाब सरकार उचलणार असल्याचे कळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब सरकारचा पर्यटन विभाग मंदिर बांधण्याचा खर्च उचलणार आहे. “याबाबत सध्या फक्त घोषणा करण्यात आली आहे. बांधकामाचा खर्च १५० कोटी रूपये येण्याचा अंदाज आहे. प्लाननुसार तीन मजली मंदिर बांधले जाणार आहे”, अशी माहिती सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
आम आदमी पक्षाचे नेते व पंजाब वारसा आणि पर्यटन मंडळाचे सल्लागार दीपक बाली यांनी लव कुश मंदिराबाबत माहिती दिली. भगवंत मान सरकार त्यांच्या सध्याच्या कार्यकाळातच मंदिराचे काम सुरू करणार आहे. “सरकारच्या याच कार्यकाळात आम्ही मंदिराचे बांधकाम सुरू करू व पुढच्या कार्यकाळात ते पूर्ण करू”, असे बाली यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये पुन्हा एकदा ‘आप’चे सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
अयोध्या सोडल्यानंतर सीतेने कुठे केले होते वास्तव्य?
पंजाबमधील अमृतसर पासून १२ किमी अंतरावर ‘राम तिरथ’ नावाचे तीर्थ स्थळ आहे. याच ठिकाणी लव कुश यांचे मंदिर बांधण्याचा केजरीवाल यांचा मानस आहे. रामायणाच्या उत्तरार्धात सीतेने अयोध्या सोडल्यानंतर या ठिकाणी असलेल्या महर्षि वाल्मिकी यांच्या आश्रमात आश्रय घेतला होता, असे मानले जाते. याच ठिकाणी राम व सीतेचे पुत्र लव व कुश यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. वाल्मिकी समाजासाठी ‘राम तिरथ’ हे एक महत्त्वाचे तीर्थ क्षेत्र आहे. दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक भेट देतात.
दरम्यान, ‘राम तिरथ’ या तीर्थ स्थळाचा विकास यापूर्वीच्या सरकारनेही केला आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल व भाजपाचे युती सरकार अस्तित्वात असताना ‘राम तिरथ’चा विकास करण्यात आला होता. पंजाब सरकारच्या धार्मिक स्थळांशी संबंधित योजनेतून ‘राम तिरथ’च्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यातून एक संग्रहालय उभारण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून राजकारणात धार्मिक स्थळांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचीच प्रचिती ‘आप’ने करून दिली आहे.
पंजाबमध्ये २०२२ मध्ये आम आदमी पार्टी सत्तेत आली. त्यावेळी शाळा, रूग्णालयांची स्थिती सुधारणे, रोजगार निर्मिती आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे हे मुद्दे ‘आप’च्या केंद्रस्थानी होते. धार्मिक मुद्दे ‘आप’च्या प्रचारातून गायब होते. दरम्यान, एका शीख बहुल राज्यात ‘आप’ने हिंदू मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. केजरीवाल व मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अनेक हिंदू कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली आहे. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आम आदमी पार्टी सरकारने पाऊलं उचलली आहेत. शीख समुदायाबरोबरच हिंदू समुदायासाठी महत्त्वाच्या असलेल्या धार्मिक स्थळांना ‘आप’ने महत्त्व दिले आहे. ‘मुखमंत्री तीर्थ यात्रा योजने’अंतर्गत ‘राम तिरथ’चा विकास करण्यात आला आहे.
पंजाबमध्ये हिंदूंची संख्या किती?
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मागील काही महिन्यांत शीख व हिंदू समाजाच्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. केजरीवाल देखील त्यांच्या सभांमधून हिंदूंच्या धार्मिक स्थळांचा उल्लेख वारंवार करत आहेत. आपण सर्व धर्मांचा आदर करतो हे दाखवले जात आहे. धार्मिक वारसा जतन व संवर्धन करणे हे पंजाबच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही ‘आप’ नेत्यांनी म्हटले आहे.
पंजाबमध्ये हिंदूंची संख्या जवळपास ४० टक्के आहे. हिंदू लोकसंख्या मुख्यत: शहरी भागात आहे. त्यामुळे या मतपेढीवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. २०२०-२१ मध्ये पंजाबमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर भाजपा विरोधात लहर निर्माण झाली होती. दरम्यान, भाजपाही हिंदू व शीख मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काँग्रेस पक्षही आपली स्थिती सुधारण्यासाठी कामाला लागला आहे. पारंपारिक शीख व ग्रामीण भागातील मतदारांसह हिंदू मतदार जोडण्यासाठी ‘आप’ने हालचाली सुरू केल्या आहेत. एका ‘आप’ नेत्याने म्हटले, “धार्मिक राजकारण करण्याची स्पर्धा लागलेली नाही. सरकार सर्व धर्मांना समान महत्त्व देण्याचा प्रयत्न करत आहे. इतर समुदायाची पंजाबशी जितकी घट्ट नाळ आहे, तितकीच इतर समाजांचीही आहे. भगवान श्री रामांच्या मुलांचे मंदिर उभारण्यात गैर काय आहे?”
