लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंह लवली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कारकिर्दीत राजीनामा देण्याची अरविंद सिंह लवली यांची ही दुसरी वेळ आहे. पक्षातील काही अंतर्गत सूत्रांचे सांगणे आहे की, अरविंद सिंह लवली यांच्या राजीनाम्याचा दिल्लीतील आप-काँग्रेस युतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शीखबहुल भागात आप-काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता
काँग्रेस पदाधिकारी म्हणाले की, दिल्लीतील शीखबहुल भागात याचा नकारात्मक परिणाम होईल. शीखविरोधी दंगलींनी प्रभावित झालेल्या भागात अरविंद सिंह लवली यांच्यामुळेच पक्षाने पुनरागमन केले. त्यामुळे त्यांना ‘दिल्ली का सरदार’ असेही म्हणतात. दिल्लीतील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, अरविंद सिंह लवली यांच्या राजीनाम्यामुळे शीख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद झाला. त्यांच्या राजीनाम्यामुळे शिखांचे वर्चस्व असलेल्या विधानसभा मतदारसंघात (टिळकनगर, हरीनगर, राजौरी गार्डन, लक्ष्मीनगर, सिव्हिल लाइन्स आणि जंगपुरा) आप-काँग्रेस युतीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : निवडणूक तोंडावर, सपाने बदलले १० जागांवरील उमेदवार; कारण काय?
काँग्रेसच्या आतील सूत्रांनी सांगितले की, लवली यांना लोकसभेचे तिकीट मिळणार असल्याचे पक्षश्रेष्ठींनी सांगितले होते. त्यांना दिल्लीच्या उत्तर पूर्व भागातून निवडणूक लढवायची होती, पण कन्हैया कुमार यांना तिकीट दिल्यामुळे ते नाराज होते. आपल्या राजीनामा पत्रात दिल्ली काँग्रेसच्या माजी प्रमुखांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) प्रभारी दीपक बाबरिया यांनाही लक्ष्य केले. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, आगामी काळात आणखी नेते राजीनामा देऊ शकतात.
भाजपामध्ये प्रवेश करणार?
अरविंदर सिंह लवली, संदीप दीक्षित आणि राजकुमार चौहान (गेल्या आठवड्यात पक्ष सोडलेल्या) यांसारख्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु, दीपक बाबरिया यांच्या सूचनेनुसार शेवटच्या क्षणी पक्षश्रेष्ठींनी आपला निर्णय बदलला,” असे काँग्रेस नेत्याने सांगितले. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शीख समुदायाच्या हजारांहून अधिक सदस्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता लवली यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे ते भाजपामाध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अरविंदर सिंह लवली यांच्यावर काँग्रेस नेत्यांची टीका
लवली यांच्यावर टीका करताना पक्षाचे माजी काँग्रेस आमदार आसिफ मोहम्मद खान म्हणाले, “तुम्हाला बाबरियाविरुद्ध तक्रारी आहेत, त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे जा आणि शांतपणे त्यावर तोडगा काढा. शीला दीक्षित यांना दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटी (डीपीसीसी) अध्यक्ष करण्यासाठी उत्तर प्रदेशमधून बोलावण्यात आले. संदीप दीक्षित यांनी कधी प्रश्न केला नाही की, त्यांच्या आई उत्तर प्रदेशच्या खासदार आहेत, मग त्यांना डीपीसीसीची जबाबदारी का देण्यात आली?”
खान यांनी ‘आप’बरोबरच्या युतीबद्दल लवली यांनी व्यक्त केलेल्या चिंता फेटाळून लावल्या. ते म्हणाले, “‘आप’शी कोण समन्वय साधत होते? लवलीजी जात होते, सुभाष चोप्रा जात होते आणि हारून युसूफ जात होते. मीसुद्धा आपबरोबर युती करण्याच्या विरोधात होतो, परंतु जेव्हा पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला तेव्हा आम्ही त्या निर्देशाचे पालन केले आणि पुढेही करत राहू.”
कोण आहे अरविंदर सिंह लवली?
१९९८ मध्ये अरविंदर सिंह लवली दिल्लीचे सर्वात तरुण आमदार ठरले. पाच वर्षांनंतर, वयाच्या ३० व्या वर्षी शीला दीक्षित सरकारमधील ते सर्वात तरुण मंत्री होते. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जायचे. शीला दीक्षित सरकारमध्ये त्यांनी शिक्षण, वाहतूक आणि शहरी विकास यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांच्या कार्यकाळातच दिल्लीच्या ब्लूलाइन बसेस हिरव्या, लाल आणि नारंगी बसेसने बदलण्यात आल्या.
खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के आरक्षण लागू करणारे दिल्ली पहिले राज्य ठरले, तेव्हा लवली हे शिक्षण मंत्री होते. २०१२-१३ मध्ये अनधिकृत वसाहतींच्या नियमितीकरणाला पहिल्यांदा मान्यता मिळाली, तेव्हा ते नगरविकास मंत्री होते. परंतु, या योजनेला केंद्राची मंजुरी मिळण्यासाठी बराच वेळ लागला आणि हा निर्णय २०१८-१९ मध्ये केंद्रात भाजपाची सत्ता असताना झाला.
आप सत्तेत आल्यानंतर त्यांनी कथित भ्रष्टाचारावरून अरविंदर सिंह लवली यांना लक्ष्य केले होते, तरी लवली यांनी २०१३ मध्ये ‘आप’ला पाठिंबा दिला. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आपने काँग्रेसचा दारूण पराभव केला, तेव्हा लवली सिंह दिल्ली काँग्रेसचे नेतृत्व करत होते. त्यानंतर लवली यांनी पहिल्यांदा डीपीसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
हेही वाचा : हाथरस बलात्कार प्रकरणामुळे भाजपा अडचणीत? काँग्रेस-सपा भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का?
२०१७ च्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी पक्षातील दुरवस्थेसाठी गांधी घराण्याला जबाबदार धरले आणि पक्षाचा अचानक राजीनामा दिला. त्यावेळी ते ताबडतोब भाजपामध्ये सामील झाले, परंतु भाजपात त्यांना स्वतःला सिद्ध करता आले नाही. २०१८ च्या सुरुवातीस ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. गांधी घराण्यातील ‘गुड बुक्स’मध्ये असल्याने, ते दिल्लीतील एकमेव नेते होते, ज्यांची केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. ऑक्टोबर २०२२ मध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष करण्यात आले होते, त्याच समितीचे अरविंदर सिंह लवली सदस्य होते.