आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्यात न्यायालयीन दिलासा मिळून एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेच्या उपनेते पदावर नियुक्ती केली आहे. याबाबतचे एक पत्र आम आदमी पक्षाने राज्यसभा सचिवालयाला दिले होते. त्यानंतर राज्यसभा सचिवालयाकडून आम आदमी पक्षाने सांगितलेला बदल करण्यात आला. आम आदमी पक्षाकडून आगामी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात राघव चड्ढा यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे आम आदमी पक्षात राघव चड्ढा यांच्याबाबत अंतर्गत असंतोष असल्याचे दिसून आले. अरविंद केजरीवालांचे यांच्या तालमीत तयार झालेल्या राघव चड्ढांवर आम आदमी पक्षाकडून अविश्वास का दाखवला जातोय? त्याची कारणे काय? सविस्तर जाणून घेऊयात.
आम आदमी पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पाठवलेल्या पत्रात राघव चड्ढा यांच्या नावाचा उल्लेख नव्हता, असे पक्षातील एका सूत्राने सांगितले. राघव चड्ढा यांनी २०१२ मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांना पक्षाकडून राज्यसभेत पाठवण्यात आले. पक्षाकडून पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुददुचेरी या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात चड्ढा यांचे नाव नव्हते. ही राघव चड्ढा यांच्यासाठी एका वादळाची नांदी होती. राघव चड्ढा यांचा राज्यसभेत बोलण्याचा कालावधी कमी करण्यात यावा, यासाठी आम आदमी पक्षाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नसल्याचे पक्षातील सूत्राने सांगितले.
आम आदमी पक्षाशी संबंधित प्रकरणांवर चड्ढा यांनी दीर्घकाळापासून धारण केलेले मौन व अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये चड्ढा यांची अनुपस्थिति या पार्श्वभूमीवर चड्ढा यांना हटवण्यात आल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. चड्ढा यांची पदावरून उचलबांगडी होण्याची जी वेळ आहे, त्याबाबत पक्षातील काही नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केली आहे. तर ही एक अंतर्गत बाब असून वाद वगैरे काही नाहीत, असेही काही नेत्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
आम आदमी पक्षातील सूत्राने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, पक्षाशी संबंधित महत्वाच्या घडामोडींवेळी राघव चड्ढा गैरहजर होते. कथित मद्य घोटाळ्यात केजरीवाल व मनिष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पक्षाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. त्या शक्ती प्रदर्शनालाही चड्ढा हजर नव्हते. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते दूर राहत होते. कठीण प्रसंगी मिळालेल्या पाठिंब्यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे व कुटुंबियांचे आभार मानताना केजरीवाल यांनी भाषणात चड्ढा यांचा उल्लेख केला नाही.
कथित मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली त्यावेळी चड्ढा हे डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनमध्ये होते, याकडे पक्षातील सूत्राने लक्ष वेधले. ते म्हणाले, २०२५ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत राघव चड्ढा सक्रिय सहभागी नव्हते. याचा अर्थ त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले असेही नाही. परंतु, मागील चार वर्षांपासूनचे त्यांचे एकूण वागणे पाहता त्यांच्याबाबत पक्षाने जो निर्णय घेतला, त्याबाबत आश्चर्य वाटत नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, चड्ढा यांना राज्यसभेतील खासदार पदावरून काढले जाण्याची शक्यता कमी आहे. जोपर्यंत ते स्वत:हून खासदारकी सोडत नाहीत, तोपर्यंत ते आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील एकूण दहा खासदारांपैकी एक खासदार म्हणून कायम राहतील.
पंजाब सरकारमध्ये चड्ढांचा हस्तक्षेप
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ मोहिमेत चार्टर्ड अकाउंटंट असलेले चड्ढा हे अरविंद केजरीवालांशी जोडले गेले. आम आदमी पक्षात राघव चड्ढा यांचा राजकीय आलेख कायम वाढत गेला. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला महत्वाचे सल्ले देणाऱ्या नऊ सदस्यीय समितीचे ते सदस्य होते. अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे बजेट बनवण्यात चड्ढा यांचे महत्वाचे योगदान होते.
चड्ढा यांना आम आदमी पक्षाने २०१९ मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरवले. परंतु, चड्ढा यांचा पराभव झाला. त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत चड्ढा आमदार म्हणून निवडून आले. त्यांचा आमदारकीचा कालावधी पूर्ण होण्याआधीच पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना मार्च २०२२ मध्ये पंजाबमधून राज्यसभेत पाठवले.
त्यानंतर काही कालावधीतच आम आदमी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चौकशी तसेच अटक होण्याचे सत्र सुरू झाले. दिल्लीचे तत्कालीन आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वात आधी मे २०२२ मध्ये; आम आदमी पक्षाचे संवाद प्रमुख विजय नायर यांना सप्टेंबर २०२२ मध्ये; तत्कालीन उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना फेब्रुवारी २०२३ मध्ये; संजय सिंह यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये; आणि केजरीवाल यांना मार्च २०२४ मध्ये अटक झाली होती. पक्षातील सूत्रानुसार, या कालावधीत राघव चड्ढा हे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारमध्ये हस्तक्षेप करत होते. तसेच राज्यसभेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडत होते. पक्षावर आलेल्या संकटांवेळी चड्ढा हजर नव्हते, तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनही दूर होते, फक्त एका पत्रकार परिषदेत ते दिसले, असे सूत्रांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी चड्ढा यांनी ‘एक्स’वर मुंबई विमानतळावरील ‘उडाण यात्री कॅफे’ या उपक्रमाचे कौतुक केले होते. महाराष्ट्रात भाजपा प्रणित एनडीएचे सरकार आहे. उडाण यात्री कॅफे उपक्रम हा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा उपक्रम आहे. त्या अंतर्गत विमानतळांवर चहा, कॉफी, पाण्याची बाटली अत्यंत कमी दरात प्रवाशांना दिली जाते. दरम्यान, याबाबत चड्ढा यांच्या कार्यालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. तसेच चड्ढा यांनी त्यानंतर त्यांच्या राज्यसभेतील भाषणांची एक व्हिडिओ क्लिप ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.
चड्ढा यांच्या जागी राज्यसभेच्या उपनेते पदावर नियुक्ती झालेल्या अशोक मित्तल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. झालेला बदल हा नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे ते म्हणाले. “आधी एन.डी.गुप्ता हे उपनेते होते. त्यानंतर राघव चड्ढा होते. आता मी उपनेते पदावर आहे. उद्या या पदावर दुसरे कोणी असेल. सगळ्या खासदारांनी शिकायला हवे, असे पक्षाला वाटते. त्यामुळे माझ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली”, असे अशोक मित्तल म्हणाले. पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार बदल करण्यात यावा, असे पत्र राज्यसभा सचिवालयाला देण्यात आले आहे, असे आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील नेते संजय सिंह म्हणाले होते. या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला होता.
